India vs Pakistan highlights Cricket Score, Asia Cup 2025 Super 4 : आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोर फेरीच्या लढतीत भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ६ विकेट्सनी विजय मिळवला. पाकिस्तानने दिलेलं १७२ धावांच्या लक्ष्यासमोर खेळताना अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांनी तडाखेबंद सलामी दिली. याच भागीदारीने भारताच्या विजयाचा पाया रचला.
साहिबजादा फरहानला जीवदान
हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर साहिबजादा फरहान याने मारलेला फटका थर्डमॅनला अभिषेक शर्माच्या दिशेने गेला. तो सहज पकडेल असं चित्र होतं पण चेंडू त्याच्या हातून निसटला.
बुमराह-चक्रवर्ती परतले; पाकिस्तान संघातही दोन बदल
भारतीय संघ
शुबमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
पाकिस्तान संघ
साहिबजादा फरहान, सईम अय्युब, फखर झमान, सलमान अली अघा, मोहम्मद नवाझ, फहीम अशरफ, मोहम्मद हॅरिस, शाहीन शहा आफ्रिदी, हारिस रौफ, अबरार अहमद, हुसैन तलत.
भारताने टॉस जिंकला; बॉलिंगचा निर्णय, हँडशेक नाहीच
भारताने पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. या लढतीतही भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघा यांनी हस्तांदोलन केलं नाही.
भारतीय संघाने अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांच्याऐवजी जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती संघात परतले आहेत.
जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती अंतिम अकरात?
भारतीय संघ अंतिम अकरात प्रमुख अस्त्र जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यांना अंतिम अकरात स्थान देण्याची शक्यता आहे. ओमानविरुद्धच्या लढतीत बुमराहऐवजी हर्षित राणाला संधी देण्यात आली होती. वरुण चक्रवर्तीऐवजी अर्शदीप सिंगला समाविष्ट करण्यात आलं होतं. सुपर फोरच्या या महत्त्वपूर्ण लढतीसाठी बुमराह-चक्रवर्ती ही जोडगोळी अंतिम अकराचा भाग असेल अशी शक्यता दिसते.
सूर्यकुमार यादव- सलमान अघा हँडशेक करणार?
भारत पाकिस्तान लढतीच्या निमित्ताने हँडशेकचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघा हँडशेक करणार का? यासंदर्भात स्पष्टता नाही. प्राथमिक फेरीच्या लढतीत दोन्ही कर्णधारांनी हस्तांदोलन केलं नाही. सामना संपल्यावरही भारतीय संघाने हस्तांदोलन करण्यात स्वारस्य दाखवलं नाही. यावरून पाकिस्तानने नाराजी व्यक्त करत सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणी केली होती.
भारत-पाकिस्तान संघ मैदानात दाखल
भारत आणि पाकिस्तानचे संघ सुपर फोरच्या महत्त्वपूर्ण लढतीसाठी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात दाखल झाले आहेत. युएईविरुद्धच्या लढतीपूर्वी पाकिस्तानच्या संघाने बहिष्काराचा इशारा दिला होता. मात्र वाटाघाटींनंतर पाकिस्तानने सामना खेळण्याचा निर्णय घेतला. हा सामना तासभर उशिराने सुरू झाला होता. भारताविरुद्धच्या लढतीसाठी पाकिस्तानचा संघ वेळेवर दाखल झाला आहे. दोन्ही संघांनी सराव सुरू केला आहे.
अभिषेक शर्मामुळे बाकी फलंदाजांवरचं दडपण कमी होतं- मिसबाह
अभिषेक शर्मा भारताला खणखणीत सुरुवात करून देतो. त्यामुळे पुढे खेळायला येणाऱ्या फलंदाजांवरचं दडपण कमी होऊन जातं. तो फिरकी आणि वेगवान गोलंदाजी दोन्ही चांगलं खेळतो. ऑन आणि ऑफ-दोन्हीकडे फटकेबाजी करतो. तो गॅप शोधून चौकार वसूल करतो, असं पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह उल हकने म्हटलं आहे.
प्रचंड उकाडा आणि दवाचा मुद्दा ठरणार निर्णायक
युएईत उष्ण आणि दमट वातावरणात खेळणं हे सगळ्याच संघांसाठी आव्हान आहे. दुबई आणि अबू धाबीत सर्वसामान्य तापमान ३५ ते ३६ डिग्री सेल्सिअस एवढं आहे. याव्यतिरिक्त दवाचा मुद्दाही कळीचा आहे. दुसऱ्या डावात गोलंदाजी करणं कठीण होतं. दवामुळे चेंडूवरची ग्रिप निसटते. धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला फायदा मिळतो. रात्रीच्या वेळी तापमानात घट होते. भारत-पाकिस्तान लढतीतही दवाचा मुद्दा महत्त्वपूर्ण ठरू शकतो.
