सूर्यकुमार यादव आणि मुंबई इंडियन्स हे नातं किती घट्ट आहे याचा प्रत्यय वेळोवेळी येतो. दुखापतीमुळे सूर्यकुमार संघात नसतानाही सूर्यादादाशी निगडीत पोस्ट सातत्याने मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया टीमकडून पोस्ट केल्या जात होत्या. सूर्यकुमार प्रत्येक सामना पाहत होता हे त्याच्या स्टोरीच्या माध्यमातून कळत होतं. बंगळुरूस्थित नॅशनल क्रिकेट अकादमीतून खेळण्यासाठी होकार मिळाल्यानंतर सूर्यकुमार मुंबईच्या दिशेने निघाला आणि सूर्यादादाच्या स्वागतासाठी मुंबई इंडियन्स सज्ज झालं. नवीन कर्णधार हार्दिकला पंड्याला होणारा विरोध, सलग तीन सामन्यात झालेला पराभव या पार्श्वभूमीवर सूर्यकुमार संघात असणं मुंबई इंडियन्ससाठी गरजेचं झालं होतं. सूर्यकुमार परतल्यानंतर हार्दिक विरुद्ध रोहित हे सोशल मीडियाच्या माध्यमातून रचलेलं समीकरण बाजूला पडेल अशी आशाही मुंबई इंडियन्सला आहे. गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या बंगळुरूविरुद्धच्या लढतीत सूर्यकुमारने टोलेजंग फटकेबाजी करत चाहत्यांची मनं जिंकली. सूर्यकुमारची ही खेळी मुंबई इंडियन्ससाठी संजीवनी ठरल्याचं त्यांच्या देहबोलीतून दिसून आलं.
बंगळुरू संघाने १९६ धावांचा डोंगर उभारला आणि मुंबईसमोर आव्हानात्मक लक्ष्य ठेवलं. रोहित शर्मा आणि इशान किशन या जोडीने १०१ धावांची दमदार सलामी दिली. ३४ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह ६९ धावांची दिमाखदार खेळी केली. विजयाचा पाया या दोघांनी रचला. सूर्यकुमारसाठी हा पाया महत्त्वाचा होता. थोड्या वेळात रोहित शर्मा बाद झाला. यानंतर सूर्यकुमारने सूत्रं हाती घेतली आणि बंगळुरूच्या गोलंदाजांच्या ठिकऱ्या उडवल्या. आकाश दीपच्या गोलंदाजीवर दोन धावा ढकलत सूर्यकुमारने सावध सुरुवात केली. आकाश दीपच्या पुढच्या षटकात सूर्यकुमारने मनगटाचा खुबीने उपयोग करत डीप मिडविकेटच्या दिशेने चौकार वसूल केला.
आकाशच्या नकल बॉलवर सूर्यकुमारने त्याच भागात जोरदार षटकार खेचला. काही मिनिटात सूर्यकुमारने ठेवणीतला सुपला शॉट बाहेर काढला. अक्रॉस जात सूर्यकुमारने लीलया चेंडूला फाईन लेग पट्ट्यात भिरकावला. पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा अक्रॉस जात सूर्यकुमारने खणखणीत षटकार मारला. विल जॅक्सच्या गोलंदाजीवर सूर्यकुमारने गॅप शोधून चौकार मारला. रीस टोपलेच्या गोलंदाजीवर पॉइंट क्षेत्रात सूर्यकुमारने अफलातून चौकार मारला. मनगटाची जादू दाखवत टोपलेचा चेंडू सूर्यकुमारने डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात फेकून दिला. पुढच्याच चेंडूवर सूर्यकुमारने सुपला शॉटची पुनरावृत्ती सादर केली. हा फटका लगावताच वानखेडे स्टेडियमवर जल्लोषाची लाटच उसळली. पुढच्या चेंडूवर चौकार लगावत सूर्यकुमारने १७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. चाहत्यांनी उभं राहून त्याचं कौतुक केलं. व्यशकच्या गोलंदाजीवर ऑफस्टंपपासून दूरचा चेंडू खेळण्याचा सूर्यकुमारचा प्रयत्न महिपाल लोमरुरच्या हातात जाऊन विसावला. सूर्यकुमार बाद होताच क्षणभरासाठी शांतता पसरली पण लगेचच टाळ्यांच्या गजरात चाहत्यांनी त्याला अभिवादन केलं. १९ चेंडूत ५२ धावांच्या खेळीसह सूर्यकुमारने मुंबईचा विजय सुकर केला.
घरच्या मैदानावर चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा असतो. या सामन्यात पराभूत झाल्यास संघावरचं दडपण वाढतं. त्यातच हार्दिकवर होणारी टीका हा मुद्दाही फेर धरून होता, आहे. अशा परिस्थितीत सूर्यकुमार संघात आल्यामुळे नूर पालटला आहे. तिसऱ्या क्रमांकावर एकहाती सामना जिंकून देऊ शकणारा खेळाडू परतला आहे. दुसरीकडे हार्दिक-रोहित वादावरचं लक्ष सूर्यकुमारकडे केंद्रित झालं आहे. पायाच्या दुखापतीमुळे सूर्यकुमार कधी फिट होणार याविषयी साशंकता होती. पण एनसीएत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कठोर मेहनत घेत सूर्यकुमार परतला आहे.
