महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलंय. मोदींच्या विकासवादी धोरणाचं अजित पवार यांनी कौतुक करताना जे लोक विकासाबद्दल बोलतात त्यांनाच जनता मत देते, असं म्हटलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यामध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अजित पवारांनी हे वक्तव्य केलंय. “पंतप्रधान मोदी जेव्हा सत्तेत आले तेव्हा त्यांनी विकासकामांच्या माध्यमातून लोकांची मनं जिंकली. जे लोकं विकासाबद्दल बोलतात त्यांनाच जनता संधी देते. वादांमध्ये रस असणारे फार थोडे लोक आहेत,” असंही अजित पवार यांनी यावेळी म्हटलं.

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून नवाब मलिक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील डर्टी डझन नावाने नेत्यांची यादी जाहीर केली जाणार असल्याच्या मुद्द्यावरुन प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी संतापून खास त्यांच्या शैलीत उत्तर दिलं. “मग मी काय करु. मी सुद्धा तुरुंगात जाऊ का? मी यावर प्रतिक्रिया देणार नाही. मी केवळ विकासासाठी काम करतो,” असं अजित पवार शनिवारच्या या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले.

“तुम्ही अनेकदा असे प्रश्न विचारतात. मात्र असे फार थोडे लोक आहेत ज्यांना या वादांमध्ये सर असतो. जे लोक विकासाबद्दल बोलतात त्यांना जनता संधी देते. पंतप्रधान मोदींनी सत्तेत आल्यानंतर विकासकामांच्या माध्यमातून लोकांची मनं जिंकली आहेत,” असं अजित पवार यांनी म्हटलं.

याचबरोबरच अजित पवार यांनी सहा मार्च रोजी मोदी पुणे दौऱ्यावर येणार असल्याचं सांगितलं. “पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा मानसन्मान ठेवला गेला पाहिजे. पंतप्रधान देशाच्या कोणत्याही भागात जाऊ शकतात, तो त्यांचा अधिकार आहे. लोकशाही पद्धतीने निवडून मोदी पंतप्रधान झाले आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर आल्यानंतर त्यांच्या कार्यक्रमामध्ये पालकमंत्री म्हणून सहभागी होणार आहे,” अशी स्पष्टोक्ती अजित पवार यांनी  केली.

पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्यात सहभागी होण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे. मात्र, त्यांची तब्येत पाहून ते निर्णय घेतील. पुण्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी देखील पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमात सहभागी होतील, असंही अजित पवार म्हणालेत. दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवरून राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींच्या पुणे दौऱ्याला विरोध दर्शविला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi won hearts of people through his development agenda says maharashtra deputy cm ajit pawar scsg