अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपाठोपाठ आयपीएल स्पर्धेलाही रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. एक्स अर्थात पूर्वीच्या ट्वीटर अकाऊंटवर अश्विनने यासंदर्भात घोषणा केली. जगभरातील विविध लीगमध्ये खेळण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचं अश्विनने म्हटलं आहे.
आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विन १८७ विकेट्ससह पाचव्या स्थानी आहे. चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना अश्विनने आयपीएल पदार्पण केलं. यानंतर अश्विन रायझिंग पुणे सुपरजायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज संघांकडून खेळला. पंजाब संघाचं त्याने नेतृत्वही केलं.
चेन्नई सुपर किंग्सने २०१० आणि २०११ मध्ये आयपीएल जेतेपदावर कब्जा केला होता. या संघाचा अश्विन अविभाज्य भाग होता. यंदाच्या हंगामात प्रदीर्घ काळानंतर अश्विनचं चेन्नई संघात पुनरागमन झालं. मात्र अश्विनला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. चेन्नईने तब्बल ९.५ कोटी रुपये खर्चून अश्विनला ताफ्यात समाविष्ट केलं. १४ पैकी ९ सामन्यात तो खेळला. एवढे कमी सामने खेळण्याची अश्विनची ही पहिलीच वेळ होती. अश्विनच्या गोलंदाजीवर फलंदाजांनी सहजतेने धावा लुटल्या.
आंतरराष्ट्रीय तसंच आयपीएलमधून निवृत्ती स्वीकारल्यामुळे अश्विन जगभरात सुरू असलेल्या विविध लीग्जमध्ये खेळू शकतो. बीसीसीआयच्या नियमानुसार भारतीय पुरुष क्रिकेटपटूंना आयपीएलव्यतिरिक्त अन्य लीगमध्ये खेळण्याची परवानगी नाही. मात्र आता अश्विन ऑस्ट्रेलियातील बिग बॅश, दक्षिण आफ्रिकेतील SA20, दुबईत होणारी IL20, इंग्लंडमध्ये होणारी द हंड्रेड तसंच कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये खेळू शकतो.
कसोटी प्रकारात भारतात सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विन दुसऱ्या स्थानी आहे. डिसेंबर २०२४ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असताना बॉर्डर-गावस्कर मालिकेदरम्यान अश्विनने अचानक निवृत्ती घेत चाहत्यांना धक्का दिला होता.