‘खोटं बोलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये येत आहेत’, अशा शब्दांत राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी टीका केली. ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लालूप्रसाद यांनी खोचक शब्दात पंतप्रधानांवर टीका केली आहे. ‘तुम्हाला खोटं ऐकायचं आहे का’? असा सवाल लालू यांनी मतदारांना केला आहे.

‘गुरुत्वाकर्षणाचं बल माणसाला जमिनीकडे खेचतं. त्याच धर्तीवर निवडणूकर्षणाचं बल माणसाला बिहारकडे खेचून घेऊन येतं’, अशा सूचक शब्दाल लालूंनी पंतप्रधानांच्या बिहार भेटीवर टीका केली आहे.

महाराष्ट्र व हरियाणापाठोपाठ दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकून विजयाच्या गतीवर स्वार झालेल्या भाजपाने आता आपलं लक्ष्य बिहारच्या निवडणुकीकडं वळवलं आहे. बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असून नितीश कुमार हे मुख्यमंत्री आहेत. आगामी निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी लालू प्रसाद यादव यांनी महाआघाडीची मोट बांधली आहे. या आघाडीत राष्ट्रीय जनता दलासह काँग्रेस व इतर मित्रपक्षांचा समावेश आहे.

बिहारमध्ये निवडणूक आयोगाने मतदार याद्यांची फेरतपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या या भूमिकेमुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागू शकतं, असा आरोप काँग्रेसने केला आहे. दुसरीकडे भाजपालाही या मोहिमेचा दबाव जाणवू लागला असून अनेक नेते चिंताग्रस्त असल्याचं दिसून येत आहे.

बिहारमध्ये भाजपाचे संख्याबळ किती?

२०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाने ११० पैकी ७४ जागांवर दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षाने आरजेडीकडून कुधनी विधानसभेची जागा हिसकावून घेतली. ज्यामुळे बिहार विधानसभेत भाजपाची आमदारांची संख्या ७५ झाली. एवढ्यावरच न थांबता भाजपाने विकासशील इंसान पार्टीचे तीन आमदार फोडले आणि आमदारांची संख्या ७८ वर नेली. २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाने आणखी दोन जागांवर विजय मिळवला. अशाप्रकारे भाजपाकडे आता कागदावर एकूण ८० आमदार आहेत.