पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील एका सभेला संबोधित करताना महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि अल्पसंख्यांकांवरून केलेल्या वक्तव्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराची दिशा वेगळ्याच बाजूने गेली आहे. पहिल्या टप्प्यात गॅरंटीवर बोलणारे पक्ष आता धार्मिक विषयावर बोलू लागले. “देशात काँग्रेसची सत्ता आली तर ते लोक तुमची संपत्ती, मौल्यवान वस्तू आणि हिंदू महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्रं जास्त मुलांना जन्म घालणाऱ्यांना दिली जातील”, असं विधान पंतप्रधान मोदींनी केलं होतं. या विधानावर इंडिया आघाडीकडून टीकाही झाली होती. आता शिवसेना उबाठा गटाचे मूखपत्र मानल्या जाणाऱ्या सामना दैनिकाच्या अग्रलेखातूनही पंतप्रधानांच्या या विधानाचा समाचार घेण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोदी यांनी बांग दिली

सामना अग्रलेखात म्हटले की, “पंतप्रधान मोदी यांनी ‘मुसलमान समाजा’विषयी एक धादांत खोटे वक्तव्य केले. काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा उल्लेख करून मोदी यांनी बांग दिली की, काँग्रेस सत्तेवर आली तर हिंदूंची संपत्ती ते जास्त मुले असलेल्यांना वाटतील. म्हणजे हिंदूंच्या संपत्तीचे वाटप मुसलमानांत केले जाईल. तुमची मंगळसूत्रेही खेचली जातील. अशा पद्धतीचे वक्तव्य करून मोदी यांनी प्रचारात हिंदू-मुसलमान हा मुद्दा आणलाच. मोदींना प्रचारात मुसलमानांना खेचावे लागले याचा अर्थ निवडणूक त्यांना जड जात आहे.”

मोदी आता पंतप्रधान राहिलेले नाहीत

प्रचारात द्वेषपूर्ण विधान केल्याचा आरोप झाल्यानंतर निवडणूक आयोगाने भाजपा आणि काँग्रेस दोघांनाही नोटीस बजावली. पण निवडणूक आयोगाची नोटीस निव्वळ धूळफेक असल्याचा आरोप अग्रलेखातून करण्यात आला आहे. “एकतर निवडणुका जाहीर होताच मोदी हे पंतप्रधान राहिलेले नाहीत. ते काळजीवाहू पंतप्रधान आहेत. त्यामुळे त्यांना विशेष अधिकार, प्रोटोकॉल नाही. तरीही सर्व सरकारी ताफा, विमाने घेऊन ते प्रचारासाठी फिरत आहेत. हे आचारसंहितेच्या कोणत्या नियमात बसते?” असा सवाल अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

“…त्यांनी मंगळसुत्रांची उठाठेव करू नये”, राऊतांची पंतप्रधानांवर टीका; म्हणाले, “काश्मीरमध्ये मोदीपुरस्कृत दहशतवाद्यांनी…”

पंतप्रधान मोदी जाहीर सभांतून आग लावत आहेत

अग्रलेखात पुढे पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. “पंतप्रधान जाहीर सभांतून महिलांची मंगळसूत्रे खेचण्याची भाषा करून आग लावत आहेत. हिंदू संस्कृतीत मंगळसूत्र पवित्र मानले जाते. त्या मंगळसूत्रालाच राजकारणात खेचण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले. हिंदुत्वास आणि हिंदू संस्कृतीस हे मान्य नाही. हिंदू महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रांचा असा अपमान करण्याचा अधिकार मोदी यांना कोणी दिला? मोदी यांनी मंगळसूत्राची प्रतिष्ठा स्वतःच्याच घरात ठेवली नाही असे बोलले जाते. मोदी यांच्या काळातच मंगळसूत्रांवर सगळ्यात मोठे गंडांतर आले. नोटाबंदीच्या काळात असंख्य हिंदू महिलांना मंगळसूत्र विकून घर चालवावे लागले. लॉक डाऊनच्या काळातही महिलांना मंगळसूत्रे सावकारांकडे गहाण ठेवावी लागली. बेरोजगारीच्या संघर्षात अनेक माता, बहिणी, पत्नींना मंगळसूत्राचाच सौदा करावा लागला. महागाईचा सामना करताना मेटाकुटीस आलेल्या अनेक महिलांची मंगळसूत्रे रोजच पेढ्यांवर विकली जात आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी मंगळसूत्रे खर्ची पडत आहेत. आई-बापांच्या, मुलांच्या इलाजासाठी रोज हजारो मंगळसूत्रे खर्ची पडत आहेत. मणिपुरात महिलांची नग्न धिंड काढून त्यांची मंगळसूत्रे खेचण्यात आली, तेव्हा मोदी काय करत होते?”, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

“माझ्या आईचं मंगळसूत्र या देशासाठी..”, प्रियांका गांधी यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना जोरदार प्रत्युत्तर

तसेच मोदी यांच्या काळातच कश्मीरात पुलवामा आणि इतर अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये जवानांच्या असंख्य वीरपत्नींनी आपल्या मंगळसूत्रांचे बलिदान केले, हे मोदींना माहीत नसावे? कश्मिरी पंडितांची घर वापसी झालेली नाही व त्यातील अनेक महिलांनी मोदी काळातच मंगळसूत्रे गमावली आहेत. देशासाठी मंगळसूत्रांचा त्याग करण्याची महान परंपरा या देशात आहे व अशा मंगळसूत्रांचा राजकीय कारणांसाठी वापर करणाऱ्या नेत्यांवर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी अग्रलेखाद्वारे करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena ubt group criticized pm modi statement on mangalsutra kvg