Side Effects of Eating too Much Beetroot: आरोग्यदायी असण्यासोबतच बीट हे त्याच्या सुंदर लाल रंगामुळेही लोकप्रिय आहे. बीट किंवा बीटरूटच्या विशेष चवीमुळे सॅलडसाठी त्याला सगळ्यांची पसंती असते. बीट चवदार असण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. काही लोक या बीटाचा रस पितात किंवा भाज्यांमध्ये घालून खातात. त्यात अनेक जीवनसत्त्वे असतात; जी शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात. बीट हे प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, मॅग्नेशियम, लोह, तांबे, फायबर व क जीवनसत्त्व यांचा उत्कृष्ट स्रोत आहे. कंदमूळ बीट हे आयुर्वेदिक औषध म्हणून उत्तम कार्य करते. बीट हा हिमोग्लोबिन वाढविण्याचा सगळ्यात सोपा उपाय आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय लोक बीटरूट मोठ्या उत्साहाने खातात; विशेषत: सॅलडच्या स्वरूपात. अनेकांना ते बारीक चिरून शिजवून खायला आवडते. परंतु, तुम्हाला माहीत आहे का की, बीटरूटचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने फायद्याऐवजी नुकसानदेखील होऊ शकते. कोणत्या आजारात बीटरूटचे सेवन चुकूनही करू नये. कारण- असे करणे नुकसानीचे ठरू शकते. चला जाणून घेऊ कोणी बीटरूटचे जास्त सेवन करणे टाळावे. पोषणतज्ज्ञ श्वेता शाह यांनी कोणत्या लोकांनी बीटरूटचे सेवन मर्यादित प्रमाणात केले पाहिजे, याविषयी सांगितल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

(हे ही वाचा : केसांच्या वाढीसाठी आल्याचा चहा खरंच फायदेशीर? उपाय करण्यापूर्वी वाचा तज्ज्ञाचा सल्ला )

पोषणतज्ज्ञ सांगतात, “पाचक आरोग्य सुधारण्यापासून ते जळजळ कमी करण्यापर्यंत बीटरूट त्यांच्या असंख्य आरोग्य फायद्यांसाठी ओळखले जाते. बीटामध्ये फोलेट, जीवनसत्त्व बी ९, पोटॅशियम, लोह, मँगनीज, तांबे, जीवनसत्त्व क व वनस्पती संयुगे यांसारख्या अनेक आरोग्यप्रवर्तक गुणधर्मांसह आवश्यक खनिजे आणि पोषक घटक असतात. बीटरूटमध्ये कॅलरीज आणि चरबीदेखील कमी आहे. बीट हा फायबरचा एक चांगला स्रोत आहे; ज्यामुळे तुमच्या पाचक आरोग्याला फायदा होतो आणि अनेक जुनाट आरोग्य त्रासांचा धोका कमी होतो.

“परंतु, बीटरूट हे निरोगी असले तरी कमी रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी ते खाणे हानिकारक असू शकते. कारण- बीटरूट रक्तदाब आणखी कमी करते. तथापि, उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी ते चांगले आहे. तसेच, बीटरूटमध्ये नायट्रेटचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे लहान मुलांमध्ये नायट्रेटची विषबाधा होऊ शकते. त्यामुळे तीन महिने किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना बीटरूट देणे टाळावे,” असे त्यांनी सांगितले.

जर तुम्हाला कमी रक्तदाबाचा त्रास असेल, तर बीट खाणे धोक्याचे आहे. कमी रक्तदाबाच्या रुग्णांनी गरजेपेक्षा जास्त बीटरूट खाऊ नये. कारण- तसे केल्याने त्यांचा रक्तदाब आणखी कमी होऊ शकतो. बीटरूटमध्ये नैसर्गिकरीत्या नायट्रेटचे प्रमाण जास्त असते; जे आपले पाचन तंत्र नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित करते. हा घटक रक्तवाहिन्यांना आराम देतो आणि रुंद करतो; ज्यामुळे रक्तदाब आणखी कमी होतो. त्यामुळे कमी रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त लोकांनी बीटरूट टाळावे. आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी आपल्या डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Effect of beetroot why people with low blood pressure must limit their beetroot consumption read to know more pdb
First published on: 15-02-2024 at 11:44 IST