पाकिस्तानकडे सांगण्यासारखं काहीही नसावं- सुनील गावस्कर
‘पत्रकार परिषद रद्द करण्यामागची भूमिका जराही समजली नाही. पत्रकार परिषद होणं अनिवार्य आहे. जर एखादा संघ पत्रकार परिषदेत सहभागी झाला नाही तर त्यासाठी दंडाची किंवा कारवाईची तरतूद आहे का मला माहिती नाही. पण आजकालच्या काळात प्रसारमाध्यमांना कल्पना देणं आवश्यक आहे. सूत्रं किंवा अन्य कळते समजते स्वरुपाच्या बातम्यांपेक्षा थेट संवाद होणं महत्त्वाचं आहे. कर्णधाराने संघाची भूमिका स्पष्टपणे मांडणं गरजेचं आहे. पाकिस्तान संघाकडे सांगण्यासारखं काही नसावं असं दिसतं’, असं भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे.
‘मानसोपचारतज्ज्ञही पुरा पडू शकत नाही’-
‘मोटिव्हेशनल स्पीकर डॉ. रहील करीम हे पाकिस्तान संघाबरोबर आहेत. मानसोपचारतज्ज्ञ ही संकल्पना पाकिस्तानमध्ये किती पटेल माहिती नाही. माझ्या चेअरमन म्हणून कार्यकाळात मी मानसोपचारतज्ज्ञांना सपोर्ट स्टाफमध्ये समाविष्ट केलं होतं. पण खेळाडूंना त्याचं महत्त्व उमगलं नाही. आपल्या संस्कृतीत मानसिक उपचार हे कमकुवतपणाचं लक्षण समजलं जातं. मानसिक आरोग्य ही व्यापक संकल्पना आहे. ही मंडळी इंग्रजीत संवाद साधतात. ही पण एक अडचण आहे. त्यांनी ऊर्दू किंवा पश्तो मध्ये संवाद साधला तर सोपं होऊ शकतं. जडणघडण, सामाजिक स्तर, शिक्षण या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. तो एका रात्रीत गोष्टी बदलू शकत नाही. तोही पुरा पडू शकेल असं वाटत नाही’, असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी चेअरमन नझम सेठी यांनी सांगितलं.
कुलदीपची फिरकी कळेना
‘कुलदीप यादव ज्या शिताफीने गोलंदाजी करतो त्यामुळे पाकिस्तानच्या फलंदाजांना त्याचा टप्पा ओळखणं कठीण होऊन जातं. त्याच्या हातून चेंडू सुटते तेव्हाच तुम्हाला पुढे काय होईल याचा अंदाज घ्यायला हवा. त्याच्या प्रत्येक चेंडूवर तुम्ही स्वीप करायला जाता याचा अर्थ तुम्हाला त्याची गोलंदाजी कळत नाही हे स्पष्ट आहे’, असं पाकिस्तानचे माजी गोलंदाज वासिम अक्रम म्हणाले.
दुबईच्या मैदानावर फिट्टमफाटचा रेकॉर्ड
दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम या मैदानावर टी२० प्रकारात भारत आणि पाकिस्तान संघ चारवेळा आमनेसामने आले आहेत.
२०२१ मध्ये टी२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या दमदार खेळाच्या जोरावर भारतावर १० विकेट्सनी विजय मिळवला होता.
पुढच्याच वर्षी, भारताने आशिया चषक स्पर्धेत, हार्दिक पंड्याच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर पाकिस्तानला ५ विकेट्सनी नमवलं होतं.
काही दिवसात आशिया चषकाच्या सुपर फोरच्या लढतीत पाकिस्तानने भारतावर ५ विकेट्सनी विजय मिळवला होता. मोहम्मद नवाझला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
गेल्या आठवड्यात झालेल्या लढतीत भारताने पाकिस्तानला ७ विकेट्सनी सहज नमवलं होतं.
तेव्हा सुपर फोरमध्ये काय घडलं होतं?
