गेल्या आठवड्याभरापासून दिल्लीतलं राजकीय वातावरण तापलं आहे. लोकसभेत दोन तरुणांनी घुसखोरी केल्याप्रकरणी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पंतप्रधान व गृहमंत्र्यांच्या निवेदनाची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षाच्या १४१ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या खासदारांनी मंगळवारी संसद भवनाच्या आवारात घोषणाबाजी केली. मात्र, त्यात तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार कल्याण बॅनर्जी यांनी थेट उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी त्यावर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट धनखड यांना फोन करून खेद व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं घडलं काय?

संसदेत आत्तापर्यंत कारवाई करून विरोधी पक्षाच्या १४१ खासदारांवर हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई केली. याविरोधात काही खासदारांनी मंगळवारी संसदेच्या आवारात पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी केली. त्यात तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जीही होते. यावेळी कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे पदसिद्ध सभापती व देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची विचित्र हावभाव करत नक्कल केली.

त्याचवेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करताना हसत असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. या सगळ्या प्रकारावर सत्ताधाऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या असताना मोदींनी थेट धनखड यांना फोन करून खेद व्यक्त केला. स्वत: धनखड यांनीच एक्सवर (ट्विटर) पोस्ट करून ही माहिती दिली आहे.

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

तृणमूलच्या खासदारांनी नक्कल केल्याच्या प्रकाराबाबत बोलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन आल्याचं जगदीप धनखड यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. “मला आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन आला. संसदेच्या पवित्र आवारात काही सन्माननीय खासदारांनी केलेल्या नौटंकीवर त्यांनी खेद व्यक्त केला. त्यांनी मला सांगितलं की ते स्वत: गेल्या २० वर्षांपासून अशा प्रकारचा अपमान सहन करत आहेत. अजूनही ते थांबलेलं नाही. पण हा असा प्रकार थेट देशाच्या उपराष्ट्रपतींच्या बाबतीत आणि तोही संसदेच्या आवारात घडणं हे दुर्दैवी आहे”, असं उपराष्ट्रपती धनखड यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

अमेरिकेच्या आरोपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पहिलं भाष्य; हत्येचा कट रचल्याच्या चर्चांवर म्हणाले, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली…”

“मी त्यांना म्हणालो, “प्रधानमंत्री महोदय, काही लोकांचं अशा प्रकारचं वर्तन मला माझी कर्तव्य पार पाडण्यापासून परावृत्त करू शकत नाही. आपल्या राज्यघटनेनं नमूद केलेल्या तत्वांशी मी बांधील आहे. असे कोणतेही अपमान मला माझा मार्ग बदलण्यास भाग पाडू शकत नाहीत”, असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनीही व्यक्त केली नाराजी

दरम्यान, या नक्कल प्रकरणावर राष्ट्र्पती द्रौपदी मुर्मू यांनीही सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. “ज्या प्रकारे आपले माननीय उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा अवमान संसद आवारात करण्यात आला, ते पाहून मला खेद वाटला. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार असायला हवा. पण त्यांची अभिव्यक्ती ही प्रतिष्ठा जपणारी व सौजन्यपूर्ण असायला हवी. संसदेच्या याच परंपरेचा आपल्याला अभिमान आहे. देशाच्या नागरिकांचीही लोकप्रतिनिधींकडून हीच अपेक्षा आहे”, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi calls vice president jagdeep dhankhad over mimicry incident by tmc mp pmw