Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024 : आयपीएलच्या १७व्या हंगामातील २९व्या सामन्यात तब्बल १२ वर्षांनंतर हिटमॅन रोहित शर्माने या स्पर्धेतील दुसरे शतक झळकावले. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या या सामन्यात मुंबई इंडियन्स संघासमोर २० षटकात २०७ धावांचे लक्ष्य होते, ज्याचा पाठलाग करताना रोहित शर्माने शानदार नाबाद शतक झळकावले. पण त्याच्या संघाला २० धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे रोहित आता आयपीएलच्या इतिहासातील अशा वाईट विक्रमाचा एक भाग बनला आहे, जो आधी फक्त २ खेळाडूंच्या नावावर होता. रोहितने १०५ धावांच्या खेळीत ११ चौकार आणि ५ षटकारही मारले.

संजू सॅमसन आणि युसूफ पठाणनंतर रोहित हा तिसरा खेळाडू ठरला –

आयपीएलच्या इतिहासात, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील या सामन्यापूर्वी, केवळ २ खेळाडू असे होते, ज्यांनी लक्ष्याचा पाठलाग करताना शतकी खेळी खेळली होती, परंतु आपल्या संघाला विजयापर्यंत नेण्यात ते यशस्वी होऊ शकले नव्हते. आता या प्रकरणात रोहित शर्मा तिसरा खेळाडू ठरला आहे. या सामन्यातील शेवटच्या षटकात रोहितने आपले शतक पूर्ण केले.

रोहितपूर्वी २०१० मध्ये युसूफ पठाणने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना अवघ्या ३७ चेंडूत शतक झळकावले होते, मात्र त्याच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर २०२१ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना संजू सॅमसनने लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात ६३ चेंडूत ११९ धावांची खेळी केली होती, पण त्याचा संघ विजय मिळवण्यात यशस्वी होऊ शकला नव्हता.

हेही वाचा – IPL 2024 : मीडिया हक्कांबाबत बीसीसीआयची कठोर भूमिका, संघ-खेळाडू आणि समालोचकांना दिल्या ‘या’ विशेष सूचना

आयपीएलमधील दुसरे शतक झळकावले –

रोहित शर्माचे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील हे दुसरे शतक आहे. याआधी २०१२ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध त्याने १०९ धावांची नाबाद शतकी खेळी साकारली होती. या सामन्यात मुंबई इंडियन्सने २७ धावांनी सामना जिंकला होता. याशिवाय आयपीएलच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला आणि त्याच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. याआधी रोहित शेवटच्या १८ डावात नाबाद परतला असताना त्याच्या संघाने विजयासह सामना संपवला होता.