एक्स्प्रेस वृत्त
मुंबई : पुढील वर्षीच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील एका उपांत्य लढतीच्या आयोजनाचा मान मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला मिळणे अपेक्षित आहे. तसेच अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे सलामीची आणि अंतिम लढत खेळली जाईल असे समजते.
ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा पुढील वर्षी ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत होणार आहे. उपांत्य सामन्यात भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांसमोर आल्यास ही लढत कोलंबोला होऊ शकते. तर अन्य उपांत्य सामना वानखेडे येथे होईल.
भारतासह श्रीलंका या स्पर्धेचा सहयजमान असून दोन्ही देशांतील सात केंद्रांवर सामने पार पडतील. भारतात मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता आणि अहमदाबाद येथे सामने होतील. श्रीलंकेतील प्रेमदासा स्टेडियम (कोलंबो), पालेकेले आणि दाम्बुला किंवा हंबनटोटा यामधील एका ठिकाणी सामने होण्याची शक्यता आहे.
सराव सामन्याबाबत अजूनही चित्र स्पष्ट नसून बंगळूरु येथे काही सामने होऊ शकतात. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) सराव सामने सेंटर ऑफ एक्सलेन्स किंवा चिन्नास्वामी स्टेडियम यापैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करणार याबाबत स्पष्टता नाही.
भारतीय संघ आपले सामने मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई येथे खेळण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमची अंतिम सामन्यासाठी निवड झाली असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) येत्या काही दिवसांत कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. २०२३ च्या विश्वचषकाच्या तुलनेने या विश्वचषकाचे सामने कमी शहरात होतील आणि प्रत्येक केंद्रावर सहा सामने होण्याची शक्यता आहे, असे ‘बीसीसीआय’ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान ठरविण्यात आले. बंगळूरु व लखनऊ यांच्या समावेशाबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही.
२०२३ च्या स्पर्धेप्रमाणे….
दोन वर्षांपूर्वी अर्थात २०२३ मध्ये भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा उपांत्य सामना मुंबई, तर अंतिम सामना अहमदाबाद येथे झाला होता. आता याची पुनरावृत्ती होणे अपेक्षित आहे. तसेच ‘आयसीसी’ महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील ठिकाणांचा ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी विचार केला जाणार नसल्याचे ‘बीसीसीआय’कडून यापूर्वीच सांगण्यात आले. दरम्यान, श्रीलंका उपांत्य सामन्यासाठी पात्र झाल्यास त्यांचा सामना कोलंबो येथे होईल. पाकिस्तानने अंतिम फेरी गाठल्यास सामना त्रयस्थ ठिकाणी म्हणजेच श्रीलंकेत होणार असल्याचे ‘आयसीसी’कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
