Baba Ramdev On Mallikarjun Kharge : काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत (आरएसएस) भाष्य करत बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. मल्लिकार्जुन खरगे यांच्या या वक्तव्यावर भाजपाने तीव्र टीका केली होती. त्यानंतर आता योगगुरू बाबा रामदेव यांनी यावर प्रतिक्रिया देत काँग्रस पक्षावर टीका केली आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची विनंती केली होती. यावर बाबा रामदेव यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ‘पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना काँग्रेस पक्ष हरवू शकत नाही, तुम्ही त्यांच्याशी लढू शकत नाही’, असं म्हणत बाबा रामदेव यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्यावर टीका केली. या संदर्भातील वृत्त जनसत्ताने दिलं आहे.

बाबा रामदेव यांनी काय म्हटलं?

“आरएसएस हा राजकीय पक्ष नाही. जर तुम्हाला (काँग्रेसला) लढायचं असेल तर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याशी लढा. तुम्ही त्यांच्याशी लढू शकत नाही, तुम्ही त्यांना (मोदी आणि शाह यांना) हरवू शकत नाही. ते (मल्लिकार्जुन खरगे) आरएसएसबद्दल अपमानास्पद भाष्य करत राहतात. मी गेल्या दोन ते तीन दशकांपासून आरएसएसचं बारकाईने निरीक्षण करत आहे. आरएसएसमध्ये अनेक चांगले आणि तपस्वी लोक आहेत”, असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.

“आरएसएस ही एक राष्ट्रवादी संघटना आहे आणि डॉ. हेडगेवारांपासून सदाशिवराव गोळवलकरांपर्यंत अनेक व्यक्तींनी त्यात तपश्चर्या केली. आजही लाखो संघ कार्यकर्ते देशासाठी काम करतात. जेव्हा देशविरोधी आणि सनातनविरोधी शक्ती आरएसएस किंवा कोणत्याही हिंदुत्ववादी शक्तीला विरोध करतात, तेव्हा त्यामागे त्यांचा एक छुपा अजेंडा आणि स्वार्थ असतो”, असं म्हणत बाबा रामदेव यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसवर टीका केली आहे.

मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले होते?

“सध्या देशभर निर्माण होत असलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या गंभीर समस्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजप जबाबदार असून संघावर पुन्हा बंदी घातली पाहिजे,” असे खळबळजनक विधान मल्लिकार्जुन खरगे यांनी केलं होतं.

कर्नाटकमध्येही RSS च्या कार्यक्रमांवरून राजकीय संघर्ष

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये आरएसएसच्या कार्यक्रमांवरून राजकीय संघर्ष सुरू आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र आणि राज्यमंत्री प्रियांक खरगे यांनी यापूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून सरकारी, सरकारी अनुदानित शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी आरएसएस शाखांवर बंदी घालण्याची विनंती केली होती.