छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्राच्या विकासात ज्यांचे मौलाचे कार्य आहे, असे महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी राज्याला अन्न धान्यामध्ये स्वयंपूर्ण करण्याचे मोठे काम केले. बंजारा समाजाला विकासाच्या प्रवाहात आणले. परंतु त्यांच्यानंतर एकेकाळी विकासाच्या प्रवाहात असलेला समाज बाजूला पडला, असे सांगत विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळमुक्तीसाठी राबवण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेचे प्रेरणास्रोत वसंतराव नाईक असल्याचे प्रतिपादन येथे केले.
बंजारा समाजाला पुन्हा एकदा विकासाच्या प्रवाहात आणले जात असून, समाजाचे प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या पोहरा देवी तीर्थस्थळाला ७०० कोटी रुपये दिल्याचे सांगून फडणवीस यांनी पोहरादेवी तीर्थक्षेत्री येणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. येथील सिडको बसस्थानकाच्या चौकात दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी रविवारी दुपारी बोलत होते.
फडणवीस म्हणाले, वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला अन्न धान्यामध्ये स्वयंपूर्ण करता नाही आले तर राजीनामा देईन, असे बाणेदारपणे भूमिका मांडण्याची हिम्मत दाखवली होती. महाराष्ट्र आज जी प्रगती पाहतो आहे, ज्यांनी महाराष्ट्राच्या विकासाला आकार दिला तो वारसा वसंतराव नाईक यांनी आमच्यासमोर ठेवला आहे. रोजगार निर्मिती, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गरीब माणसाच्या हाताला काम, वाडी-वस्त्या तांड्यावर जलसंधारणाची कामे केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
कार्यक्रमाला पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, मंत्री पंकजा मुंडे, खासदार संदिपान भुमरे, खासदार डॉ. कल्याण काळे, डॉ. भागवत कराड, माजी खासदार हरिभाऊ राठोड आदींची उपस्थिती होती.
