भाजपच्या दबावामुळे तीन विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सध्या कमालीची अस्वस्थता आहे. रामटेक, हिंगोली, यवतमाळ, नाशिक या शिंदे यांचे खासदार असलेल्या जागांवरून भाजपने खूपच ताणून धरल्याने लोकसभा निवडणुकीत ही अवस्था आहे. पण त्याहीपुढे जात ठाणे आणि कल्याण यांपैकी एका मतदारसंघासाठी भाजप अडून बसला असून शिंदे यांची घेरल्यासारखी अवस्था झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिंदेंच्या ‘होमग्राउंड’वर भाजपचा दावा

वेगवेगळ्या सर्वेक्षणांचा हवाला देत राज्यातील ठराविक मतदारसंघांवर भाजपने दावा केला असता तर एक वेळ समजण्यासारखे होते. मात्र मुख्यमंत्र्यांचे ‘होम ग्राउंड’ समजल्या जाणाऱ्या ठाण्यातही भाजपने कुरघोडीचे राजकारण सुरू केल्याने शिंदेसेनेत भाजपविषयी असलेली अस्वस्थता आता अविश्वासात व्यक्त होऊ लागली आहे. ठाणे आणि कल्याण या दोन मतदारसंघांसाठी मुख्यमंत्री आग्रही असणार ही काळ्या दगडावरची रेघ मानली जात होती. असे असताना या दोघांपैकी एक विशेषत: ठाण्यावर दावा सांगत भाजपने मुख्यमंत्र्यांच्या राजकारणाचे जे मूळ मानले जाते त्यावर घाव घातल्याची आता चर्चा आहे. ठाणे भाजपकडे गेलेच तर कोणत्या तोंडाने शिवसैनिकांना सामोरे जायचे असा सवाल आता पक्षाच्या नेत्यांना सतावू लागला आहे.

हेही वाचा : केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?

ठाणे, कल्याण मुख्यमंत्र्यांची दुखरी नस?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोपरी पाचपाखाडी हा विधानसभा मतदारसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघात मोडतो. परंतु केवळ या एका कारणामुळे मुख्यमंत्री ठाण्यासाठी आग्रही आहेत असे नाही. मुख्यमंत्र्यांच्या राजकारणाचे मूळ ठाण्यात आहे हे यामागचे मुख्य कारण आहे. शिवसेनेचे दिवगंत जिल्हाप्रमुख आनंद दिघे हे आक्रमक आणि कडव्या धार्मिक राजकारणासाठी ओळखले जात. भाजपने देशभरात सुरू केलेल्या बाबरी आंदोलनाचे ठाणे जिल्ह्यात आक्रमक नेतृत्व दिघे यांनी केले. ठाणे जिल्ह्यात पांढरपेशा राजकारणापुरता मर्यादित असलेल्या भाजपवर आक्रमक हिंदुत्ववादी नेतृत्वाचा ठसा तेव्हा शिवसेनेच्या माध्यमातून दिघे यांनी उमटविला हा इतिहास आहे. या आक्रमक राजकारणातून पुढे दिघे यांनी रामभाऊ म्हाळगी, राम कापसेंचा ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी खेचून आणला आणि तेथून प्रकाश परांजपे यांना तीन वेळा खासदार केले. भाजपकडून खेचून आणलेला हा मतदारसंघ दिघे यांच्या शिष्याने त्यांना परत केला हे शिवसैनिकांच्या सहज पचनी पडणार नाही याची पुरेपूर कल्पना मुख्यमंत्र्यांना आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण हा पूर्वीचा ठाणे लोकसभा मतदारसंघ सहजासहजी भाजपकडे जाऊ देणे मुख्यमंत्र्यांना परवडणारे नाही.

भाजपला ठाणे का हवंय?

