Karnataka Vidhan Sabha Election Results 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. कर्नाटकात काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. काँग्रेस १३० जागांच्यावरती आघाडीवर दिसत आहे. तर, भाजपाला ७० जागांचा आकडाही पार करताना मोठी दमछाक होता आहे. त्यामुळे सत्तेत असलेल्या भाजपाला मोठा धक्का मानला जातोय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, विविध राज्यातील मोठे नेते भाजपाने कर्नाटकात प्रचारासाठी उतरवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दोन दिवस रोड शो केला होता. तरीही कर्नाटकात भाजपाला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं आहे. त्यामुळे भाजपाच्या कर्नाटकातील पराभवाची सहा कारणे जाणून घेणार आहोत. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलं आहे.

हेही वाचा : कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालांचे ‘पाच’ कळीचे मुद्दे

प्रभावी चेहरा नसणे – कर्नाटकात भाजपाच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण म्हणजे प्रभावी चेहरा नसणे आहेत. भाजपाने येडियुरप्पा यांना हटवत बसवराज बोम्मईंना मुख्यमंत्रीपदी बसवलं. पण, बसवराज बोम्मई प्रभाव पाडू शकले नाहीत. काँग्रेसकडे डी.के शिवकुमार आणि सिद्धरामय्यासारखे प्रभावी चेहरे होते. त्यामुळे बोम्मईंच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणे भाजपाला महागात पडलं आहे.

भ्रष्टाचार – भाजपाच्या पराभवाच्या कारणात भ्रष्टाचाराचा मुद्दाही होता. काँग्रेसने सुरूवातीपासून ‘४० टक्के कमिशन’चा मुद्दा उपस्थित करत भाजपाविरोधात जोरदार प्रचार केला. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून एस. ईश्वराप्पा यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर, भाजपाच्या एका आमदाराला तुरुंगात जावं लागलं होतं. राज्यातील कंत्राटदारांनी कमिशनच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडं तक्रारही केली होती. पण, भाजपाला यावर कोणताही तोडगा काढण्यात आला नाही.

सामाजिक समीकरण गडबडलं – कर्नाटकात भाजपाला सामाजिक समीकरणाचा समतोल राखता आला नाही. भाजपाला आपली मूळ मतपेठी असलेल्या लिंगायत समाजाला बरोबर ठेवता आलं नाही. तसेच, दलित, आदिवासी, ओबीसी आणि वोक्कलिंगा समाजावर प्रभाव पाडला आला नाही. दुसरीकडे मुस्लीम, दलित, ओबीसींना घट्ट बांधून ठेवत लिंगायत समाजाची मते मिळवण्यात काँग्रेस यशस्वी ठरलं आहे.

धार्मिक ध्रुवीकरण चाललं नाही – गेल्या एक वर्षापासून कर्नाटकातील भाजपा नेते हलाल, हिजाब आणि अजानचे मुद्दे उपस्थित करत होते. विधानसभा निवडणुकीला सुरूवात झाल्यावर हनुमानावरून राजकारण चांगलंच तापलं होतं. काँग्रेसने बजरंग दलावर बंदी घालण्याचं आश्वासन दिलं होतं. पण, भाजपाने हा वाद थेट हनुमानाशी जोडत अपमान केल्याचा प्रचार केला. तसेच, भाजपाने हिंदुत्वाच्या कार्डचाही वापर केला. पण, भाजपाच्या धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न चालले नाहीत.

येडियुरप्पांना बाजूला करणं पडलं महागात – कर्नाटकात भाजपाला उभारी देणारे माजी मुख्यमंत्री बी. एस येडियुरप्पा या निवडणुकीत बाजूला राहिल्याचं पाहायला मिळालं. तर, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना भाजपाने तिकीट नाकारलं होतं. त्यामुळे दोन्ही मोठे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करत निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. येडियुरप्पा, शेट्टर, सवदी हे तिघेही लिंगायत समाजातील मुख्य नेते समजले जातात. मात्र, त्यांच्याकडं दुर्लक्षित करणं भाजपाला चांगलंच महागात पडलं आहे.

हेही वाचा : जुन्या व स्थानिक निष्ठावंत नेत्यांना डावलल्याचा भाजपला फटका?; महाराष्ट्रासाठीही भाजपला हा सूचक इशारा

नागरिकांचा रोष ओळखण्यास सरकार अपयशी – सत्तेत असलेल्या भाजपाच्या पराभवाचं प्रमूख कारण म्हणजे, राज्यातील नागरिकांचा सरकार विरोधात असणारा रोष. भाजपाच्या सरकारवर नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी होती. नागरिकांची नाराजी दूर करण्यात भाजपा सपशेल अपयशी ठरली. त्यामुळे कर्नाटकात भाजपाला मोठ्या पराभवाला सामोर जावं लागलं आहे.