लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा १ जून म्हणजेच येत्या शनिवारी पार पडतो आहे. यानंतर मंगळवारी म्हणजेच ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. भाजपाने एनडीएसह ४०० पारचा नारा दिला आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीसह काँग्रेसनेही बहुमत मिळेल आणि आमचंच सरकार येईल हा दावा केला आहे. नेमकं काय घडतं याची उत्सुकता ताणली गेली आहे आणि ४ जूनलाच कुणाचं सरकार देशात येणार हे स्पष्ट होणार आहे. अशात जयराम रमेश यांनी एक महत्त्वाचा दावा केला आहे.

इंडिया आघाडीचे पाच वर्षांत पाच पंतप्रधान, असा राऊत आणि ठाकरेंचा दावा

जयराम रमेश यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला एक सविस्तर प्रतिक्रिया या बाबत दिली असली तरीही याआधी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी पाच वर्षांत पाच पंतप्रधान असतील असा दावा केला आहे. याची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाने खिल्लीही उडवली. अशात आता जयराम रमेश यांनी जे वक्तव्य केलं त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

काय म्हणाले जयराम रमेश?

“मी निश्चित एक संख्या आत्ता सांगत नाही. पण आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल. २७३ ही लोकसभेची मॅजिक फिगर आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. आम्ही संख्याबळाच्या पुढे जाऊ हे स्पष्टपणे सांगू शकतो. १ जून रोजी इंडिया आघाडीची बैठक पार पडते आहे. मी त्याबद्दल फार माहीत नाही. पण एक सांगू इच्छितो की २००४ मध्ये आम्ही जिंकलो तेव्हा मनमोहन सिंग यांचं नाव ४८ तासांमध्ये ठरलं होतं. सोनिया गांधींनी पंतप्रधान होण्यास नकार दिला. ज्यानंतर आमच्यात चर्चा झाली आणि ४८ तासांत मनमोहन सिंग हे नाव नक्की झालं. यावेळी तितकाही वेळ लागणार नाही. निकालानंतर काही वेळातच आम्ही पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवू. ज्या पक्षाच्या सर्वाधिक जागा येतील त्या पक्षाचा नेता पंतप्रधान होईल हे स्पष्ट आहे. इंडिया आघाडीत अनेक पक्ष आहेत. त्यांच्यापैकी ज्या पक्षाच्या सर्वाधिक जागा येतील त्या पक्षाकडे पंतप्रधानपद असेल.” असं जयराम रमेश यांनी स्पष्ट केलं आहे. पीटीआयशी त्यांनी काही वेळापूर्वी संवाद साधला.

हे पण वाचा- अंबानी, अदाणी नावांचा उल्लेख करत राहुल गांधींवर पंतप्रधान मोदींची खोचक टीका; म्हणाले, “निश्चितपणे काहीतरी…”

राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचा चेहरा असतील का?

राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे इंडिया आघाडीचे उमेदवार असतील का? हे विचारलं असता, जयराम रमेश म्हणाले “पंतप्रधान पदाच्या नावाची घोषणा करण्याची एक प्रक्रिया आहे. पंतप्रधान पदाचा चेहरा निवडणं म्हणजे काही सौंदर्य स्पर्धा नाही. आमचा पक्ष लोकशाही मानणारा पक्ष आहे. आमच्यासाठी एक व्यक्ती नाही तर पक्ष महत्त्वाचा आहे. पक्ष ज्या नेत्याची निवड करेल तोच नेता पंतप्रधान होतो.” असं उत्तर जयराम रमेश यांनी दिलं आहे.