देशातील पाच राज्यांमध्ये मतदानप्रक्रिया पार पडल्यानंतर आता रविवारी (३ डिसेंबर) विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. तोपर्यंत मधल्या दोन दिवसांत अनेक संस्थांचे मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) निष्कर्ष जाहीर करण्यात आले. परंतु, एक्झिट पोलचा आतापर्यंतचा अनुभव असे दर्शवितो की, त्यात अचूकतेची कोणतीही हमी नसते. याच पाच राज्यांत २०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोलची सरासरी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मूळ निकालाच्या जवळपास जाणारी दिसली. तर तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराममध्ये एक्झिट पोलचे अंदाज बऱ्याच फरकाने चुकीचे ठरले. यानिमित्ताने मागच्या निवडणुकातील एक्झिट पोलच्या अंदाजावर एक नजर टाकू.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजस्थानमध्ये काँग्रेस विजयी, तर मध्य प्रदेशमध्ये त्रिशंकू

राजस्थानच्या मतदानानंतर सर्वच एक्झिट पोल्सनी काँग्रेस १०० हून अधिक (विधानसभेच्या एकूण जागा २००) जागा जिंकून बहुमत सिद्ध करेल, असे अंदाज वर्तविले होते. पाच एक्झिट पोलची सरासरी काढली, तर काँग्रेसच्या वाट्याला ११७ जागा येत होत्या. न्यूज नेशन या एक्झिट पोलने १०० जागांचा अंदाज व्यक्त केला होता, जो सर्वात जवळपास जाणारा होता. तर रिपब्लिक-सीव्होटर आणि इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया यांनी काँग्रेसचा मोठा विजय होईल, असा अंदाज व्यक्त केला होता.

हे वाचा >> Exit Polls 2023 Result : राजस्थानात भाजपा तर तेलंगणात काँग्रेसची मुसंडी, मध्य प्रदेश-छत्तीसगडमध्ये काँटे की टक्कर; वाचा एग्झिट पोल्सचे अंदाज!

भाजपाबाबत एक्झिट पोलच्या सरासरी जागा ७६ (प्रत्यक्ष निकालात भाजपाला ७३ ठिकाणी विजय मिळाला) असतील, असा अंदाज व्यक्त केला होता. न्यूज नेशन यांनी भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत होईल, असे सांगून भाजपाला ८९-९३ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला. तर इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया यांनी भाजपाला ७२ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला होता, जो निकालाच्या सर्वात जवळ जाणारा होता.

तथापि, अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांना किती ठिकाणी विजय मिळेल, याचा अचूक अंदाज अनेक एक्झिट पोल्सना वर्तविता आला नाही. मागच्या निवडणुकीत अपक्षांनी १३, तर बहुजन समाज पक्षाने सहा ठिकाणी विजय मिळविला.

मध्य प्रदेश

मध्य प्रदेशमध्ये सात मोठ्या एक्झिट पोल्सने काँग्रेसवर भाजपाचा निसटता विजय होईल, असे भाकीत वर्तविले होते. फक्त एबीपी न्यूज-सीएसडीएसने काँग्रेसला बहुमत प्राप्त होईल, असा अंदाज व्यक्त केला होता; तर इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया, टाइम्स नाऊ-सीएनएक्स आणि इंडिया-सीएनएक्सने भाजपाला बहुमत मिळेल, असे सांगितले होते.

निकालानंतर काँग्रेसने ११४ जागा जिंकल्या होत्या. बहुमतापासून त्यांना केवळ एक जागा कमी मिळाली होती आणि भाजपापेक्षा पाच जागा जास्त मिळाल्या होत्या. सातपैकी चार एक्झिट पोलनी काँग्रेस आणि भाजपामध्ये अवघ्या काही जागांचे अंतर असेल असे अंदाज व्यक्त केले होते.

