अनेक दिवसांपासून ज्याची चर्चा होती ते खातेवाटप आज पार पडलं. अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं देण्यात आलं आहे. तसंच महत्वाची खाती राष्ट्रवादीला देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार यांची खाती काढून राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली. खातेवाटप झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. शिंदे गटाला शेवटी अजित पवारांच्या टोल नाक्यावर थांबावं लागलं असा टोला ठाकूर यांनी लगावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे यशोमती ठाकूर यांनी?

अजित पवार आर्थिक नाकेबंदी करतात म्हणून महाराष्ट्राची हद्द ओलांडून सुरत मार्गे गुवाहाटी-गोवा करत राज्यात पोहोचलेल्या शिंदेगटाला शेवटी अजित पवारांच्याच टोल नाक्यावर येऊन थांबावं लागलं ही एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकीर्दीची शोकांतिका आहे. शिंदे यांचे राजकीय अस्तित्व फार दिवसाचं नाही हेच आज सिद्ध झाले. हिवाळी अधिवेशनात एकनाथ शिंदे नसतील हे आज स्पष्ट झालंय.

अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अजित पवार हे महाविकास आघाडीत अर्थमंत्री होते. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यानंतर जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा त्यांनी अजित पवारांवरही टीका केली होती. अजित पवार यांनी निधी वाटपात पक्षपातीपणा केला होता. शिवसेनेच्या आमदारांना निधी वाटताना दुजाभाव केल्याचं म्हटलं होतं. अशात आता अर्थखातं हे अजित पवारांकडेच आलं आहे.

हे पण वाचा- Maharashtra Cabinet Expansion : भाजपाची सहा तर शिंदे गटाची तीन खाती राष्ट्रवादीकडे, खांदेपालट कसं झालं?

अर्थ खातं- अजित पवारांकडे अर्थ खातं देण्यात आलं आहे. हे खातं आधी भाजपाकडे होतं आणि देवेंद्र फडणवीस हे अर्थमंत्री होते. मात्र आता अजित पवार अर्थमंत्री असतील.

कृषी खातं– हे खातं नव्या खातेवाटपात धनंजय मुंडेंना देण्यात आलं आहे. ते आधी शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांच्याकडे होतं.

भाजपाच्या अतुल सावे यांच्याकडे असलेलं सहकार खातं आता राष्ट्रवादीच्या दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आलं आहे.

भाजपाच्या रविंद्र चव्हाण यांच्याकडे असलेलं अन्न आणि नागरी पुरवठा खातं हे छगन भुजबळांना देण्यात आलं आहे.

शिवसेनेच्या संजय राठोड यांच्याकडे असलेलं अन्न आणि औषध प्रशासन खातं हे राष्ट्रवादीच्या धर्मराव बाबा अत्राम यांना देण्यात आलं आहे.

भाजपाच्या गिरीश महाजन यांच्याकडे असलेलं क्रीडा आणि युवक कल्याण खातं हे संजय बनसोडेंना देण्यात आलं आहे.

भाजपाच्या मंगलप्रभात लोढांकडे असलेलं महिला आणि बालकल्याण खातं हे राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंना देण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असलेलं मदत आणि पुनर्वसन खातं हे राष्ट्रवादीच्या अनिल पाटील यांना दिलं गेलं आहे. नव्या खातेवाटपाचा विचार केला तर हे लक्षात येतं की राष्ट्रवादीला जी खाती मिळाली आहेत त्यात भाजपाकडे असलेली सहा खाती आणि शिवसेनेकडे असलेल्या तीन खात्यांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader yashomati thakur criticized eknath shinde about ajit pawar got finance department scj