वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची मविआशी जागावाटपाची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर वेगळी चूल मांडत स्वतंत्र निवडणूक लढविण्याची घोषणा केली. तसेच त्यांनी मविआच्या विरोधात उमेदवारही उभे केले. त्यांच्या या निर्णयावर मविआकडून सावध भूमिका घेण्यात आली. मात्र महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी मात्र वंचित बहुजन आघाडीच्या पवित्र्यावर सडकून टीका केली आहे. त्यामुळे इतिहासातील प्रसिद्ध अशा ‘आंबेडकर विरुद्ध गांधी’ या वादाची पुन्हा एकदा महाराष्ट्राला आठवण झाली.

काय म्हणाले तुषार गांधी?

साम या वृत्तवाहिनीशी बोलताना तुषार गांधी म्हणाले की, भाजपाच्या युतीला गद्दारांची युती म्हटले पाहीजे. या गद्दाराच्या युतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीचा विजय झाला पाहीजे. यासाठी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नये, असे आवाहन तुषार गांधी यांनी केले. याबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले, “आमची कितीही चांगली मैत्री असली तरी जे चूक आहे, त्याला चूकच म्हणायची आता स्पष्ट वेळ आली आहे. यापूर्वी जी चूक झाली, तीच पुन्हा होऊ शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान जपायचे असेल तर ही शेवटची संधी आहे.”

‘विरोधकांच्या मागे लागणे भाजपाची नवी संस्कृती’, शिंदे गटाच्या आरोपाला चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर

वंचितचा तुषार गांधींवर पलटवार

तुषार गांधी यांच्या टीकेनंतर वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी यावर भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, “प्रस्थापित पक्ष आणि त्या पक्षांच्या राजकारणाला मदत करणारे सहयोगी घटक शोषित आणि वंचितांचे राजकारण उभे राहू नये यासाठी सातत्याने प्रयत्न करत आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा याच पद्धतीने विरोध झाला होता. त्यांनाही इंग्रजांचे हस्तक असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न झाला होता. तेच नरेटिव्ह आता प्रकाश आंबेडकर यांच्याबाबतीत वापरले जात आहे. ज्या शोषित, वंचितांना राजकारणात येऊ दिले जात नाही, ज्यांच्या पालापर्यंत लोकशाही पोहचू दिली जात नाही, त्या घटकांना प्रकाश आंबेडकर मुख्य प्रवाहात आणू इच्छित आहेत, हे इथल्या प्रस्थापितांना सहन होत नाही.”

“तुषार गांधींना आमचा प्रश्न आहे की, भाजपामध्ये गेलेले, भाजपामधून काँग्रेसमध्ये आलेले आणि इकडून तिकडे उड्या मारणाऱ्या पलटूरामांबाबत त्यांचे काय म्हणणे आहे? महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांपैकी कुणीही उद्या भाजपाबरोबर जाणार नाही, याची खात्री तुषार गांधी देऊ शकतात का? आम्हाला बी टीम म्हणणं सोपे आहे. मात्र यांच्याकडचे नेते कधी तिकडे जातील, हे सांगता येत नाही. ज्या काँग्रेसच्या बाजूने तुषार गांधी नेहमी बोलत असतात, त्या काँग्रेसचा प्रवक्ता परवा शिंदे गटात गेला. त्याबाबतीत तुषार गांधींचे काय म्हणणे आहे? माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपामध्ये जातात आणि खडसे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी सोडून पुन्हा भाजपामध्ये जात आहेत, यावर तुषार गांधी यांचे काय म्हणणे आहे?”, अशा प्रश्नांचा भडीमार सिद्धार्थ मोकळे यांनी केला.