Amol Mitkari vs Rajan Patil Son Balraje Patil : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगर पंचायतीची निवडणूक बिनविरोध होणार आहे. अनगरचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होते. या पदासाठी सुरुवातीला तीन अर्ज दाखल झाले होते. मात्र, यापैकी भाजपा उमेदवाराचा अर्ज वैध ठरला आहे. तर, भाजपा उमेदवाराला आव्हान देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार) उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे. तसेच अनगरमध्ये केवळ १७ भाजपा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्याविरोधात कुठलाही अर्ज प्राप्त झालेला नाही. परिणामी अनगरची निवडणूक बिनविरोध होत आहे.
नगराध्यक्षपदासाठी भाजपाच्या प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील (माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई), राष्ट्रवादीकडून (अजित पवार गट) उज्ज्वला थिटे आणि अपक्ष सरस्वती शिंदे यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, उज्ज्वला थिटे यांनी नामनिर्देशन पत्रात सूचकाची सही नाही असा आक्षेप घेत चौकशीअंती त्यांचा अर्ज अपात्र ठरवण्यात आला आहे. याबाबत अनगर नगरपंचायचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे.
अनगरमध्ये कोणाचं वर्चस्व?
अनगर नगरपंचायतीवर राजन पाटलांचं वर्चस्व आहे. त्यांना यापूर्वी कोणाचं आव्हान मिळालं नव्हतं. मात्र, यंदा प्रथमच अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदासाठी उमेदवार देऊन आव्हान निर्माण केलं होतं. मात्र, ते आव्हान विरून गेलं आहे. त्यामुळे राजन पाटील यांच्या कुटुंबियांनी, समर्थकांनी व भाजपा कार्यकर्त्यांनी मंगळवारी (१८ नोव्हेंबर) नगरपंचायत कार्यालयाबाहेर हालगीच्या तालावर ठेका धरत जल्लोष केला. यामध्ये राजन पाटील यांचे थोरले चिरंजीव आघाडीवर होते.
बाळराजे पाटलांचं अजित पवारांना आव्हान
नगरपंचायत कार्यालयाबाहेर भाजपा कार्यकर्ते जल्लोष करत असताना बाळराजे पाटील एका कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून जल्लोष करत होते. त्याचवेळी ते कॅमेऱ्याकडे बोट दाखवून अगदी त्वेषाने म्हणाले, “अजित पवार… सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय.”
अमोल मिटकरींचा संताप
यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून प्रतिक्रिया आली आहे. या पक्षाचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी एक्सवर एक पोस्ट लिहून संताप व्यक्त केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की राजन पाटील आणि त्यांची दोन्ही वाया गेलेली मोकाट कार्टी यांना सत्तेचा अति माज आलाय. ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांच्याबद्दल केलेली मस्तीची भाषा याला प्रसंगी योग्य उत्तर देऊच पण तूर्तास या औलादींची मस्ती ‘मालकाला’ भिकारी बनवेल… तुर्तास इतकेच.”
