कोल्हापूर : अतिवृष्टीग्रस्त शेतकरी देशोधडीला लागला आहे. अशा शेतकऱ्यांना मदत करण्याची राज्यातील महायुती शासनाची घोषणा फसवी, दिशाभूल करणारी ठरली आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार पक्ष) येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन करीत ‘काळी दिवाळी’ साजरी केली. कार्यकर्त्यांनी महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
अतिवृष्टीने राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दिवाळीपूर्वी मोठ्या पॅकेजची घोषणा केली. पण दिवाळी आली असतानाही त्याची अंमलबजावणी राज्य शासनाने केलेली नाही याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांना सोबत घेत काळी दिवाळी साजरी करण्यात आली.
हातात फलक, काळी कपडे घालत घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी ही काळी दिवाळी साजरी केली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, सरचिटणीस सुनील देसाई यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते.
अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर, कापूस, मूग, ऊस, उडीद आदी विविध पिकांचे अतोनात नुकसान झाले. पण आतापर्यंत झालेल्या नुकसानीपैकी निम्म्या हेक्टर वरील पंचनामे अद्यापही बाकी आहेत. ते पूर्ण होण्यासाठी आणखी किती कालावधी लागेल हे माहीत नाही. अतिवृष्टीने काढणीला आलेली पिके वाहून गेली, गोठ्यातील दुभती जनावरं, बैल, शेळ्या, कोंबड्या वाहून गेल्या तरी या सरकारनेही अद्याप मदत दिलेली नाही.
अशा परिस्थितीत दिवाळी कशी साजरी करायची या चिंतेत शेतकरी आहे. मात्र, सरकारकडून ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत, त्या निषेधार्थ हे आंदोलन असल्याचे शरद पवार गटाने सांगीतले. यावेळी, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकर्यांना प्रोत्साहनपर ७५ हजार रुपये देण्याची आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, सर्व पिकांना किमान आधारभूत किंमत देणारा कायदा करावा, परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेवर करून शेतकर्यांना मदत द्यावी, अतिवृष्टी किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई त्वरित मिळावी, शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, प्रलंबित जलसिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करावीत, शेती पंचनामे वेळेवर न करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, दिव्यांग शेतकरी, मेंढपाळ आणि मच्छीमार यांच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
दिवाळी एक दिवसावर आली असली तरी अद्यापपर्यंत कुठलीच मदत शेतकर्यांना मिळाली नसल्याने ही दिवाळी काळी दिवाळी असून ही जिल्हा प्रशासनाच्या समोरच आम्ही साजरी करत असल्याचे सांगत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दारावरच हे आंदोलन केले.