Vidhan Sabha Election Exit Polls 2023 Result Update: पाच राज्यांच्या निवडणुकांसाठीचं मतदान पार पडलं आहे. ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. राजस्थानमध्ये २०० जागांसाठी मतदान झालं आहे. १०१ जागा ही बहुमताची संख्या आहे. यात बाजी कोण मारणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे. राजस्थानबाबत काही एग्झिट पोल म्हणत आहेत की तिथे भाजपाची सत्ता येईल. अशात एका पोलने सगळ्यांनाच चकीत केलं आहे.
‘अॅक्सिस माय इंडिया’च्या पोलमुळे सगळेच चकित
‘अॅक्सिस माय इंडिया’ने म्हटलं आहे की राजस्थानमध्ये काँग्रेस इतिहास घडवणार. राजस्थानात काँग्रेसला ८६ ते १०६ जागा मिळतील असा अंदाज या पोलने वर्तवला आहे. तर दुसरीकडे भाजपाला ८० ते १०० जागांवर समाधान मानावं लागेल असं म्हटलं आहे. राजस्थानबाबत असा अंदाज वर्तवणारा हा आत्तापर्यंतचा एकमेव एग्झिट पोल आहे.
टोटलचा पोल काय सांगतो?
‘टोटल’ एग्झिट पोलच्या अंदाजानुसार राजस्थानमध्ये कमळ फुलणार आहे. भाजपाला ११५ च्या आसपास जागा मिळतील आणि काँग्रेसला ७१ जागांवर समाधान मानावं लागेल असं म्हटलं आहे. हे अंदाज एग्झिट पोलचे आहेत. मुळात कुठल्या राज्यात काय होणार हे चित्र ३ डिसेंबरला स्पष्ट होणार आहे.
इतर पोल काय सांगत आहेत?
‘टाइम्स नाऊ’चा एग्झिट पोल हे सांगतो आहे की राजस्थानात भाजपाचं सरकार येईल. या पोलने भाजपाला १०८ ते १२८ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे तर काँग्रेसला ५६ ते ७२ जागांवर समाधान मानावं लागेल असा अंदाज वर्तवला आहे.
‘जन की बात’ या एग्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपाला १०० ते १२२ जागा राजस्थानात मिळतील हा अंदाज आहे तर काँग्रेसला ६२ ते ८५ जागांवर समाधान मानावं लागेल असा अंदाज वर्तवला आहे. तर इतरांच्या खात्यात १४ ते १५ जागा जातील असंही म्हटलं आहे.