राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जुलै २०२३ मध्ये फुटला. ४० हून अधिक आमदारांना बरोबर घेत अजित पवारांनी थेट शरद पवारांनाच आव्हान दिलं आणि महायुतीमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. २०१९ मध्ये जो प्रयत्न त्यांनी केला होता ते बंड शरद पवारांनी मोडून काढलं होतं. ते सगळं शरद पवारांच्या सांगण्यावरुनच आपण केलं होतं असाही खुलासा अजित पवार यांनी केला आहे. तर आता देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार हे अजित पवारांना व्हिलन ठरवत होते असा दावा केला आहे. तसंच अजित पवारांवर जे आरोप त्यांनी केले होते त्याचंही उत्तर दिलं आहे.

अजित पवारांबाबतच्या आरोपांवर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले तो काळ २००९ ते २०१२ या वर्षांमधला होता. त्यावेळी ते राज्यात मंत्री होते. मी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात आली. तपासात मी केलेले आरोप खरे असल्याचंही समोर आलं. त्यानंतर भ्रष्टाचार करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आलं. काहींना शिक्षा झाली तर काहींना बडतर्फ करण्यात आलं. अजित पवार हे तेव्हा त्या विभागाचे प्रमुख होते. मात्र संपूर्ण तपासात त्यांचा थेट संबंध आढळून आला नाही. त्यामुळे त्यांचं नाव आरोपपत्रात नव्हतं. हे प्रकरण २०१२ चं आहे. अजित पवार हे आमच्याबरोबर आत्ता आले आहेत.”

हे पण वाचा- विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील?, देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, म्हणाले; “ही महत्त्वाकांक्षा..”

मोदींच्या सभा जास्त होत आहेत कारण..

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यावेळच्या सभा या जास्त होत आहेत याचं महत्त्वाचं कारण तशी मागणी आहे. लोकांना मोदींना ऐकायचं आहे. त्याचप्रमाणे प्रचाराला चांगला वेळ मिळाल्याने सभांची संख्या वाढली आहे. मागच्या निवडणुकीला म्हणजेच २०१९ मध्ये एकच शिवसेना होती आता एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे त्यामुळे मतं काही प्रमाणांत विभागली जाणार आहेत असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच अजित पवारांना शरद पवारांनी कायमच व्हिलन ठरवलं” असंही त्यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे.

शरद पवारांनी अजित पवारांना कायमच व्हिलन ठरवलं

“शरद पवारांना भाजपासह युती करायची होती. तीनवेळा त्यांनी यासंदर्भातला निर्णय घेतला होता आणि नंतर तो फिरवला. याबाबत आता मला असं वाटतं की शरद पवार हे नेहमी अजित पवारांना पुढे करायचे आणि त्यांना सगळ्या गोष्टींसाठी व्हिलन करत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी शरद पवारांनी जशी मेहनत घेतली त्याचप्रमाणे त्यांच्या बरोबरीने अजित पवारांनी मेहनत घेतली. अजित पवारांना व्हिलन केलं म्हणजे आपल्याला घरात कुणाला तरी हिरो करता येईल हे शरद पवारांना हवं होतं. कारण पक्षावर त्यांना त्यांचीच सत्ता हवी होती.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.