Chhagan Bhujbal On Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणातील काही आरोपींना अटक केलं. मात्र, अजूनही या प्रकरणातील काही आरोपी फरार आहेत. तसेच पवनचक्की प्रकल्पात दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी कराड हा सीआयडीला शरण आला आहे. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. दरम्यान, वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंचा मंत्रि‍पदाचा राजीनामा घेतला जावा किंवा त्यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुसरीकडे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्यामुळे ते नाराज आहेत. यासंदर्भात बोलताना विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं की, “कदाचित मंत्री धनंजय मुंडे यांची विकेट काढली जाऊ शकते आणि त्यांच्या ऐवजी छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो.” दरम्यान, यानंतर छगन भुजबळ यांना विजय वडेट्टीवार यांच्या विधानाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळांनी स्पष्ट सांगितलं की, “मला मंत्रिपद मिळण्यासाठी कोणालातरी मंत्रिमंडळातून काढावं हे माझ्या मनात येणं अशक्य आहे.”

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांनी भेटीवेळी तुम्हाला मंत्रिपदाचा शब्द दिला आहे का? भुजबळांचं मोठं भाष्य; म्हणाले, “मला मंत्रिपदाबाबत…”

धनंजय मुंडेंच्या ऐवजी तुम्हाला संधी मिळेल का?

छगन भुजबळ हे परदेशात गेले होते. आज ते परदेश दौऱ्यावरून नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी धनंजय मुंडेंच्या ऐवजी तुम्हाला संधी मिळेल का? असा प्रश्न भुजबळांना विचारला असता ते म्हणाले, “विजय वडेट्टीवार काय म्हणतात किंवा जितेंद्र आव्हाड काय म्हणतात यावर मी काही चर्चा करू शकत नाही. तसेच हे डोक्यातून काढून टाका की, मला मंत्रिपद मिळालं नाही आणि मला मंत्रिपद मिळण्यासाठी कोणालातरी मंत्रिमंडळातून काढावं, असं काहीही माझ्या मनात येणं हे शक्य नाही.”

फडणवीसांनी मंत्रिपदाचा शब्द दिला आहे का?

महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत नेमकं काय चर्चा झाली? याबाबत अनेकांना उत्सुकता लागली होती. तसेच या भेटीत फडणवीसांनी मंत्रिपदाचा शब्द दिला आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. दरम्यान, या भेटीत फडणवीसांनी मंत्रिपदाचा शब्द दिला आहे का? यावर आता छगन भुजबळ यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस मला मंत्रिपदाबाबात काही बोलले नाहीत. फक्त ७ ते १० दिवस थांबा नंतर चर्चा करु एवढंच ते म्हणाले होते. मला मंत्री करणार किंवा आणखी काही जबाबदारी देणार असं काहीही बोललेले नाहीत. मी देखील तसं काही सांगितलं नाही”, असं भुजबळांनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal on mahayuti cabinet expansion ncp ajit pawar politics and will you replace dhananjay munde as a minister gkt