Suryakumar Yadav Hasn’t Faced Jasprit Bumrah in Nets : आयपीएल २०२४ मधील २५ वा सामना वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा ७ विकेट्सनी एकहाती पराभव केला. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सने शानदार गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावर सलग दुसरा विजय नोंदवला. या सामन्यात मुंबई इंडियन्ससाठी गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने ५ विकेट्स घेत आरसीबीच्या डावाला सुरुंग लावला. यानंतर सूर्यकुमार यादव आणि इशान किशनने वादळी अर्धशतक झळकावून फलंदाजीत मोलाचे योगदान दिले. या सामन्यानंतर सूर्यकुमार यादवने बुमराहच्या गोलंदाजीचे तोंडभरून कौतुक केले.

मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव जसप्रीत बुमराहचे कौतुक करताना म्हणाला, तो केवळ विरोधी संघासाठीच नाही, तर नेटमध्ये आमच्यासाठीही धोकादायक असल्याचे सूर्याने सांगितले. आरसीबीविरुद्ध ५ विकेट्स घेणाऱ्या जसप्रीत बुमराहची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. बुमराहने ४ षटकात २१ धावा देत ५ फलंदाजांना बाद केले.

‘मी मानसिकरित्या वानखेडेत होतो’ –

मुंबई इंडियन्सच्या सलग दुसऱ्या विजयाबद्दल, सूर्यकुमार म्हणाला, “वानखेडेवर परतणे नेहमीच चांगले वाटते, जेव्हा स्पर्धा सुरू झाली तेव्हा मी जरी शारीरिकदृष्ट्या बंगळुरूमध्ये असलो, तरी मानसिकरित्या येथे होतो. त्यामुळे मी वानखेडे कधी सोडले आहे, असे मला वाटलेच नाही. वानखेडेवर २०० धावांचा पाठलाग करताना दव असेल, तर संधीचा फायदा घेणे महत्त्वाचे ठरते. कारण नेट रन रेट सुधारण्यासाठी सामना लवकर संपवणे गरजेचे असते.”

हेही वाचा – सूर्यकुमार यादवनं यशासाठी श्रेय दिलेली ‘मसल मेमरी’ म्हणजे काय?

जसप्रीत बुमराहबद्दल सूर्याचा मोठा खुलासा –

त्याचबरोबर पुढे बोलताना सूर्याने एक महत्त्वाचा खुलासा केला की गेल्या काही वर्षांपासून त्याने नेटमध्ये जसप्रीत बुमराहचा सामना केलेला नाही. तो म्हणाला, “मी त्याच्याविरुद्ध नेटमध्ये फलंदाजी करून जवळपास २-३ वर्षे झाली आहेत. कारण तो एकतर माझी बॅट मोडतो किंवा माझा पाय तरी मोडतो. त्यामुळे मी मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटला सांगितले आहे की नेटमध्ये मी बुमराहच्या गोलंदाजीचा सामना करणार आहे.” त्याने स्टार एमआय वेगवान गोलंदाजाबद्दल खुलासा केला.

हेही वाचा – MI VS RCB: ‘सूर्या’चं असणं मुंबई इंडियन्ससाठी इतकं का महत्त्वाचं?

‘मला फक्त फिल्डनुसार खेळायचे असते’ –

सामन्यात सूर्याने पॉइंटवरुन उत्कृष्ट शॉट मारले. त्याबद्दल बोलताना तो म्हणाला, मला फक्त फिल्डनुसार खेळायचे असते. मी या शॉट्सचा सराव करतो. ही आता ‘मसल मेमरी’ची बाब झाली आहे. सर्व शॉट्स फेव्हरेट आहेत. पॉइंटवरुन स्लाइस करणे माझा फेव्हरेट शॉट आहे. इशान किशनने त्याच्या फलंदाजीवर खूप मेहनत घेतली आहे आणि त्याचे फळ आता अनुभवत आहे.”