कर्जत: मिरजगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपचे लहू वतारे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) सागर पवळ यांचा १० विरुद्ध ७ मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीचे डॉ. पंढरीनाथ गोरे व त्यांच्या पत्नी डॉ. शुभांगी गोरे या दोघांची मते फुटली. त्यांनी भाजपचे उमेदवार लहू वतारे यांना मते दिल्यामुळे सागर पवळ यांचा पराभव झाला.

विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत डॉ. पंढरीनाथ गोरे हे भाजपचे राम शिंदे यांना सोडून राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्यासोबत गेले होते. ते आता पुन्हा विधान परिषदेचे सभापती शिंदे यांच्यासोबत आले आहेत. अवघ्या पाच महिन्यांवरच मिरजगाव ग्रामपंचायतची निवडणूक आलेली असताना, डॉ. पंढरीनाथ गोरे यांना कोणता शब्द सभापती राम शिंदे यांनी दिला, त्यामुळे त्यांनी रोहित पवार यांची साथ सोडली, याची चर्चा मिरजगावमध्ये सुरू झाली आहे.

मिरजगावच्या उपसरपंच संगीता आबासाहेब वीर यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे या पदाची निवडणूक घेण्यात आली. या पदासाठी भाजपचे लहू वतारे इच्छुक होते. ग्रामपंचायतचे १७ सदस्य असून, यामध्ये सरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपच्या सुनीता खेतमाळीस यांना अपक्ष तीन सदस्यांनी पाठिंबा देऊन सरपंचपदी बसवले तर अपक्ष संगीता वीर यांना दोन वर्षांसाठी देण्याचे ठरले होते. मात्र, त्यांनी लवकर राजीनामा दिला.

विद्यमान सरपंच खेतमाळीस गटाकडून भाजपचे लहू वतारे यांनी तर विरोधात राष्ट्रवादीचे सागर पवळ यांनी उपसरपंचपदासाठी अर्ज दाखल केला. खेतमाळस यांच्याकडे आठ सदस्य होते. आठ सदस्यांनी सभापती शिंदे यांची भेट घेतली व सकाळी उपसरपंचपदाच्या निवडणुकीदरम्यान अचानक डॉ. गोरे हे माजी सरपंच खेतमाळस यांच्या गोटात दिसल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले. या निवडणुकीचे कामकाज ग्रामविकास अधिकारी विकास हगारे यांनी पाहिले. भाजपचे राम शिंदे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला तरी भाजपकडून त्यांना ताकद दिली जात आहे. विधान परिषदेचे सभापती मिळाल्यानंतर भाजपने स्थानिक पातळीवर अनेक धक्के आमदार रोहित पवार यांना दिले आहेत.

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, सरपंच नितीन खेतमाळीस, परमवीर पांडुळे, डॉ. पंढरीनाथ गोरे या सर्वांच्या सहकार्यामुळे व माझ्यासोबत असलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांमुळे मला विजय मिळाला. उर्वरित काळात नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल. माझ्यासारख्या सामान्य गरीब कुटुंबातील कार्यकर्त्याला संधी दिल्याबद्दल सभापती शिंदे यांचे आभार. – लहू वतारे, उपसरपंच, मिरजगाव.