मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी औषध निर्माण क्षेत्रातील आयातीवर १०० टक्के शुल्काची घोषणा केल्यांनतर देशांतर्गत आघाडीवर प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टी १ टक्क्यांहून अधिक घसरले. येत्या १ ऑक्टोबरपासून नवीन शुल्क लादण्याची घोषणा केली आहे. यामुळे आधीच झळ पोहोचलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राबरोबर औषध निर्माण क्षेत्रातील समभागांमध्ये चौफेर विक्रीचा मारा झाला.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ७३३.२२ अंशांची घसरण झाली आणि तो ८०,४२६.४६ या तीन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ८२७.२७ अंश गमावत ८०,३३२.४१ ही नीचांकी पातळी गाठली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २३६.१५ अंशांनी घसरून २४,६५४.७० पातळीवर बंद झाला. विद्यमान महिन्यात १९ सप्टेंबरपासून निर्देशांकात घसरण सुरू आहे, सलग सहा सत्रांमध्ये ३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. शुक्रवारपर्यंतच्या सहा सत्रांमध्ये सेन्सेक्स २,५८७.५० अंशांनी म्हणजेच ३.१६ टक्क्यांनी घसरला आहे.
ट्रम्प यांच्या औषधांवर १०० टक्के आयात शुल्क लादण्याच्या निर्णयानंतर बहुतेक औषध कंपन्यांचे समभाग घसरले, ज्यामुळे बीएसई हेल्थकेअर निर्देशांक २.१४ टक्क्यांनी खाली घसरला. १ ऑक्टोबर २०२५ पासून, कोणत्याही नाममुद्रित (ब्रँडेड) किंवा स्वामीत्व हक्क असलेल्या (पेटंट) औषध उत्पादनावर १०० टक्के कर लादला जाणार आहे, जोपर्यंत औषध निर्माण कंपन्या अमेरिकेत औषध उत्पादन प्रकल्प बांधत नाही. तो पर्यंत हे आयातशुल्क आकारले जाईल, असे ट्रम्प म्हणाले.
भारतीय भांडवली बाजारात मंदीवाल्यांनी ताबा घेतला असून गुंतवणुकदार चिंताक्रांत आहेत. औषध क्षेत्राला लक्ष्य करत या नवीन लाटेमुळे गुंतवणूकदारांमध्ये निराशाजनक वातावरण आहे, ज्यामुळे औषधांचे निर्माण कंपन्यांचे समभाग घसरले आहेत. दरम्यान, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये कपातीमुळे खर्चात घट दिसून आली आहे. मात्र कृत्रिम प्रज्ञा अर्थात एआय-चालित वाढीने अपेक्षाभंग केला आहे, ज्यामुळे तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागात मोठ्या प्रमाणात विक्रीचा मारा झाला, असे निरीक्षण जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये महिंद्र अँड महिंद्र, इटर्नल, टाटा स्टील, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, सन फार्मा, टेक महिंद्र, इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि एचसीएल टेकच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. तर लार्सन अँड टुब्रो, टाटा मोटर्स, आयटीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांची कामगिरी चांगली राहिली. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) गुरुवारी ४,९९५.४२ कोटी रुपये मूल्याचे समभाग विकले.