Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Match Updates : आयपीएल २०२४ च्या ८ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा ३१ धावांनी पराभव केला. या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना क्लासेनच्या नाबाद ८० धांवांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत ३ गडी २७७ धावा करताना आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. त्याचबरोबर मुंबईला २७८ विक्रमी लक्ष दिले होते. मात्र, प्रत्युत्तरात मुंबईचा संघ २० षटकांत २४६/५ ​​धावाच करू शकला. तिलक वर्माने मुंबईसाठी शानदार फलंदाजी करताना सर्वाधिक ६४ धावांची खेळी साकारली. पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हैदराबादच्या फलंदाजांकडून मुंबईच्या गोलंदाजांची खूप धुलाई –

या सामन्यात हैदराबाद संघाचे सर्वच फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची खूप धुलाई केली. ज्यामध्ये सर्वात पुढे नाव होते हेन्रिक क्लासेनचे. हैदराबादसाठी हेन्रिक क्लासेनने सर्वाधिक नाबाद ८० धावांची खेळी केली. त्याने ३४ चेंडूंचा सामना करताना ७ षटकार आणि ४ चौकार लगावले. मार्करमने नाबाद ४२ धावा केल्या. त्याचबरोबर अभिषेक शर्माने ६३ आणि ट्रॅव्हिस हेडने ६२ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. ज्यामुळे हैदराबाद संघाला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले.

या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, ही कदाचित त्यांच्यासाठी या सामन्यात मोठी चूक ठरली. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या धावफलंकावर लावली, ज्याचा पाठलाग मुंबई करू शकली नाही. मुंबईच्या फलंदाजांनी संघाला विजय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिले, तरी विजय मिळवता आला नाही.

हेही वाचा – IPL 2024 : अभिषेकने शर्माने हैदराबादसाठी रचला इतिहास! ट्रॅव्हिसला मागे टाकत केला ‘हा’ खास पराक्रम

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या असलेल्या २७८ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबई संघाची चांगली सुरुवात झाली. रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी पहिल्या विकेटसाठी ५६ (२० चेंडू) धावांची भागीदारी केली. पण संघाला पहिला धक्का चौथ्या षटकात इशानच्या रूपाने बसला, जो १३ चेंडूंत २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ३४ धावा काढून बाद झाला.

तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी –

त्यानंतर मुंबईने रोहित शर्माच्या रूपाने दुसरी विकेट गमावली. जो पाचव्या षटकात १ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २६ धावा (१२ चेंडू) करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर तिलक वर्मा आणि नमन धीर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची (३७ चेंडू) भागीदारी केल्याने चाहत्यांच्या आशा पुन्हा एकदा उंचावल्या. पण ही भागीदारी ११व्या षटकात १ चौकार आणि १ षटकारांच्या मदतीने ३० धावा (१४ चेंडू) करून बाद झालेल्या नमन धीरच्या विकेटने संपुष्टात आली.

हेही वाचा – IPL 2024 : हार्दिकच्या मुंबईचा सनरायझर्सकडून पालापाचोळा, नोंदवली आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या!

यानंतर १५ व्या षटकात तिलक वर्मा पॅव्हेलियनमध्ये परतला, त्याने ३४ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकार लगावत ६४ धावा केल्या. यानंतर १८व्या षटकात कर्णधार हार्दिक पंड्याच्या रूपाने संघाला पाचवा धक्का बसला. कर्णधार पंड्याने २० चेंडूत १ चौकार आणि १ षटकार मारत २४ धावा केल्या. बाद होण्यापूर्वी हार्दिकने टीम डेव्हिडसोबत पाचव्या विकेटसाठी ४२ (२३ चेंडू) धावांची भागीदारी केली होती. टीम डेव्हिडने शेवटपर्यंत उभे राहून २२ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह ४२* धावा केल्या.

अभिषेक शर्मा वादळी अर्धशतक –

ट्रॅव्हिस हेडने अभिषेक शर्मासह डाव सांभाळला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी २३ चेंडूत ६८ धावांची भागीदारी केली. आठव्या षटकात जेराल्ड कोएत्झीने हेडची विकेट घेतली. हेडने २४ चेंडूत ६२ धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान त्याने आपल्या बॅटमधून ९ चौकार आणि ३ षटकार मारले. यानंतर अभिषेक शर्मा आणि एडन मार्कराम यांच्यात ४८ धावांची भागीदारी झाली. पियुष चावलाने ११व्या षटकात अभिषेकची शिकार केली. त्याने २३ चेंडूत ३ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ६३ धावा केल्या.

हेही वाचा – IPL 2024 : रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी रचला इतिहास! सचिन तेंडुलकरकडून मिळालं खास गिफ्ट

आयपीएलमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्या –

२७७/३ – एसआरएच विरुद्ध एमआय, हैदराबाद, २०२४
२६३/५ – आरबीसी विरुद्ध पुणे वॉरियर्स, बंगळुरू, २०१३
२५७/५ – एलएसजी विरुद्ध पीबीकेएस, मोहाली, २०२३
२४८/३ – आरसीबी विरुद्ध जीएल, बेंगळुरू, २०१६
२४६/५ – सीएसके विरुद्ध आरआर, चेन्नई, २०१०

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 srh vs mi updates sunrisers hyderabad defeated mumbai indians by 31 runs vbm