आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालीवाल यांना काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव बिभव कुमार यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला असून बिभव कुमार यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

आता खासदार स्वाती मालीवाल यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना या घटनेबाबात पत्र लिहिलं आहे. खासदार स्वाती मालीवाल यांनी इंडिया आघाडीतील काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना हे पत्र लिहिले आहे. तसेच इंडिया आघाडीच्या या नेत्यांकडे भेटीची वेळ मागितली असल्याचं स्वाती मालीवाल यांनी म्हटलं आहे.

स्वाती मालीवाल यांनी काय म्हटलं?

“मी गेल्या १८ वर्षांपासून काम करत आहे. तसेच ९ वर्षामध्ये महिला आयोगात काम करत असताना तब्बल २.७ लाख केसेस ऐकल्या आहेत. तसेच कोणालाही न घाबरता आणि कोणाचीही भीती न बाळगता महिला आयोगाचं अतिशय चांगलं काम केलं. मात्र, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी मला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर आता माझ्या चारित्र्याची बदनामी करण्यात येत आहे. हे खूप खेदजनक आहे”, असं स्वाती मालीवाल यांनी म्हटलं.

हेही वाचा : राहुल गांधींचा लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदास नकार? ‘या’ तीन तडफदार नेत्यांच्या नावांची चर्चा

स्वाती मालिवाल यांचे आरोप काय?

दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालिवाल यांच्यावर १३ मे रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव बिभव कुमार यांनी हल्ला करत गैरवर्तन केल्याचा आरोप स्वाती मालिवाल यांनी केला आहे. यानंतर त्यांनी गुन्हा दाखल करत कारवाईची मागणी केली. त्यानंतर आम आदमी पक्षाकडून यावर स्पष्टीकरणही देण्यात आलं होतं. स्वाती मालिवाल यांच्या आरोपानंतर दिल्ली पोलिसांनी बिभव कुमार यांना अटक केली होती. बिभव कुमार हे सध्या तुरुंगात असून दिल्ली न्यायालयाने जामीन मंजूर केलेला नाही.

दरम्यान, स्वाती मालिवाल यांनी केलेल्या आरोपानंतर भारतीय जनता पार्टीने आम आदमी पक्षावर हल्लाबोल करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. तसेच या महिला संरक्षणासंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते. या संदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बोलणं टाळलं होतं.

कोण आहेत स्वाती मालीवाल?

स्वाती मालीवाल या आपच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक आहेत. त्या आता राज्यसभेवर खासदार आहेत. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेकांचे लक्ष वेधून घेतले. २०१५ मध्ये वयाच्या ३१ व्या वर्षी त्यांची महिला आयोगाच्या प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली. हे पद भूषवलेल्या त्या सर्वात तरुण महिला ठरल्या. त्यांनी आपल्या कार्यकाळात दिल्लीतील मुली आणि महिलांवरील गुन्ह्यांची १.७ लाखांहून अधिक प्रकरणे हाताळली.