तेलंगणा, छत्तीसगड, मिझोराममध्ये चुकीचे अंदाज

तेलंगणा

तेलंगणामध्ये पाच मोठ्या एक्झिट पोल्सनी भारत राष्ट्र समितीला (BRS) बहुमत मिळेल, असे सांगितले होते. मात्र, बीआरएसचा विजय किती मोठा असेल म्हणजे त्यांना किती जागा मिळतील, याचे भाकीत वर्तविता आले नाही. एक्झिट पोल्सनी बीआरएसला दिलेल्या जागांची सरासरी काढली तर ती ६८ वर पोहोचत होती. मात्र, निकालानंतर प्रत्यक्षात बीआरएसला ११९ विधानसभांपैकी ८८ मतदारसंघात विजय मिळाला. काँग्रेसबाबतही एक्झिट पोल्सचे अंदाज पूर्णपणे चुकले. काँग्रेसला ३९ जागा मिळतील, असे एक्झिट पोल्सनी वर्तविले. मात्र, निकालानंतर काँग्रेसला केवळ १९ जागा मिळाल्या.

हे ही वाचा >> Rajasthan Exit Poll : काँग्रेसला इतिहास रचण्याची संधी? ‘या’ एग्झिट पोलने सगळ्यांनाच केलं चकित

इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया आणि तेलंगणामधील प्रादेशिक सर्व्हे करणाऱ्या टीव्ही ९ तेलगू-आरा या दोन संस्थांचा अंदाज सर्वात जवळ जाणारा होता. त्यांनी बीआरएस पक्षाला अनुक्रमे ७९-८१ आणि ७५-५८ जागा मिळतील असे सांगितले होते. याउलट न्यूज एक्स-नेता आणि रिपब्लिक-सीव्होटर यांनी बीआरएस आणि काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना होईल असे सांगितले. दोन्ही पोल्सनी काँग्रेसला अनुक्रमे ४६ आणि ४७-५९ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला होता.

छत्तीसगड

छत्तीसगडमध्ये सात एक्झिट पोल्सनी भाजपा आणि काँग्रेसला सरासरी ४२ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला होता. मात्र, जेव्हा निकाल आले तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ९० विधानसभा मतदारसंघ असलेल्या छत्तीसगडमध्ये काँग्रेसने ६८ जागा जिंकत भक्कम बहुमत प्राप्त केले, तर १५ वर्ष सत्ता गाजविणाऱ्या भाजपाला केवळ १५ जागांवर समाधान मानावे लागले.

इंडिया टुडे-एक्सिस इंडियाने काँग्रेसबाबत केलेले भाकीत अचूक ठरले. मात्र, तरीही त्यांनी भाजपाबाबत सांगितलेले आकडे चुकीचे निघाले. केवळ रिपब्लिकन-सीव्होटरने काँग्रेसला बहुमत प्राप्त होईल, असा अचूक अंदाज वर्तविला. टाइम्स नाऊ-सीएनएक्स, एबीपी न्यूज-सीएसडीएस आणि इंडिया टीव्ही-सीएनएक्स यांनी भाजपाला बहमुत मिळेल, असे भाकीत वर्तविले होते.

आणखी वाचा >> Exit Poll 2023: निवडणुकांसाठी सट्टाबाजाराचाही एग्झिट पोल! काय असेल ५ राज्यांमधलं चित्र? हर्ष गोएंकांनी शेअर केले आकडे

मिझोराम

मिझोराममध्ये तीन एक्झिट पोल्सनी सत्ताधारी काँग्रेस किंवा त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी मिझो नॅशनल फ्रंट (MNF) या दोघांनाही स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे सांगितले. रिपब्लिक-सीव्होटर आणि इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाने एमएनएफला काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळतील, असे भाकीत वर्तविले होते. ४० विधानसभा मतदारसंघ असलेल्या मिझोराममध्ये एमएनएफने २७, तर काँग्रेसने केवळ जागा जिंकण्यात यश मिळविले.

सर्व तीन एक्झिट पोल्सने काँग्रेसबाबत व्यक्त केलेले अंदाज जास्त असल्याचे दिसून आले. त्यातही इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाने ‘झोरम पिपल्स मुव्हमेंट’ (ZPM) या पक्षाला ८-१२ जागांचा लाभ होईल, असा अंदाज व्यक्त केला होता, तो खरा निघाला. झोरमने निवडणुकीत आठ जागांवर विजय मिळविला.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How accurate were exit polls in 2018 assembly elections kvg