सूर्यकुमारच्या आयपीएल कारकीर्दीची सुरुवात २०१२-१३ मध्ये मुंबई इंडियन्सपासूनच झाली पण तेव्हा त्याला पुरेशी संधीच मिळाली नाही. २०१४ ते २०१७ या दरम्यान सूर्यकुमार कोलकाता नाईट रायडर्स संघाचा फिनिशर होता. २०१७ नंतर झालेल्या लिलावात मुंबईने सूर्यकुमारला ताफ्यात समाविष्ट केलं आणि तेव्हापासून तो संघाचा आधारवड झाला आहे. अद्भुत अशा फटकेबाजीमुळे त्याला न्यू ३६० असं नाव मिळालं. मैदानाच्या कुठल्याही कोपऱ्यात चेंडूला पिटाळण्याची त्याची क्षमता विलक्षण आहे. सूर्यकुमारला रोखायचं कसं असा प्रश्न प्रतिस्पर्धी गोलंदाज आणि कर्णधाराला पडतो. २०१८ हंगामात त्याने ५१२ धावा चोपून काढल्या. २०१९ आणि २०२० मध्ये त्याने चारशे धावांची वेस ओलांडली. २०२१-२०२२ मध्ये धावा आटल्या पण २०२३ मध्ये त्याने तब्बल ६०५ धावा कुटल्या. आयपीएलमधल्या दमदार प्रदर्शनाच्या बळावर सूर्यकुमारने भारतीय ट्वेन्टी२० संघात स्थान पटकावलं. आयपीएलमधलं सातत्य भारतीय संघासाठी खेळताना दाखवत सूर्यकुमारने अल्पावधीत जागतिक ट्वेन्टी२० क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली. ट्वेन्टी२० प्रकारात त्याने ४ शतकंही झळकावली. यातूनच त्याचा वनडे आणि टेस्ट पदार्पणाचा मार्ग सुलभ झाला. गेल्या वर्षी झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सूर्यकुमार भारतीय संघाचा भाग होता.
ऑफस्टंपच्या पल्याड जाऊन फाईनलेग क्षेत्रात षटकार लगावणं तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे. खेळाडू जसा स्थिरावतो तसं त्याच्या खेळातल्या उणिवा प्रतिस्पर्धी संघ टिपतो. तूर्तास तरी सूर्यकुमारला थोपवणं गोलंदाजांसाठी डोकेदुखी आहे. ट्वेन्टी२० विशेषज्ञ अशी बिरुदावली मिळालेल्या सूर्यकुमारच्या खेळात दुखापतीमुळे कोणतंही अवघडलेपण जाणवत नाहीये. मोठी धावसंख्या रचणं असो किंवा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग असो- सूर्यकुमारचं असणं मुंबईसाठी निर्णायक आहे. क्षेत्ररक्षक म्हणूनही सूर्यकुमारने त्याची उपयुक्तता वारंवार सिद्ध केली आहे.
मुंबई इंडियन्स हा आयपीएल स्पर्धेतला नामांकित संघ. तब्बल ५ जेतेपदं नावावर. भारतीय संघाचा कर्णधारच मुंबईच्या ताफ्यात आहे. यंदा मात्र मुंबई इंडियन्ससाठी सुरुवात काळजीत टाकणारी ठरली. हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्या नवीन कर्णधार असेल असं जाहीर केलं आणि वादाला तोंड फुटलं. रोहित शर्माच्या नेतृत्वातच मुंबईने आयपीएलची ५ जेतेपदं नावावर केली आहेत. मुंबईकर रोहित चाहत्यांसाठी फक्त एक खेळाडू किंवा कर्णधार नाहीये, तो घरातला माणूस झाला आहे. रोहितला बाजूला करुन हार्दिकला कर्णधार केल्यामुळे चाहते संतापले. मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया फॉलोअर्स संख्येतही घसरण झाली. गुजरातविरुद्धच्या सलामीच्या लढतीत हार्दिकची हुर्यो उडवण्यात आली. मुंबईला या लढतीत पराभवाला सामोरं जावं लागलं.
दुसऱ्या लढतीतही हार्दिकला चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची कत्तल केली. हैदराबादने २७७ धावांचा डोंगर उभारला. आयपीएल स्पर्धेतली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. तिसऱ्या लढतीतही हार्दिकप्रति निराशा कायम राहिली. राजस्थानने या लढतीत दमदार विजय मिळवला. सलग तीन पराभवांमुळे हार्दिकला कर्णधारपदावरून दूर करा असा सूरही पाहायला मिळाला. भारताच्या आजीमाजी खेळाडूंनी हार्दिकची हुर्यो उडवण्यावरून प्रेक्षकांना संयमाने वागण्याचं आवाहन केलं.
चौथ्या लढतीत सूर्यकुमार यादवचं आगमन झालं. पायाच्या दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्याने सूर्यकुमारला नॅशनल क्रिकेट अकादमीकडून खेळण्याकरता हिरवा कंदील मिळायला उशीर झाला. तिकडून होकार आला आणि सूर्यकुमार मुंबईच्या ताफ्यात सामील झाला. पुनरागमनच्या लढतीत सूर्यकुमार भोपळाही फोडू शकला नाही पण रोमारिओ शेफर्डच्या तडाखेबंद फटकेबाजीच्या बळावर मुंबईने हा सामना जिंकला. पाचव्या सामन्यात सूर्यकुमारने वादळी खेळी साकारत मुंबईला बंगळुरुविरुद्ध शानदार विजय मिळवून दिला.