आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आज(रविवार) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत विरोधी पक्षांना एकत्र आणण्याबाबत हे नेते चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. लालू प्रसाद यादव हे कालच (शनिवार) दिल्लीत आले आहेत, तर नितीश कुमार हे आज दिल्लीत पोहोचणार आहेत. जवळपास पाच वर्षांपेक्षाही अधिक काळानंतर पहिल्यांदाच तिन्ही पक्षांमध्ये ही बैठक होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिहारनंतर २०२४ मध्ये भाजपा देशातूनही जाईल –

राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव काल पाटणाहून दिल्लीला येत होते, तेव्हा त्यांनी भाजपावर हल्लाबोल करत म्हटले की, “बिहारमधील भाजपा सरकार हटवण्यात आले आहे. २०२४ मध्ये ते देशातूनही हटवले जाईल. विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. सोनिया गांधी यांच्या भेटीचा हा अजेंडा आहे.”

हेहे वाचा : आगामी लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये ३२ जागा जिंकण्याचे भाजपाचे लक्ष्य?

नितीश यांनी राहुल गांधींची भेट घेतली आहे-

बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या महिन्यात त्यांच्या दिल्ली दौऱ्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये सध्याची राजकीय परिस्थिती आणि विरोधकांची एकजूट यावर चर्चा झाली. तेव्हा सोनिया गांधी त्यांच्या आईच्या निधनामुळे देशाबाहेर होत्या.

हरियाणात विरोधकांची महासभा –

भाजपला घेराव घालण्याबाबत विरोधकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या तयारीचा सर्वात मोठा साक्षीदार असणार आहे हरियाणाचे फतेहाबाद. देशाचे माजी पंतप्रधान चौधरी देवी लाल यांच्या १२९व्या जयंतीनिमित्त २५ सप्टेंबरला विरोधकांची महासभा होणार आहे. राजकीय जाणकारांचे म्हणण्यानुसार ही रॅली इंडियन नॅशनल लोकदलातर्फे आयोजित केली जात असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि द्रविड मुन्नेत्र कळघमच्या कनिमोळी यांच्यासह अनेक विरोधी पक्षांचे नेते या रॅलीत सहभागी होण्याची शक्यता आहे.

खरेतर, बिहारमध्ये आरजेडीसोबत सरकार स्थापन केल्यापासून, नितीश कुमार काँग्रेससह बिगर-भाजपा पक्षांच्या एकजुटीवर सतत जोर देत आहेत. भाजपाशी संबंध तोडल्यापासून ते राहुल गांधी, शरद पवार, अरविंद केजरीवाल आणि इतर अनेक प्रमुख नेत्यांच्या भेटीसाठी दिल्लीत गेले होत. बिहारच्या दृष्टिकोनातून या रॅलीची विशेष बाब अशी आहे की त्यात तेजस्वी यादव देखील सहभागी होऊ शकतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish kumar and lalu prasad to meet sonia gandhi in delhi today msr
First published on: 25-09-2022 at 10:14 IST