काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी केलेल्या एका विधानावरून सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. वारसा करासंदर्भात सॅम पित्रोदा यांनी केलेल्या या विधानामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व प्रमुख विरोधी काँग्रेस यांच्यात दावे-प्रतिदाव्यांचं राजकारण दिसत आहे. सॅम पित्रोदा यांनी एएनआयशी बोलताना वारसा करासंदर्भात केलेल्या विधानावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून वाद निर्माण होताच सॅम पित्रोदा यांनी त्यांच्या विधानावर स्पष्टीकरणही दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले सॅम पित्रोदा?

भारतीय अर्थव्यवस्थेबाबत बोलताना सॅम पित्रोदा यांनी अमेरिकेतील एका करासंदर्भात उल्लेख केला. “अमेरिकेत वारसा कर नावाचा एक टॅक्स आहे. दर एखाद्या व्यक्तीने १०० मिलियन डॉलर्स मूल्याइतकी संपत्ती कमावली असेल, तर त्याच्या निधनानंतर त्याच्या मुलांना साधारणपणे ४५ टक्के संपत्ती मिळते आणि उर्वरीत ५५ टक्के संपत्ती सरकार ताब्यात घेतंय. हा एक वेगळा कायदा आहे. या कायद्यानुसार, तुम्ही तुमच्या हयातीत संपत्ती कमावली. पण निधनानंतर तु्म्ही तुमची संपत्ती जनतेसाठी सोडून गेलं पाहिजे. सगळी संपत्ती नाही, पण किमान निम्मी संपत्ती. मला हे न्याय्य वाटतं”, असं पित्रोदा या चर्चेत म्हणाले होते.

“भारतात असं काही नाहीये. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची पूर्ण संपत्ती मुलांना मिळते. लोकांना काहीच मिळत नाही. अशा मुद्द्यांवर लोकांनी चर्चा करण्याची आवश्यकता आहे. त्यातून काय अंतिम निष्कर्ष निघेल हे मला माहिती नाही. आम्ही जेव्हा संपत्तीच्या पुनर्वाटपाची चर्चा करतो, तेव्हा आम्ही अशा नव्या धोरणांचा विचार करत असतो, ज्यांचा फायदा काही मूठभर श्रीमंतांना न होता गरीबांना होईल”, असंही सॅम पित्रोदा यांनी यावेळी नमूद केलं होतं.

पित्रोदांच्या विधानावर वाद, मोदींची टीका

दरम्यान, पित्रोदा यांच्या विधानावर लागलीच प्रतिक्रिया उमटू लागल्या. मोदीं त्यांच्या या विधानावरून काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. “रॉयल फॅमिली आणि त्यांच्या प्रिन्सचे सल्लागार (सॅम पित्रोदा) काही काळापूर्वी म्हणाले होते की देशातील मध्यम वर्गावर अधिक कर लादले जायला हवेत. काँग्रेस म्हणते ते आता वारसा कर लागू करणार. तुमच्या मुलांना तुमच्या कष्टाची कमाई मिळणार नाही. ते सगळं काँग्रेसच्या घशात जाणार”, असं मोदी छत्तीसगडमधील एका सभेत म्हणाले.

काँग्रेसची शकले आणि इंदिरा गांधींचा उदय; लोकसभेची चौथी निवडणूक कशी झाली?

सॅम पित्रोदांचं स्पष्टीकरण

दरम्यान, विधानावरून वाद निर्माण झाल्यानंतर सॅम पित्रोदांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. एक्सवर त्यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये आपल्या विधानाचा गैरअर्थ काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसच्या जाहीरनाम्याविषयी खोटा प्रचार करत आहेत. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी गोदी मीडियानं माझ्या वैयक्तिक पातळीवर केलेल्या विधानाचा गैरअर्थ काढून त्यावर टीका-टिप्पणी सुरू केली. हे दुर्दैवी आहे”, असं पित्रोदांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“त्या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माझं वैयक्तिक मत म्हणून मी वारसा कराचा मुद्दा उपस्थित केला होता. मी तथ्यही मांडू शकत नाही का? मी तेव्हा म्हटलं की अशा प्रकारच्या मुद्द्यांचा विचार लोकांनी करायला हवा. याचा काँग्रेसच्या धोरणाशी काहीही संबंध नाही”, असं पित्रोदा यांनी म्हटलं आहे. “कोण म्हटलं ५५ टक्के संपत्ती ताब्यात घेतली जाणार? कोण म्हटलं हे असं काही भारतात होणार आहे?” असे सवालही त्यांनी केले आहेत.