मुंबईतील बदलत्या सामाजिक तोंडवळ्यामुळे गेल्या काही वर्षात भाजपने येथे शिवसेनेला टक्कर देण्याइतकी ताकद नक्कीच उभी केली आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत मुंबईतील ठराविक उपनगरांमध्ये भाजपने एकहाती विजय मिळविल्याचे पहायला मिळाले. मुंबईलगत असलेल्या ठाण्यात मात्र अजूनही भाजपला शिवसेनेसमोर पर्याय उभा करता आलेला नाही हे सत्य आहे. चुकीच्या उमेदवारामुळे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला गमवावा लागला. हे सत्य असले तरी शिवसेना एकसंघ असताना ठाण्यातील जवळपास तीन विधानसभा क्षेत्रांत भाजपला अनेक महापालिका प्रभागांमध्ये उमेदवारही सापडत नव्हते ही वस्तुस्थिती आहे. मात्र आता परिस्थिती बदलत असल्याची जाणीव भाजप नेत्यांना होऊ लागली आहे. ठाणे लोकसभा क्षेत्राचा विचार केला तर येथील तीन आमदार भाजपचे आहेत. मिरा-भाईंदरमधील जैन, गुजराती समाजाची वाढती वस्ती लक्षात घेता येथेही भाजपचा वरचष्मा राहील अशी परिस्थिती आहे. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांचा मूळ मतदार विभागणार हे निश्चित आहे. त्यामुळे ठाण्यात भाजपची ताकद वाढविण्याची आणि या भागात धनुष्यबाणाऐवजी ‘कमळ’ बिंबविण्याची हीच योग्य वेळ असल्याचे भाजपला वाटू लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळ असलेल्या नेत्यांना भाजपची ही तिरकी चाल यामुळेच अस्वस्थ करू लागली आहे.

हेही वाचा : विश्लेषण: कच्चथीवू बेटावर ‘या’ हिंदू राजांनी केले होते राज्य? त्यांचा रामाशी नेमका संबंध काय होता?

जिल्ह्यात भाजपचेच आमदार अधिक!

ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जात असला तरी या जिल्ह्यात सर्वाधिक आमदार हे भाजपचे आहेत ही वस्तुस्थिती आहे. शिवसेना एकसंघ असतानाही या जिल्ह्यातील १८ पैकी सर्वाधिक ८ आमदार हे भाजपच्या चिन्हावर निवडून आले होते. शिवसेनेचे ५, तर इतर पक्षांचे मिळून ५ असे आमदारांचे जिल्ह्यात संख्याबळ आहे. ठाण्यास लागूनच असलेल्या नवी मुंबईवर भाजपचा वरचष्मा आहे. ठाण्यास लागून असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार असले, तरी येथील तीन मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. लगतच असलेल्या भिवंडी मतदारसंघात भाजपचे कपिल पाटील हे खासदार असून, येथे भाजपची ताकद बऱ्यापैकी वाढली आहे. ठाणे किंवा कल्याण यांपैकी एक मतदारसंघ जरी भाजपला मिळाला तरी पक्ष विस्तारासाठी अधिक वाव मिळणार आहे. या परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे काय होणार यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी भाजप नावाचा एक मोठा आव्हानवीर नजिकच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उभा रहाणार. नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर यांसारख्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपचे स्थानिक नेते शिंदेसेनेसोबत एकत्र लढतील का, हा प्रश्न आजच उपस्थित होऊ लागला आहे.

हेही वाचा : तुर्कस्तानात धर्मवादी राजकारणाला शहरी मतदारांनी नाकारले? अध्यक्ष एर्दोगान यांच्या पक्षाला स्थानिक निवडणुकांत अपयश कशामुळे?

भाजपच्या विस्तारवादाचे भय?

ठाणे आणि कल्याण हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेचे असल्याने येथे भाजप आक्रमकपणे दावा सांगणार नाही अशी खात्री सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या पक्षातील नेत्यांना वाटत होती. मात्र इतक्या दिवसांनंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मुख्यमंत्र्यांसोबत आलेल्या खासदारांना उमेदवारी मिळवताना नाकी नऊ येत आहेत. काही ठिकाणी उमेदवार बदलण्याचा भाजपकडून दबाव येत आहे. इतर ठिकाणी ठीक होते पण ठाण्यासाठी भाजपने जोरदार आग्रह धरल्याने मुख्यमंत्री समर्थकांचे डोळे विस्फारले आहेत. भाजपसोबतच्या वाटाघाटीत कदाचित मुख्यमंत्री ठाणे, कल्याण खेचून आणतीलही. परंतु भाजपची ही विस्तारवादी भूमिका पाहून त्यांच्या समर्थकांमध्ये मात्र अविश्वासाचे वातावरण वाढू लागले आहे. कोंडी फुटली तरी भाजपच्या तिरक्या चालींमुळे वाढलेला हा अविश्वास दूर होईल का हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why bjp claim on cm eknath shinde s hometown thane lok sabha seat fear in shivsena leaders due to bjp print exp css
First published on: 05-04-2024 at 12:11 IST