छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी एक पथक बीड जिल्ह्यात पोहचले असून, धाराशिव व नांदेडमध्येही ते पाहणी करणार असल्याचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
दरम्यान, मराठवाड्यात झालेल्या नुकसान भरपाईची आकडेवारी आणि लागणारा निधी याची माहिती प्रशासनाकडून या पथकासमोर ठेवली जाणार आहे. प्रत्यक्षातील पाहणी आणि मागण्यात आलेली मदत यात काही विरोधाभास आहे का, मागण्यात आलेली रक्कम योग्य आहे का, याची खातरजमा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मराठवाड्यात सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे नदीकाठची जमीन खरवडून गेली आहे. अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. राज्य सरकारने पॅकेज जाहीर केले असले तरी वितरित होणारी रक्कम केवायसीमुळे अनेकांपर्यंत पोहचू शकली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. केंद्रीय पथकासमोर तो व्यक्त होऊ नये म्हणून या पथकाच्या दौऱ्याबाबत कमालीची गोपनीयता पाळली जात आहे.
बीड, धाराशिव व नांदेडमधील अधिक बाधित असणाऱ्या गावांची यादी तयार केली असून, पथकातील सदस्यांना परिस्थिती समजावून सांगितली जाईल, असे सांगण्यात येत आहे. धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तीकुमार पुजार म्हणाले की, उद्या पथकास कोणत्या गावांमध्ये नुकसान झाले आहे, याची यादी देऊ. ते या गावांमध्ये जाऊन पाहणी करणार आहेत. एका बाजूला केंद्रीय पथकाची पाहणी सुरू असतानाच शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचाही दौरा अतिवृष्टीतील शेतकऱ्यांच्या गाठीभेटीतून होणार आहे.
