उन्हाळ्यामध्ये लोक अगदी मनसोक्त आंबा खातात. आंबे खाण्याचा आनंद काही औरच! त्यात मराठी माणसांना आंबा अंमळ अधिकच आवडतो. त्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये आंबे खाण्यास केलेली सुरुवात पाऊस सुरू झाला तरी थांबत नाही. पावसाळा सुरु होण्याच्या दरम्यान आंबे स्वस्त होतात, हेसुद्धा एक कारण या दिवसांमध्ये आंबे अधिक प्रमाणात खाण्यामागे असावे. मात्र पाऊस पडू लागल्यावर आंबे खाणे आरोग्याला बाधक होते, असे दिसते. आंब्यांवर पाणी पडल्यावर आंबे पोटासाठी चांगले नाहीत, असे वयस्कर माणसेही सांगतात. गुजराथी समाजामध्येही पहिला पाऊस पडल्यावर आंबा खाणे बंद केले जाते. पाऊस सुरु झाल्यावरच नव्हे तर पाऊस यायच्या आधी सुद्धा अर्थात ऋतुसंधीकाळामध्ये सुद्धा आंबा खाणं टाळावं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उन्हाळ्यामध्ये घट्ट-कसदार-आकर्षक रंगाचा व विशिष्ट सुगंधाचा असलेला आंबा पाऊस पडल्यावर पिचपिचीत-नरम-निस्तेज होऊन स्वतःचा रंग व गंध घालवून बसतो.या लक्षणांवरुनच खरं तर आता आंबा खाण्यालायक राहिलेला नाही, हे कळायला हवं. मात्र ‘आता पुन्हा वर्षभर आंबा खायला मिळणार नाही’ या विचाराने म्हणा किंवा मार्च- एप्रिलमध्ये महाग असताना खायला मिळाले नाहीत, आता स्वस्त झाले आहेत तर खाऊन घेऊया या कल्पनेने म्हणा, लोकांना आंब्याचा मोह काही सुटत नाही आणि पाऊस पडू लागला तरीही आंबे खाणे चालूच राहते.

हेही वाचा… Mental Health Special: ‘Lockdown Teenagers’च्या समस्या काय आहेत?

आयुर्वेदाने तर अकालज फळांचे अर्थात त्या-त्या फळांचा हंगाम उलटून गेल्यानंतर त्या फळांचे सेवन करणे आरोग्यास अहितकारक सांगितले आहे. आयुर्वेदानुसार उन्हाळ्यातली फळे उन्हाळ्यातच खाल्ली पाहिजेत, ती पावसाळ्यात खाणे योग्य नाही,हे साधे तारतम्य आहे. उन्हाळ्यात नित्य खाल्ली जाणारी काकडी किंवा कलिंगड पावसाळ्यात तुम्ही खाता का? सहसा नाहीच, मग आंबा तरी का खायचा?

मागील काही वर्षांपासून आंब्याचे विक्रेते ‘हापूस नसला तरी लंगडा,केसर,दसहरी हे आंब्याचे प्रकार पावसाळ्यात खायला हरकत नाही’,असे तुम्हांला पटवत राहातात. विक्रेत्यांचे काय, उपलब्ध झाले तर ते तुम्हाला दिवाळीपर्यंत आंबे खायला आग्रह करतील! पण कोणाच्या आग्रहाला किती बळी पडायचे हे शेवटी आपणच ठरवायचे नाही का? शिवाय हे आंबे ज्या उत्तर भारतातले आहेत, तिथे जरी तो आंबा जूनमध्ये मिळत असला तरी तिथे पाऊससुद्धा तुलनेने महिन्याभरानंतर सुरू होतो, हे विसरता कामा नये. त्यामुळे त्या-त्या प्रदेशासाठी ते आंबे उन्हाळ्यातलेच आहेत.

हेही वाचा… दिवसा घेतलेली डुलकी तुमच्या मेंदूसाठी चांगली आहे का? काय सांगते संशोधन, जाणून घ्या…

मात्र आपण इथे जेव्हा त्यांना खाऊ पाहतो तेव्हा इथे पाऊस सुरु होणार असतो किंवा सुरु झालेला असतो. पावसाळ्याच्या आरंभी ऋतुसंधिकाळामध्ये असे गुणांनी हीन झालेले आंबे खाल्ल्याने एकतर पोट बिघडते. अपचन-पोटफ़ुगी-अम्लपित्त-जुलाब यांसारखे त्रास होतात, तर दुसरीकडे पावसाळ्यात आंबे खाल्ल्यामुळे सर्दी-दम्याचा त्रासही उसळताना दिसतो.नाक वाहणे,शिंका,छातीमध्ये कफ जमून घुर्‌-घुर्‌ आवाज येणे, श्वास घेताना छाती जड होणे, दम लागणे वगैरे सर्दी-दम्याचे त्रास आंब्यामुळे होतात, हे अनेकांना पटणार नाही.

जुन्या काळापासून लोक म्हणत आले आहेत की सर्दी-दम्याच्या रुग्णाने पाऊस सुरु होईपर्यंत किंवा पावसाळ्यात सुद्धा आंबे खाल्ले तर वरील लक्षणे सुरु होतात आणि आधीच त्रास होत असला तर तो बळावतो. आंबे खाणे बंद केल्यावर तो-तो त्रास थांबताना दिसतो, हे विशेष. पावसाळ्याच्या आरंभीच्या दिवसांमध्ये अग्नी मंद असताना, धड भूक लागत नसताना खाल्लेले आंबे पचण्याची शक्यता कमीच असते. त्यामुळे होताहोईतो पाऊस पडायला लागल्यानंतर आंबे टाळणेच योग्य, निदान ज्यांना या दिवसात तो पचत नाही त्यांनी तरी!

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health special should you eat mango when it is raining hldc dvr