नागपूर: जिल्ह्यातील बुटीबोरी येथील दिवाळखोरीत निघालेला अनिल अंबानी यांचा विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड (व्हीआयपीएल) हा वीजनिर्मिती प्रकल्प सुमारे चार हजार कोटी रुपये मोबदल्यात संपादित केल्याचे अदानी पॉवर लिमिटेडने मंगळवारी घोषित केले. या ६०० मेगावाॅट क्षमतेच्या प्रकल्पाची दिवाळखोरी निराकरण प्रक्रिया सुरू होती.
व्हीआयपीएलच्या या प्रकल्पात प्रत्येकी ३०० मेगावॅटचे दोन वीजनिर्मिती संच आहेत. १८ जून २०२५ रोजी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या (एनसीएलटी) मुंबई खंडपीठाने अदानी पॉवरच्या निराकरण योजनेला मान्यता दिली. त्यानंतर ७ जुलै २०२५ रोजी ही प्रक्रिया यशस्वीरित्या अंमलात आणण्यात आली. हा प्रकल्प अदानी पॉवरकडे गेल्यामुळे या कंपनीची एकत्रित वीजनिर्मिती क्षमता १८,१५० मेगावॅटपर्यंत पोहोचणार आहे.
अदानी पॉवर लिमिटेड ही कंपनी औष्णिक वीजनिर्मिती बरोबरीनेच, पर्यावरणपूरक सौर व इतर ऊर्जा निर्मिती क्षेत्राचा कार्यरत आहे. या कंपनीकडून मध्य प्रदेशातील सिंगरौली-महान, छत्तीसगडमधील रायपूर, रायगड आणि कोरबा आणि राजस्थानमधील कवई येथे प्रत्येकी १,६०० मेगावॅट क्षमतेचे अल्ट्रा-सुपरक्रिटिकल पॉवर प्लांट संवर्गातील सहा वीजनिर्मिती प्रकल्प उभारले जात आहेत. या व्यतिरिक्त उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे १,६०० मेगावॅट क्षमतेचा ग्रीनफिल्ड यूएससीटीपीपी प्रकल्पावर तिचे काम सुरू आहे. याशिवाय, कोरबा येथे पूर्वी घेतलेल्या १,३२० मेगावॅट क्षमतेच्या सुपरक्रिटिकल पॉवर प्लांटच्या बांधकामाचे पुनरुज्जीवन देखील सुरू आहे. यातून २०३० पर्यंत एकत्रित ३०,६७० मेगावॅट क्षमतेच्या वीजनिर्मिती क्षमतेसह भारतातील ती सर्वात मोठी खाजगी वीजनिर्मिती कंपनी बनेल, असा अदानी पॉवरचा दावा आहे.
अदानी पॉवरच्या धोरणात ‘व्हीआयपीएल’चे अधिग्रहण हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. देशाच्या शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी परवडणारी वीज पुरवण्यात ही कंपनी महत्त्वाची भूमिका बजावेल.- एस. बी. ख्यालिया, मुख्य कार्यकारी अधिकारी, अदानी पाॅवर लि.