छत्रपती संभाजीनगर : जायकवाडीच्या पाण्यावर तरंगत्या सौरपटलातून ऊर्जानिर्मितीच्या प्रस्तावित प्रकल्पामुळे जैवविविधतेवर होणाऱ्या परिणामाविषयी साशंकता व्यक्त होत असताना राष्ट्रीय पातळीवर या प्रकल्पास मान्यता देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्य वन मंडळाने या प्रकल्पास मान्यता देण्यात आले.

जायकवाडी धरणात ४ हजार २५२ हेक्टरवर प्रस्तावित या प्रकल्पातून १ हजार ३४२ मेगावॅट वीज निर्मितीचा प्रस्ताव असून त्यास साधारणत: आठ हजार ६७ कोटी रुपये लागतील असा अंदाज आहे. या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी डेहराडून येथे उद्या (गुरुवारी) बैठक होणार आहे.

२५० विविध प्रजातीचे पक्षी जायकवाडी जलाशयात येतात. या अभयारण्यातील ४ हजार ९२ हेक्टरवर सौरपटल बसविण्याचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. राज्य वनमंडळाने या प्रकल्पास मान्यता दिली आहे. मात्र, या प्रकल्पामुळे जैवविविधतेवर काय परिणाम होतील याचा अभ्यास अद्यापि बाकी आहे. असे असले तरी आता प्रस्ताव पूर्ण तयार असून तो राष्ट्रीय वनमंडळाच्या बैठकीत येत्या आठ दिवसांत ठेवला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.

या प्रकल्पातून तयार होणारी वीज वाहून नेण्यासाठी १० आणि १४ हेक्टरवर दोन वीज केंद्र आणि वीज वाहून नेण्यासाठी १३५ हेक्टरवर उच्चदाब विद्युत वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. या विद्युत वाहिन्या एक तर जमिनी खालून घ्याव्यात किंवा त्या वीज प्रवाहरोधक असाव्यात, असे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्या वीज वाहिन्या कशा प्रकारे टाकल्या जातील, हे अद्यापि ठरलेले नाही.

जायकवाडी धरण हे ३४ हजार हेक्टर क्षेत्रावर पसरले असून त्यातील पक्षी अभयारण्य असलेल्या ४ हजार ९२ हेक्टरवर तरंगते सौरपटल असावेत, अशी व्यवस्था केली जाणार आहे. दोन सौरपटलात तीन मीटरचे अंतर ठेवले जाणार असून त्याद्वारे देखभाल व दुरुस्ती होऊ शकते, असे प्रस्तावित करण्यात आले आहे. जलाशयातील दोन भागांत हे सौरपटल करण्याची सोय केली जाणार आहे. हा प्रकल्प गतीने व्हावा, यासाठी शासकीय यंत्रणांमध्ये वेगवान हालचाली सुरू आहेत.

पक्षी अभयारण्य तसेच राज्यस्तरीय वनमंडळाच्या मान्यतेने या प्रकल्पासाठी आवश्यक त्या सर्व मान्यता घेण्यात आल्या आहेत. जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठीही समिती नेमण्यात आलेली आहे. त्याचीही बैठक झाली आहे. या प्रकल्पाचा प्रस्ताव आता केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वन मंडळाकडे पाठविण्यात आला असून त्याची बैठक डेहराडून येथे गुरुवारी होणार आहे. – डॉ. भागवत कराड, खासदार, राज्यसभा.

या प्रकल्पाच्या जैवविविधतेचा अहवाल तयार होणे आवश्यक आहे. तत्पूर्वी प्रकल्पास मान्यता दिली जाऊ नये. असे झाल्यास त्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी करत आहे. या भागात धरण परिसरात मोठी जमीन आहे. धरणातील पाणी कमी झाले तर सौरपटल गाळात रुतू शकतात. अनेकदा धरणात पाणी कमी होते. – दिलीप यार्दी, पक्षिमित्र, छत्रपती संभाजीनगर.