महाविकास आघाडीचे रायगड लोकसभेचे उमेदवार आणि माजी खासदार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ रायगडच्या मोर्बा येथे मविआची जाहीर सभा पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे या सभेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनीदेखील या सभेला संबोधित केलं. यावेळी जयंत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) प्रमुख अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. पाटील म्हणाले यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा एकही खासदार निवडून येणार नाही. निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर ते शरद पवारांचे पाय धरायला येतील. मात्र शरद पवारांनी त्यांना पुन्हा पक्षात घेऊ नये.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट पडले आहेत. मात्र सध्या चालू असलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर हे दोन्ही गट एकत्र येतील अशी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पवार कुटुंबाचे समर्थक अजित आणि शरद पवार एकत्र यावेत अशी आशा बाळगून आहेत. तर त्यांचे राजकीय विरोधक सातत्याने दावा करत आहेत की शरद पवार आणि अजित पवार आगामी काळात एकत्र येऊ शकतात. यावर अजित पवार यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले, “२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचं मतदान पूर्ण होऊ द्या. तोवर मला या विषयावर काहीच बोलायचं नाही. कारण माझ्याकडे वेगळ्या प्रकारचा प्रचार चालला आहे. काही लोकांना बुचकाळ्यात टाकण्याकरता आमचे विरोधक वेगवेगळे दावे करत आहेत. हे लोक (आम्ही) पुढे एकत्रच येणार असल्याच्या बाता मारतायत. म्हणूनच मला माझ्या मतदारांना, कार्यकर्त्यांना सांगायचं आहे की, मी माझी भूमिका स्वीकारली आहे तीच भूमिका कायमर राहील.

अनंत गीतेंच्या प्रचारसभेत शेकापचे जयंत पाटील आणि शरद पवार एकाच मंचावर होते. त्यावेळी जयंत पाटील शरद पवारांकडे पाहून म्हणाले, तुम्ही त्या गद्दाराला खूप मोठं केलंत. त्याचं नको तेवढं पोट भरून दिलं आहे. परंतु, आजचं वर्तमानपत्र वाचल्यानंतर माझं मन चलबिचल झालं. अजित पवार बोलू लागले आहेत की, निवडणूक झाल्यावर एकत्र येण्याबाबत सांगतो. या निवडणुकीत त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. त्यानंतर ते तुमचे (शरद पवार) पाय धरायला येतील. मात्र तुम्ही त्यांना तुमचे पाय धरू देऊ नका. नाहीतर तुम्ही त्यांना पाय धरू द्याल आणि आम्हाला इथून बाहेर काढाल. त्यामुळे तुम्ही आम्हाला शब्द द्या.

हे ही वाचा >> पंतप्रधान मोदींच्या हुकूमशाही वृत्तीला कंटाळून १७ लाख कुटुंबांनी देश सोडला, ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आरोपाने खळबळ

शरद पवारांबरोबर एकत्र येण्याबाबत अजित पवार काय म्हणाले होते?

मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, आता लोकसभा निवडणुकीत वेगवेगळे (अजित पवार गट महायुतीबरोबर आणि शरद पवार गट महाविकास आघाडीबरोबर) लढत असलात तरी पाच महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर तुम्ही एकत्र येणार का? तुम्ही अनेकदा राजकारणातल्या तडजोडींबाबत बोलता त्यमुळे आगामी काळात तुमच्याकडून आणखी काही तडजोडी पाहायला मिळू शकतात का? यावर अजित पवार म्हणाले, साहेबांनी (शरद पवार) मला सर्वांना एकत्र येऊन काम करण्यास सांगितलं तर… साहेब मला भरपूर वर्षांपासून काम करताना पाहत आहेत. ते मला म्हणाले की, पुढे तुम्ही सर्वजण एकत्र मिळून काम करा… आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं तर कदाचित… आजही त्यांच्याबरोबर असणाऱ्या आमदारांनी तसा विचार केला आहे. मागील वेळेस सर्वांनी अशा निर्णयावर सह्यादेखील केल्या होत्या. आम्ही सत्ताधारी पक्षाबरोबर जायचं ठरवलं होतं. आता ते लोक काहीही बोलत असले तरी मागे ते लोक सत्ताधाऱ्यांबरोबर जाण्यास तयार होते.