Eknath Shinde on BJP and Devendra Fadnavis : जून २०२२ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील ४० आमदारांना आपल्याबरोबर घेऊन महाराष्ट्र सोडून थेट गुवाहाटीला निघून गेले. त्यांनी या ४० आमदारांसह वेगळा गट स्थापन केला आणि आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला. त्यावर निवडणूक आयोगाने देखील शिक्कामोर्तब केलं. त्यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील तत्कालीन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं.
ठाकरेंचं सरकार कोसळल्यानंतर शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन केलं. शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर पुढील अडीच वर्षे त्यांनी राज्याचं नेतृत्व केलं.
भाजपाने शिंदेंना बाजूला सारलंय का?
दरम्यान, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने २३८ जागा जिंकत राज्यात सत्ता मिळवली. मात्र, यावेळी भाजपाने मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केली. तर, शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपद मिळावं यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, भाजपाने तब्बल १३२ जागा जिकंल्याने भाजपाने मुख्यमंत्रिपद सोडलं नाही. शिंदे मुख्यमंत्री असताना ते महायुतीचे प्रमुख नेते होते. भाजपाचा त्यांना खंबीर पाठिंबा होता. मात्र, आता फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपाने शिंदे यांना बाजूला सारल्याची चर्चा आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे दी इंडियन एक्सप्रेसच्या आयडिया एक्सचेंज या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मराठा आंदोलन, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि राज्यातील सध्याची स्थिती यावर भाष्य केलं.
आम्ही तिघे एक टीम आहोत : शिंदे
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपाने तुम्हाला बाजूला केलंय का? असा प्रश्न विचारल्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “नाही! मला तसं वाटत नाही. कारण मी मुख्यमंत्री होतो तेव्हा दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मी असे मिळून आम्ही एक टीम म्हणून काम करत होतो. आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. आता ते आणि आम्ही दोघे (दोन्ही उपमुख्यमंत्री) अशी आमची टीम आहे.
आम्हाला विकसित भारताचं स्वप्न साकार करायचं आहे : उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे म्हणाले, “विकास हा आमचा प्रमुख अजेंडा आहे, आम्हाला महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे. यात आमचा कुठलाही वैयक्तिक अजेंडा नाही. सध्या महाराष्ट्रात बरीच गुंतवणूक येत आहे. पंतप्रधान मोदी यांचं जे २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्याचं स्वप्न आहे, त्यासाठी आम्ही काम करत आहोत. या विकासाचे आम्ही तीन टप्पे तयार केले आहेत. २०२९, २०३५ आणि २०४७ अशा टप्प्यांत आम्ही काम करणार आहोत.”