काँग्रेस नेते नवजोत सिंग सिद्धू यांनी दावा केला आहे की, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांच्याकडे काँग्रेसमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती. सिद्धू यांनी एका मुलाखतीत मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सिद्धू यांना मुलखतीवेळी विचारण्यात आलं होतं की, तुम्ही भाजपात जाणार आहात का? किंवा भाजपाने तुमच्याशी संपर्क साधला आहे का? यावर सिद्धू म्हणाले, मी काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही. मला आम आदमी पार्टीकडूनही विचारणा झाली होती. परंतु, मी काँग्रेससाठीच काम करत राहणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवजोतसिंग सिद्धू म्हणाले, माझ्याशी कोणी कोणी संपर्क केला होता याची माहिती मी तुम्हाला देईन. भगवंत मान माझ्याकडे आले होते. ते मला म्हणाले, वरिष्ठांशी बोलून मी त्यांना (भगवंत मान) काँग्रेसमध्ये सामील करून घेतलं तर ते माझ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री बनण्यास तयार आहेत. त्यानंतर त्यांनी मला आणखी एक गोष्ट सांगितली की, मी आपमध्ये सामील होण्यास तयार असेन तर ते मला आपमध्ये घेतील आणि माझ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्यास तयार आहेत. माझं हे वक्तव्य भगवंत मान यांनी फेटाळलं तर मी त्यांना त्या जागेची आठवून करून देईन जिथे आमच्यात ही सगळी चर्चा झाली होती.

नवजोतसिंग सिद्धू म्हणाले, “मी भगवंत मान यांना स्पष्ट सांगितलं की मी काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही. मी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वाड्रा यांच्याशी वचनबद्ध आहे. काँग्रेस सोडणं मला शक्य नाही. परंतु, मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की, तुम्ही काँग्रेसमध्ये येण्यास इच्छूक असाल तर मला त्याचा आनंदच होईल. मी आणि आमचा पक्ष तुमचं स्वागत करू. त्यासाठी तुम्हाला दिल्लीत आमच्या पक्षश्रेष्ठींशी बोलावं लागेल. त्यानंतर आमच्यात या विषयावर कधी चर्चा झाली नाही.” दरम्यान, नवजोतसिंग सिद्धू यानी केलेल्या दाव्यांवर अद्याप मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

हे ही वाचा >> ‘टीका करण्याचा प्रत्येकाला अधिकार’, कलम ३७०, पाकिस्तानला शुभेच्छा याविरोधातील एफआयआर सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

सिद्धू म्हणाले, “पंजाबच्या लोकांची सेवा करणं हेच माझं उद्धीष्ट आहे”. पंजाबवरील वाढत्या कर्जाबाबत सिद्धू यांनी चिंता व्यक्त केली. भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील आपच्या सरकारवर निशाणा साधत सिद्धू म्हणाले, हे लोक विमान आणि आलिशान गाड्यांमध्ये फिरतात, त्यांची बिलं मात्र पंजाबी लोकांना भरावी लागत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navjot singh sidhu claims bhagwant mann was ready to be my deputy asc