सांगली : मराठा आरक्षणाच्या अद्यादेशाबाबत मंत्री छगन भुजबळ यांचा झालेला गैरसमज मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री दूर करतील, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी सांगलीत व्यक्त केला. दरम्यान उपराष्ट्रपती निवणुकीवेळी विरोधकांची मते फुटली असा आरोप केला जातो याबाबत ते म्हणाले, गुप्त मतदानामुळे असे आरोप-प्रत्यारोप होतच राहतील. तसेच खासदार विशाल पाटील हा विषय भाजपसाठी तुर्तास संपला आहे असेही ते म्हणाले.

महापालिकेच्या अग्निशमन केंद्राचे लोकार्पण मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. यावेळी मंत्री पाटील म्हणाले, मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाने ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही. मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अद्यादेशाबाबत मंत्री भुजबळांचा जो गैरसमज झाला आहे. तो मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दूर करतील.

जसजसा गैरसमज दूर होईल तसतशी त्यांची नाराजी, आक्रमकपणाही दूर होईल. त्यांचे समाधानही होईल. सगळ्यांनी सर्व समाजाचा विचार करायला हवा, मात्र आज सामाजिक वीण विस्कटली आहे. प्रत्येक जण आपापल्या समाजाचा विचार करतोय हे दुर्दैव आहे, पण त्यात चुकीचेही काही नाही असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, खासदार विशाल पाटील यांची भाजपशी जवळीक वाढली आहे का, असे विचारले असता, कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येणे स्वाभाविक असून एकमेकांची विचारपूस करणे, जेवणासाठी जाणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. खा. पाटील हे भाजपचे सहयोगी सदस्य होतील अशी शक्यता आता नाही. उपराष्ट्रपती निवडणुकीवेळी ती शक्यता होती, मात्र, आता तोही विषय संपला आहे. उपराष्ट्रपती निवणुकीवेळी विरोधकांची मते फुटली असा आरोप केला जातो याबाबत ते म्हणाले, गुप्त मतदानामुळे असे आरोप-प्रत्यारोप होतच राहतील.

भाजपने आमचे घर फोडले असा आरोप खासदार पाटील यांनी केला आहे. याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, श्रीमती जयश्री पाटील या काही लहान नाहीत. त्यांना त्यांचे व कार्यकर्त्यांचे राजकीय हित-अहित चांगले कळते. पूर्ण विचार करूनच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या भाजप प्रवेशासाठी कोणतीही बळजबरी अथवा मोहिनी अस्त्र वापरलेले नाही. त्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया खूप अगोदरपासून सुरू होती. प्रवेश केल्यानंतर या मंडळींना कळाले असेल असेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.