राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यात शेतकरी नैसर्गिक संकटात अडकलेला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कार कार्यक्रम आणि उशिरा चालणाऱ्या भाषणांवर आक्षेप घेतला आहे. “राज्याचे प्रमुखच नियम तोडतात, मग तिथले पोलीस आयुक्त काय करणार? ते कुणाला सांगणार?” असा सवाल पवारांनी केला. ते मंगळवारी (२ ऑगस्ट) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणते कार्यक्रम घ्यावेत हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. मात्र, एकंदरीत आपण बघितलं तर, नाशिक, औरंगाबाद किंवा इतर वेगवेगळ्या ठिकाणी मिरवणुका, सत्काराचे कार्यक्रम झाले. खरंतर १० वाजल्यानंतर मुख्यमंत्री असू किंवा कुणीही असू माईक बंद करायचा असतो.”

“आम्ही कधीकाळी उपमुख्यमंत्री होतो”

“आम्ही कधीकाळी उपमुख्यमंत्री होतो. तो नियम सर्वांना आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा नियम केवळ गणपती व इतर महापुरुषांच्या जयंती उत्सवाच्या काळात ८-१५ दिवसांसाठी मुभा दिली आहे. मात्र, हे नियम कुणीच पाळत नाही,” असा आरोप अजित पवारांनी केला.

“राज्याचे प्रमुखच नियम तोडतात, मग पोलीस आयुक्त कुणाला सांगणार?”

यानंतर अजित पवार हसत हसत म्हणाले, “आता जे राज्याचे प्रमुख आहेत तेच नियम तोडत आहेत. अशावेळी त्या ठिकाणचे पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक काय करणार? ते कुणाला सांगणार? आदेश देणारेच नियम तोडायला लागले, घटना पायदळी तुडवायला लागले तर हे बरोबर नाही. हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी कुणी बघितलं नव्हतं.”

“तुमच्या उत्साही कार्यकर्त्यांना आवर घाला”

“मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीला आवर घातला पाहिजे. त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांना सांगितलं पाहिजे. बाबांनो, आता १० वाजले, आपण नियमांचं पालन करत वागलं पाहिजे. परंतु तसं होताना दिसत नाही,” असं अजित पवारांनी नमूद केलं.

हेही वाचा : “गेले एक महिना या गद्दारांचं…”, कार्यालयातून फोटो काढणाऱ्या बंडखोरांना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर

“उपमुख्यमंत्र्यांनी मात्र १० नंतर माईक वापरल्याचं मला दिसलं नाही”

“उत्साह असतो, मात्र त्याचा इतरांना त्रास होणार नाही याची तरी खबरदारी घेतली पाहिजे. तसं होताना दिसत नाही. ही गोष्ट राज्याने लक्षात घेतली पाहिजे. उपमुख्यमंत्र्यांनी मात्र १० नंतर माईक वापरल्याचं मला दिसलं नाही. त्यामुळे मी त्यावर बोलू इच्छित नाही,” असंही पवारांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar criticize cm eknath shinde over late night loudspeaker use and programs pbs