मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित अर्थात ‘महानिर्मिती’ने १८ सप्टेंबर रोजी छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील तमनार तहसील येथील गारे-पालमा सेक्टर-२ कोळसा खाणीच्या उत्खननास औपचारिक सुरुवात केली. महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत झालेल्या या शुभारंभाप्रसंगी, वित्त संचालक मनेश विश्वनाथ वाघिरकर, संचालक (प्रकल्प) अभय हरणे, कार्यकारी संचालक डॉ. नितीन वाघ, पंकज सपाटे, मुख्य अभियंता एस.एम. पडोळ, अन्य प्रशासकीय अधिकारी तसेच स्थानिक ग्रामस्थांची उपस्थित होती.

या प्रकल्पासाठी आवश्यक सर्व पर्यावरणीय, वन, खाण तसेच प्रशासकीय मंजुऱ्या महानिर्मितीने मिळविल्या असून, येत्या जानेवारी महिन्यापासून खाणीतून प्रत्यक्ष कोळसा उत्पादन सुरू होणार आहे. छत्तीसगडमधील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक अशा या खाण प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता २३.६ दशलक्ष टन इतकी आहे. महाराष्ट्राच्या विजेच्या गरजांची पूर्तता करणाऱ्या चंद्रपूर, कोराडी आणि परळी येथील औष्णिक वीज निर्मिती संचांना यातून कोळशाचा पुरवठा केला जाणार आहे. यामुळे राष्ट्रीय ग्रिडमध्ये ३२०० मेगावॅटहून अधिक वीज उपलब्ध होईल.

ऊर्जा स्वावलंबनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पामुळे सुमारे ३,४०० थेट तसेच हजारोच्या संख्येने अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार असून खाण परिसरातील स्थानिक ग्रामस्थांना नव्या उपजीविकेचे साधन उपलब्ध होणार आहे. राधाकृष्णन बी. म्हणाले की, कंपनी रोजगारनिर्मिती, महसूलवाढ तसेच स्थानिक परिसरात शिक्षण, आरोग्य व कौशल्य विकास यांसारख्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांत सातत्याने योगदान देत राहील. पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी महानिर्मितीने आगामी २२५६.६० हेक्टर क्षेत्रावर स्थानिक प्रजातींच्या एकूण ५.६४ दशलक्ष रोपांची लागवड ३२ वर्षांमध्ये करण्याचे नियोजन आखले आहे.