महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून अनेक अनपेक्षित पक्षांतरं झाल्याचं जनतेनं पाहिलं आहे. तसेच दोन मोठे पक्ष फुटून चार गट पडल्याचंदेखील पाहिलं आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करून भाजपात प्रवेश केला तेव्हा त्यांच्या पक्षप्रवेशाची खूप चर्चा झाली. आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते एकनाथ खडसे स्वगृही अर्थात भारतीय जनता पार्टीत परतणार आहेत. स्वतः खडसे यांनी तशी घोषणा केली आहे. एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे या भाजपात असून त्यांना भाजपाने यंदा तिसऱ्यांदा रावेरमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. एकनाथ खडसे भाजपात जाणार असल्यामुळे आता त्यांची कन्या रोहिणी खडसे यादेखील भाजपात परतणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. रक्षा खडसे यांनी त्यांच्या नणंदेला भाजपात येण्याचं आवाहनही केलं आहे. या सर्व चर्चांवर रोहिणी खडसे यांनी उत्तर दिलं आहे.

रोहिणी खडसे म्हणाल्या, “मी आधीही माझी भूमिका स्पष्ट केली आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांच्याबरोबर राहून पक्षासाठी काम करणार आहे. मी याच पक्षाच्या विचारधारेवर भविष्यातही काम करणार आहे. माझ्या भूमिकेबाबत कोणाच्याही मनात संभ्रम असण्याचं काही कारण नाही. याच पक्षात राहून मी माझी २०२४ ची विधानसभेची निवडणूक लढवणार आहे.” रोहिणी खडसे यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी त्यांनी त्यांच्याबद्दल रंगत असलेल्या राजकीय चर्चांवर प्रतिक्रिया दिली.

रोहिणी खडसे यांना यावेळी प्रश्न विचारण्यात आला की, रक्षा खडसे भाजपाच्या लोकसभेच्या उमेदवार आहेत आणि तुम्ही त्यांच्याविरोधात उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा प्रचार करणार आहात. त्यामुळे बारामतीप्रमाणे रावेरमध्ये तुमच्या कुटुंबात सामना रंगणार असल्याची चर्चा आहे. यावर काय सांगाल. या प्रश्नावर रोहिणी खडसे म्हणाल्या, इथे बारामतीसारखी परिस्थिती नाही. रावेरमध्ये विचारांची लढाई आहे, कुटुंबाची नाही. रक्षा खडसे भाजपाच्या विचारधारेवर निवडणूक लढवत आहेत आणि मी शरद पवारांच्या विचारांवर काम करतेय. मी कुठल्याही व्यक्तीविरोधात निवडणूक लढवत नाहीये. विचारधारेला घेऊन आम्ही दोघी निवडणुकीला सामोऱ्या जात आहोत. माझा लोकांवर विश्वास आहे, लोक महाविकास आघाडीच्या पाठिशी उभे राहतील.

हे ही वाचा >> “ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा

२१ ऑक्टोबर २०२० रोजी एकनाथ खडसे यांनी भाजपाकडून मिळत असलेल्या चुकीच्या वागणुकीवर बोट ठेवून भाजपाला रामराम केला होता. त्यानंतर दोनच दिवसांत त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून एकनाथ खडसेंनी सातत्याने भारतीय जनता पक्ष व पक्षातील नेतेमंडंळींवर तोंडसुख घेण्याची एकही संधी सोडलेली नाही. जळगावमध्ये गिरीश महाजन यांच्यावर त्यांनी सातत्याने हल्लाबोल केला आहे. मात्र, आता लोकसभा निवडणुकीच्या आधी एकनाथ खडसे स्वगृही परतत आहेत. एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम केला तेव्हा त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे भाजपात थांबल्या. तर त्यांची क्न्या रोहिणी खडसे या एकनाथ खडसेंबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी झाल्या होत्या. आता खडसे भाजपात परत जात आहेत. मात्र त्यांच्या मुलीने राष्ट्रवादीतच थांबण्याचा निर्णय घेतला आहे.