पीटीआय, पाटणा

“भाजपशासित आसाममध्ये घुसखोरी रोखण्यात यश आले, पण शेजारील पश्चिम बंगालमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांचे लाल गालिचा घालून स्वागत केले जाते,” अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी केले. पाटण्यामध्ये आयोजित एका मेळाव्यात बोलताना त्यांनी घुसखोरीच्या मुद्यावरून ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या जनतेला प्रत्येक घुसखोराला हाकलून लावण्याचे आवाहनही केले.

या वेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘मत चोरी’वरून केलेल्या टीकेवरून खिल्ली उडवली आणि मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीमुळे (एसआयआर) घुसखोरांचा नायनाट केला जाईल, या दाव्याचा पुनरुच्चार केला. घुसखोरीवर उपाययोजना करण्यासाठी निवडणूक आयोगाने निवडणूक सुरू केलेल्या कारवाईवर विरोधकांचा संताप आश्चर्यकारक असल्याचे ते म्हणाले. ‘एसआयआर’ देशभरात लागू केला जाईल, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांसह मंत्री ३० दिवस किंवा त्याहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यास त्यांना काढून टाकण्याची तरतूद असलेले १३०वे घटनादुरुस्ती विधेयक विरोधी पक्षांची सरकारे अस्थिर करण्याच्या उद्देशाने आणण्यात आले होते, हा आरोप शहा यांनी फेटाळला.

दिल्लीत बसलेल्या लोकांना सीमेवरील परिस्थितीची काहीच कल्पना नाही. जेव्हा शेजारच्या देशातील कोणी आपल्या हद्दीत प्रवेश करतो तेव्हा स्थानिक पोलीस ठाण्यांना याची जाणीव असायला नको का? या अधिकाऱ्यांना घुसखोरांचे लाल गालिचा घालून स्वागत करण्याचे वरून आदेश मिळतात. म्हणूनच पश्चिम बंगालमध्ये घुसखोरी मोठ्या प्रमाणात होत आहे. – अमित शहा, गृहमंत्री

भाकपचे २० उमेदवार जाहीर

बिहारमध्ये ‘महागठबंधन’चा घटक पक्ष असलेल्या भाकपने शनिवारी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी २० उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये सर्व १२ विद्यमान आमदारांसह नवीन चेहऱ्यांनाही संधी दिली आहे. तसेच २०२०च्या विधानसभा निवडणुकीत जिंकू न शकलेल्या जागांवर पक्षाने नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. या बाबतची माहिती पक्षाचे सरचिटणीस दीपांकर भट्टाचार्य यांनी दिली. प्रमुख उमेदवारांमध्ये अमरजीत कुशवाह, सत्यदेव राम, गोपाल रविदास, संदीप सौरभ, शिव प्रकाश रंजन, अजित कुमार सिंह, बिरेंद्र प्रसाद आणि मेहबूब आलम यांचा समावेश आहे.