फॅशनच्या नावाखाली राज्यात नंगटपणा चालू देणार नाही, अशी भूमिका घेऊन उर्फी जावेदला विरोध केल्यामुळे भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर आता चित्रा वाघ यांनी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांची तुलना थेट महात्मा जोतिबा फुले यांच्याशी केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी पुण्यातील हळदी-कुंकाच्या कार्यक्रमामध्ये ‘घराघरात सावित्री झाल्या आहेत. आम्हाला आता चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या जोतिबांचा शोध आहे,’ असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> ‘नितीन गडकरींमध्ये पंतप्रधानपदाच्या खुर्चीला न्याय देण्याची शक्ती,’ शिंदे गटातील नेत्याचे विधान

चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या?

“काही मिनिटांपूर्वी दादा खूप छान बोलले. आज पहिल्यांदा एका महिलेला पाच पुरूषांनी ओवाळले. म्हणजे दादा नेहमीच काहीतरी वेगळे परिवर्तन घडवतात. मी नेहमी म्हणते की पुणे हे स्त्री शक्तीचे केंद्र आहे. पुण्यातूनच सर्व स्त्री शक्तीच्या चळवळींची सुरुवात झालेली आहे. मी नेहमीच म्हणते की आम्हाला सावित्री घरोघरी दिसत आहेत. मात्र चंद्रकांत दादा आणि हेमंत रासने यांच्यासारख्या जोतिबांचा शोध मात्र जारी आहे. असेच जोतिबा समाजात जास्तीत जास्त निर्माण होवोत, अशा सुभेच्छा देते,” असे चित्रा वाघ म्हणाल्या.

हेही वाचा >> धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या तुकाराम महाराजांवरील वादग्रस्त विधानानंतर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या “आपण…”

चित्रा वाघ यांचे मानसिक संतुलन ढासळलेले आहे

चित्रा वाघ यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. “आम्ही चित्रा वाघ यांना खूप प्रगल्भ समजत होतो, मात्र मानसिक संतुलन ढासळल्यासारखे त्या वागत आहेत. आज त्यांनी कमाल केली. त्यांनी चंद्रकांत पाटील यांची तुलना चक्क महात्मा जोतिराव फुले यांच्यासोबत केली आहे. तुम्ही तुमच्या नेत्यांना खूश करण्यासाठी असे वक्तव्य करत आहात. अशी वक्तव्ये जरूर करावीत, मात्र यामध्ये महापुरुषांना घेऊ नये,” अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली. तसेच तुमचा पक्ष अगोदरच गोत्यात आलेला आहे. त्यात तुम्ही आग ओतण्याचे काम करू नका, असे म्हणत त्यांनी चित्रा वाघ यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader chitra wagh compare chandrakant patil with mahatma jyotiba phule prd