Red Fort Blast दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट झाला असून त्यामुळे दिल्ली हादरली आहे. त्यामध्ये आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दिल्लीतील या स्फोटानंतर संपूर्ण दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. जाणून घेऊया याच बातमी संदर्भातले सगळे अपडेट्स

Live Updates

Red Fort Delhi Live Updates  दिल्लीसह लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, राजधानीसह मुंबईत हाय अलर्ट; वाचा लाइव्ह अपडेट्स

00:58 (IST) 11 Nov 2025
वैष्णोदेवी मंदिरात कडक सुरक्षा तपासणी

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्याजवळ झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर वैष्णोदेवी मंदिरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून कडक सुरक्षा तपासणी करण्यात येत आहे..

00:41 (IST) 11 Nov 2025
दिल्लीत स्फोटात झालेल्या जीवितहानीमुळे दु:ख – निर्मला सीतारामन

“आज संध्याकाळी दिल्लीत स्फोटात झालेल्या जीवितहानीमुळे खूप दु:ख झाले आहे. शोकाकुल कुटुंबांप्रती माझे मनःपूर्वक संवेदना असून जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करते .” असं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.

23:39 (IST) 10 Nov 2025

दिल्लीतली घटना देश हादरला आहे-एकनाथ शिंदे

दिल्लीत सोमवारी सायंकाळी लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्थानकाशी झालेल्या स्फोटात काही कुटुंबियांनी आपले आप्त गमावले, अनेक जण जखमी झाले. या भयानक दुर्घटनेमुळे संपूर्ण देश हळहळतोय. मी व्यक्तिशः आणि शिवसेना पक्षातर्फे सहवेदना व्यक्त करतो, आणि या दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांना अंतःकरणपूर्वक श्रध्दांजली वाहतो. खुद्द पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी आणि मा.अमितभाई शाहजी तपासावर लक्ष ठेवून आहेत. या घटनेनंतर राजधानी दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून तपासाअंती स्फोटामागील कारणे स्पष्ट होतीलच.

सद्गती आणि सहवेदना… असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी पोस्ट केली आहे.

23:22 (IST) 10 Nov 2025

दिल्ली स्फोटाची बातमी खूपच चिंताजनक आणि दुःखद-राहुल गांधी

“दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटाची बातमी खूपच दुःखद आणि चिंताजनक आहे. या दुःखद अपघातात अनेक निष्पाप जीव गमावल्याने दुःख झालं आहे. या दुःखद काळात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्या कुटुंबांबरोबर मी आहे आणि माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. सर्व जखमी लवकरात लवकर बरे होतील अशी मी आशा करतो”, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

23:21 (IST) 10 Nov 2025

उत्तर प्रदेशातही हाय अलर्ट

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. एएनआयशी (ANI) बोलताना, उत्तर प्रदेशचे एडीजी कायदा व सुव्यवस्था अमिताभ यश यांनी सांगितले की, डीजीपींनी उत्तर प्रदेशातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना संवेदनशील धार्मिक स्थळे, संवेदनशील जिल्हे आणि सीमावर्ती भागांमध्ये सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व सुरक्षा यंत्रणांनाही सतर्क करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांमध्ये पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. संवेदनशील भागांमध्ये गस्त आणि तपासणी वाढवण्याचे आदेश लखनऊ येथून जारी करण्यात आले आहेत.

23:21 (IST) 10 Nov 2025

या घटनेमागे षडयंत्र आहे का याची चौकशी झाली पाहिजे-केजरीवाल

“लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाची बातमी अत्यंत चिंताजनक आहे. काही लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचं वृत्त आहे आणि हे अत्यंत दुःखद आहे. हा स्फोट कसा झाला आणि त्यामागे काही मोठं षड्यंत्र आहे का? याची चौकशी पोलीस आणि सरकारने तातडीने करावी. दिल्लीच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा सहन केला जाऊ शकत नाही”, असं माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे

23:15 (IST) 10 Nov 2025

Blast Near Red Fort : दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईतही ‘अलर्ट’! शहरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत दिली महत्त्वाची माहिती

Blast Near Red Fort : दिल्लीतील स्फोटानंतर पोलिसांकडून मुंबईतही खबरदारी घेतली जात आहे. …सविस्तर बातमी
23:04 (IST) 10 Nov 2025

“दिल्लीतील स्फोटाची घटना हृदयद्रावक…”; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

“दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट हृदयद्रावक आहे. या दुःखद घटनेतील दिवंगत आत्म्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. शोकाकुल कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आणि प्रार्थना आहेत. मृतांच्या आत्म्यांना शांती मिळो आणि जखमी लवकर बरे व्हावेत अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. ओम शांती”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

https://platform.twitter.com/widgets.js
22:30 (IST) 10 Nov 2025

दिल्लीतली घटना वेदनादायी, अमित शाह यांच्याशी चर्चा-मोदी

दिल्लीत घडलेली स्फोटाची घटना ही अत्यंत वेदनादायी आहे. दिल्लीमध्ये जे घडलं आणि ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. जे लोक या घटनेत जखमी झाले त्यांना लवकर आराम मिळावा अशीही प्रार्थना मी करतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी माझी चर्चा झाली असून सद्यस्थितीचा आढावा घेतला आहे अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

22:26 (IST) 10 Nov 2025

लाल किल्ला परिसरातील स्फोटाची घटना अत्यंत वेदनादायी-असदुद्दीन ओवैसी

लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटाची घटना ही अत्यंत वेदनादायी आहे. तसंच जे जखमी झाले आहेत त्यांना लवकर आराम मिळावा अशी प्रार्थना मी ईश्वराकडे करतो. या स्फोटाला जे जबाबदार आहेत त्यांना शोधू कठोरातलं कठोर शासन दिलं जावं अशी पोस्ट असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे.

22:16 (IST) 10 Nov 2025

दिल्लीतली घटना अत्यंत चिंताजनक आणि वेदनादायी-काँग्रेस

दिल्लीतल्या लाल किल्ला स्टेशनजवळ झालेल्या स्फोटाची घटना चिंताजनक आहे आणि वेदनादायी आहे. या घटनेत काही लोक जखमी झाल्याचीही माहिती आहे. आम्ही देवाकडे प्रार्थना करतो आहोत की या स्फोटात मृत्यू झालेल्यांच्या आत्म्याला शांती मिळो. तसंच जे जखमी झाले आहेत त्यांना आराम मिळो अशी पोस्ट काँग्रेसने केली आहे.

22:03 (IST) 10 Nov 2025

आय २० ह्युंदाई कारमध्ये स्फोट झाल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची माहिती

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, सुभाष मार्ग ट्राफिक सिग्नलवर आय २० ह्युंदाई गाडीत एक स्फोट झाला आहे. स्फोटामुळे जवळपासच्या गाड्या आणि रस्त्यावरून जाणारे लोक जखमी झाल्याची महिती आहे. प्राथमिक माहितीनुसार काही लोकांचा मृत्यूही झाला आहे. स्फोटाची माहिती मिळताच १० मिनिटांत दिल्ली गुन्हे शाखा, दिल्ली स्पेशल ब्रांचची पथके घटनास्थळावर पोहचली आहेत. एनएसजी आणि एनआयएच्या पथकाने एफएसएलबरोबर सखोल चौकशी सुरू केली आहे.

22:00 (IST) 10 Nov 2025

दिल्लीत दहशतवाद्यांना मागच्या चार दिवसांत अटक

मागील चार दिवसांत, म्हणजेच ७ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान दिल्लीमध्ये काही दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये झालेल्या या स्फोटाकडे गांभीर्याने पाहिलं जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे घटनास्थळी पोहचले आहेत आणि परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

21:58 (IST) 10 Nov 2025

दिल्लीत स्फोट झाला ते ठिकाण लाल किल्ल्यापासून अवघ्या ८०० मीटर अंतरावर

दिल्लीत ज्या ठिकाणी हा स्फोट झाला ते ठिकाण लाल किल्ल्यापासून फक्त ८०० मीटर अंतरावर आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी हा संपूर्ण परिसर रिकामा केला. या ठिकाणी अग्नीशमन दल पोहोचलं असून लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. तसेच या ठिकाणी एनएसजीचे वरिष्ठ अधिकारीही दाखल झाले आहेत. त्याचसोबत फॉरेन्सिक टीमही या ठिकाणी दाखल झाली असून ते पुरावे गोळा करण्याचं काम करत आहेत.

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट झाला असून त्यामुळे दिल्ली हादरली आहे. या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याचीही भीती आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री हे घटनास्थळी पोहचले आहेत. परिस्थितीचा आढवा अमित शाह घेत आहेत.