लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय उलथापलथी घडत आहेत. भाजपाला महाराष्ट्रात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. परंतु, देवेंद्र फडवणीसांनी जबाबदारीतून मुक्त होऊ नये असं मत त्यांच्या पक्षातील अनेकांनी व्यक्त केले आहे. याबाबत आज जयंत पाटलांनाही प्रश्न विचारण्यात आला. परंतु, त्यांनी बावनकुळे यांच्याविषयी चिंता व्यक्त केली.

“भाजपाला राज्यात अपेक्षेपेक्षा खूपच कमी जागा मिळाल्या. निवडणूक माझ्या नेतृत्त्वाखाली लढली गेल्याने अपयशाची जबाबदारी माझीच आहे. भविष्यातील त्रुटी दूर केल्या जातील. या अपयशाची जबाबादीर स्वीकारून उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती पक्षश्रेष्ठींना करणार आहे”, असं देवेंद्र फडणवीस बुधवारी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. त्यांनी जबाबदारीतून मुक्त होऊ नये असं मत व्यक्त करण्यात येत आहे. तसंच, या अपयशाची सामूहिक जबाबदारी असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा >> लोकसभेनंतर आता विधानसभेचे वेध, मविआने ठेवलं ‘इतक्या’ जागांचं लक्ष्य! जयंत पाटील म्हणाले…

आज शरद पवार गटाच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर शरद पवार गटाने पत्रकार परिषदही घेतली. या परिषदेत जयंत पाटलांना देवेंद्र फडणवीसांबाबत प्रश्न विचारण्यात आला. मात्र, यावर ठोस उत्तर देण्यापेक्षा त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “मला त्याविषयी काही बोलायचं नाही. आम्हाला त्यांच्याविरोधात लढायचं आहे. कोण कोणत्या भूमिकेत आहे याला महत्त्वं नाही. मला फक्त काळजी बावनकुळेंची वाटतेय.”

महाराष्ट्र सरकारवर जनता जास्त नाराज

केंद्र सरकार पेक्षा महाराष्ट्र सरकारबाबत लोकांची अधिक नाराजी असल्याचं आमच्या सर्वेक्षणात समोर आलं आहे. हे चित्र महाराष्ट्रभर आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसेल असा माझा विश्वास आहे. जीएसटी सारख्या अनेक गोष्टी आहेत ज्यावर लोक नाराज आहेत. काँग्रेस सरकार असताना अशी परिस्थिती नव्हती. तसंच आम्हाला जे यश मिळालं आहे ते शरद पवारांमुळे. शरद पवार ज्या बाजूला असतात तिथे स्ट्राईक रेट जास्तच असतो असंही जयंत पाटील म्हणाले.

हेही वाचा >> Lok Sabha Election Result 2024 Live Updates : देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल, थोड्याच वेळात अमित शाहांची भेट घेणार

एक्झिट पोलचे आकडे शेअर मार्केट मॅन्यूपुलेट करण्यासाठी

“एक्झिट पोलचे आकडे हे शेअर मार्केट मॅन्यूपलेट करण्यासाठी वापरले जातात. त्याच्यावर विश्वास ठेवू नये असे मी आधीच सांगितलं होतं. पण या एक्झिट पोलला काही अर्थ नाही. १० पैकी ८ जागांवर राष्ट्रवादीचा विजय झाला असून सर्वात जास्त आमचा स्ट्राईक रेट राहिला आहे. मी सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो.” असंही जयंत पाटील म्हणाले.