२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीपासून शिवसेना आणि भाजपाचं नेमकं बंद दाराआड काय ठरलं होतं? याविषयी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने परस्परविरोधी दावे केले आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांच्या २०१९ मधील ‘मातोश्री’ (उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान) भेटीवेळी काय घडलं होतं याबाबत काही दावे केले आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले, पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला त्याच्या आसपास अमित शाह मुंबईत आले होते. तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की सत्तेत आल्यावर अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं. त्यावर शाह म्हणाले, ठीक आहे. त्यानंतर दोन-तीन महिन्यांनी लोकसभा निवडणुका झाल्या आणि त्यानंतर चार पाच महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार होत्या. त्या चार-पाच महिन्यांच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यादरम्यान, फडणवीस मला म्हणाले, मी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदी राहीन आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करून मी दिल्लीला जाईन.

उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभा निवडणूक होईपर्यंत आदित्यने निवडणूक लढवण्याचा विचार केला नव्हता. त्यानंतर त्याने विधानसभा निवडणूक लढवण्याचा विचार केला. त्यावेळी फडणवीसांनी कोपराला गुळ लावण्याचा प्रयत्न केला. ते मला म्हणाले, “उद्धवजी मी काय करतो, मी आदित्यला चांगला तयार करतो. आपण अडीच वर्षांनी त्याला मुख्यमंत्री करू”. मी त्यांना म्हटलं, आदित्य अजून लहान आहे, त्याच्या डोक्यात काहीतरी घालू नका. त्याला आधी आमदार म्हणून त्याची कारकीर्द सुरू करू द्या. तुम्ही त्याला नक्कीच तयार करा. मात्र मुख्यमंत्रीपद वगैरे त्याच्या डोक्यात घालू नका.

उद्धव ठाकरे म्हणाले, त्यावेळी मी फडणवीसांना विचारलं, तुम्ही इतके ज्येष्ठ नेते आहात आदित्यला मुख्यमंत्री केल्यानंतर तुम्ही त्याच्या हाताखाली काम करणार? त्यावर ते म्हणाले, “मी दिल्लीला जाणार, मला अर्थखात्यातलं जरा बरं कळतं.” म्हणजेच फडणवीसांना केंद्रीय अर्थमंत्री व्हायचं होतं. मी त्या सगळ्याच्या खोलात जात नाही. मी त्यांचं बिंग फोडल्यावर त्यावर प्रतिक्रिया देताना आज ते चरफडले. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ झाले आहेत.” आधी ते म्हणाले, उद्धव ठाकरे अमित शाह यांना कुठल्या तरी खोलीत घेऊन गेले. मग म्हणाले, देवेंद्रने शब्द दिला. अहो, देवेंद्र जनाची नाही, मनाची तरी ठेवा. त्या दोन्ही तुम्हाला नाहीत हे आम्हाला माहितीय. लाजलज्जा सोडलेला कोडगा माणूस आहे हा. जिला तुम्ही कुठली तरी खोली म्हणताय, ती खोली आमच्यासाठी मंदिर आहे. तुम्ही कुठल्या खोल्यांमध्ये काय करता ते आम्ही बघू इछित नाही.

हे ही वाचा >> “ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा

ठाकरे गटाचे प्रमुख म्हणाले, फडणवीस ज्याला कुठलीतरी खोली म्हणतायत ते मातोश्रीतलं मंदिर आहे, कारण ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खोली आहे. त्याच खोलीत अमित शाह बाळासाहेबांच्या फोटोसमोर नाक रगडायला आले होते. त्या खोलीत अमित शाहांनी तुम्हाला नो एंट्री केली होती. अमित शाह तुम्हाला म्हणाले, तू बाहेर बस. दोन मोठी माणसं बोलत आहेत त्यामुळे तू बाहेर बस. त्याच खोलीत अटल बिहार वाजपेयी आले होते. लालकृष्ण आडवाणी आणि राजनाथ सिंह आले होते. तिथेच प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यायचे. त्या खोलीचं तुला महत्त्व माहिती नाही आणि तू नालायक माणसा त्या खोलीला कुठलीतरी खोली म्हणतोयस. मी तुला नालायक आणि कोडगा म्हणतोय. कारण माझ्या त्या खोलीबद्दलच्या भावना संवेदनशील आहेत.