आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याऐवजी आघाडी किंवा महायुती करूनच लढण्याचा निर्धार अनुक्रमे कांॅग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि सेना-भाजप पक्षांनी व्यक्त केला असला तरी आघाडीतील राष्ट्रवादीचा यवतमाळ विधानसभा मतदारसंघावर केला जात असलेला दावा कॉंग्रेसच्या अडचणीत भर घालत आहे. त्यामुळे आघाडीतील पक्ष किती एकदिलाने लढतील, याबाबत कार्यकर्त्यांमध्येच संभ्रम आहे.
यवतमाळ जिल्ह्य़ातील सात विधानसभा मतदारसंघांपकी फक्त पुसद मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक हे या मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अलीकडे यवतमाळात घेतलेल्या पक्ष कार्यकर्त्यांंच्या मेळाव्यात यवतमाळ मतदारसंघावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दावा सांगून या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला संधी मिळाली पाहिजे, असे जोर देऊन सांगितले. हा मतदार कांॅग्रेसच्या ताब्यात असून आमदार नीलेश पारवेकर यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी नंदिनी पारवेकर आमदार झाल्या आहेत. कांॅग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी यवतमाळात वार्ताहर परिषदेत हे स्पष्ट केले की, कांॅग्रेसच्या ताब्यात असलेल्या कोणत्याही विद्यमान जागा आम्ही सोडणार नाही. शिवाय, विद्यमान आमदारांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाईल.
गंमत अशी की, निवडून येण्याची क्षमता असलेल्यांनाच उमेदवारी दिली जाईल, असे शनिवारी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचीही चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे यवतमाळची कॉंग्रेसच्या ताब्यातील जागा राष्ट्रवादीला मिळू शकते, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. कारण, आमदार नंदिनी पारवेकर यांना असलेली मराठी भाषेची अडचण आणि समाधानकारक नसलेला परफॉर्मन्स यामुळे त्यांना पुन्हा तिकीट देणे कांॅग्रेसला धोक्याचे होऊ शकते. हा धोका टाळून राष्ट्रवादीला उमेदवारी देणे कॉंग्रेसच्या हिताचे असल्याचे कार्यकत्यार्ंना वाटत आहे.
जी गोष्ट आघाडीच्या बाबतीत आहे तिची झलक महायुतीतही पहायला मिळत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी महाराष्ट्रात भाजपचीच सत्ता आणण्याचे आवाहन शनिवारी दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर पक्षाच्या एकदिवसीय परिषदेत केल्यामुळे महायुतीतील शिवसेनेच्या ‘चला उठा, महाराष्ट्र घडवू या’ या घोषणेतील ‘उठा’ अर्थात, उध्दव ठाकरे यांचे नेतृत्व मानायचे की, नरेंद्र मोदी यांच्या भाजपला सत्तेत आणायचे, असा संभ्रम कार्यकर्त्यांंमध्ये निर्माण होतांना दिसत असल्याची चर्चा आहे. नमोमंत्राने देशभरात सत्ता परिवर्तन घडवून आणले, तसेच ‘उठा’ ची घोषणा शिवसेनेला मुख्यमंत्रीपदावर बसवेल, अशी खात्री सेनेला आहे, पण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या महाराष्ट्रात भाजपची सत्ता आणायच्या आवाहनामुळे महायुतीत ऐक्य कसे राहील, हे नजीकच्या काळातच जनतेला अनुभवता येईल.
संग्रहित लेख, दिनांक 12th Aug 2014 रोजी प्रकाशित
नेत्यांच्या आवाहनांनी ‘आघाडी’, ‘महायुतीत’ही कार्यकर्ते संभ्रमित
आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याऐवजी आघाडी किंवा महायुती करूनच लढण्याचा निर्धार अनुक्रमे कांॅग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि सेना-भाजप पक्षांनी व्यक्त केला असला
First published on: 12-08-2014 at 07:42 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politics in yavatmal