दोन वर्षांपूर्वी आशिया चषकात सुपर फोरमध्ये भारत-पाकिस्तान आमनेसामने आले होते. त्यावेळचा आशिया चषक वनडे प्रकारात खेळवण्यात आला होता. पाकिस्तानने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. पावसाने व्यत्यय आणलेल्या डावात विराट कोहली आणि के.एल.राहुल यांनी आशिया चषकातली भारतासाठीची सर्वोत्तम भागीदारी रचली. त्यांनी १९४ चेंडूत २३३ धावा केल्या. कोहलीने नाबाद १२२ धावांची खेळी साकारली. राहुलने नाबाद १११ धावा केल्या. भारताने पाकिस्तानसमोर ३५७ धावांचं लक्ष्य ठेवलं. कुलदीप यादवच्या जादुई फिरकीसमोर पाकिस्तानने शरणागती पत्करली आणि त्यांचा डाव १२८ धावांतच आटोपला. भारताने २२८ धावांनी हा मुकाबला जिंकला होता.
पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडायला हवी होती- कामरान अकमल
‘आत्मविश्वास दाखवून पत्रकार परिषदेला उपस्थित राहायला हवं होतं. तुमच्याकडे आत्मविश्वास नाही म्हणून तुम्ही हजर राहिला नाहीत असंच बोललं जाणार. तुम्ही तुमचं मत, भूमिका मांडायला हवी होती. तुम्ही पत्रकार परिषदेवर बहिष्कार घातल्याने भारतीय संघाचा फायदाच झाला. सलमान अघाने कर्णधार या नात्याने संघाची, बोर्डाची भूमिका मांडायला हवी होती’, असं मत पाकिस्तानचा माजी विकेटकीपर बॅट्समन कामरान अकमलने व्यक्त केलं. आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाने पत्रकार परिषदेवर सातत्याने बहिष्कार घातला आहे.
… तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं १३२ कोटींचं नुकसान झालं असतं- पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी चेअरमन नझम सेठींचा गौप्यस्फोट
IND vs PAK Live Score Updates: मागच्या पराभवानंतर पाकिस्तानचा जळफळाट, माजी कर्णधार युसूफ मोहम्मदनं सूर्यकुमार यादवला केली शिवीगाळ
आशिया चषकात १४ सप्टेंबर रोजीच्या पहिल्या सामन्यात भारताकडून लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला. पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार युसूफ मोहम्मदने तिथल्या टीव्हीवरील चर्चेत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवबदद्ल आक्षेपार्ह शब्द उच्चारला होता. याचा व्हिडीओही व्हायरल झाला. वाचा सविस्तर वृत्त
IND vs PAK Live Score Updates: ‘आणखी एक इस्रायल कशाला’? शाहिद आफ्रिदीची भारतावर टीका
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने दुबईमधील (१४ सप्टेंबर) सामन्यावर बोलत असताना भारताविरोधात गरळ ओकली होती. शाहिद आफ्रिदीने एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत भारताला इस्रायलची उपमा दिली. एक इस्रायल पुरेसा नाही का? की तुम्ही दुसरा इस्रायल बनू पाहत आहात?, असे आफ्रिदी म्हणाला होता. वाचा सविस्तर वृत्त
IND vs PAK Live Score Updates: मोहम्मद शमीने पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला फटकारले, म्हणाला…
भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान दोन्ही देशातील आजी-माजी खेळाडूंची विधाने चर्चेत आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने त्याच्यावर पाकिस्तानी खेळाडूंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते. आयसीसी आणि बीसीसीआय भारतीय गोलंदाजांना मदत करतात, असा आरोप पाकिस्तानी खेळाडूंनी केला होता. यावर शमीने एका मुलाखतीत प्रत्युत्तर दिले.
शमी म्हणाला, “ते फक्त द्वेष करतात. बाकी काही नाही. मला त्यांची टिका बिनबुडाची वाटते. स्वतःला चांगले खेळता येत नाही, त्यामुळे दुसऱ्यांकडे बोटं दाखविण्याचा हा प्रकार आहे. दुसरे जेव्हा चांगले खेळतात, तेव्हा यांना मिरची लागते.”
आतापर्यंत १४ वेळा आमनेसामने
भारत विजयी – ११
पाकिस्तान विजयी -३
मागच्या पाच सामन्यात भारताने ४ वेळा मिळवला विजय. तर पाकिस्तान एकदाच ठरला विजयी.
शेवटच्या सामन्यात (१४ सप्टेंबर) भारताने दुबईच्या मैदानावर ७ गडी राखून पाकिस्तानवर विजय मिळवला.
IND vs PAK: या सामन्यात कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११?
शुबमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव ( कर्णधार), संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल/ अर्शदीप सिंग/ हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.