सावंतवाडी : शेअर बाजारातील गुंतवणुकीवरून सावंतवाडी शहरात शनिवारी रात्री झालेल्या ‘फ्री स्टाईल’ मारहाणीप्रकरणी दोन्ही गटातील ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ९ जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेत वापरलेल्या दोन कार जप्त करण्यात आल्या असून, एका वाहनाचा शोध सुरू आहे. पोलीस कोठडीत असलेल्या ९ जणांना उद्या, २८ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
गुंतवणूक परतावा न मिळाल्याने राडा:
सावंतवाडी शहरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास शेअर्स मार्केटमधील गुंतवणुकीच्या पैशाचा वेळेत परतावा न मिळाल्याने दोन गटांत तुफान राडा झाला होता. या घटनेनंतर गुंतवणूकदार चलबिचल झाले असून, ज्यांनी गुंतवणूक केली होती ते बहुतांश कोल्हापूर आणि पुणे येथील असल्याने या घटनेची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न; ६ जणांवर गुन्हा
दरम्यान, पुणे येथील पाच जणांवर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सावंतवाडी येथील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी अद्याप शोध न लागलेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी सावंतवाडी पोलिसांचे एक पथक गोवा येथे रवाना झाले आहे.
कोट्यवधींची गुंतवणूक आणि पैशांचा तगादा:
सावंतवाडी शहरातील सागर कारिवडेकर या तरुणाने शेअर्स मार्केटच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक वेगवेगळ्या गुंतवणूकदारांकडून घेतली होती. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून काही कारणांमुळे गुंतवणूकदारांचे पैसे देणे थांबले होते. वेळेत रकमेचा परतावा मिळत नसल्याने गुंतवणूकदारांकडून कारिवडेकर यांच्या मागे तगादा लावला जात होता. याच पार्श्वभूमीवर, कारिवडेकर यांच्याजवळ पुणे येथील काही गुंतवणूकदारांचे तब्बल चार ते साडेचार कोटी रुपये देणे आहे. सध्या पैसे देता येणार नसल्याने, त्याने गुंतवणूकदारांना आपली आलिशान कार देण्याचे सांगितले होते. ही कार घेण्यासाठी आलेल्या पुणे येथील गुंतवणूकदार आणि कारिवडेकर यांच्या गटात सावंतवाडीत मोठा राडा झाला होता.
परस्पर विरोधी गुन्हे दाखल:
या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही गटांतील तब्बल ११ जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले. यापैकी नऊ जणांना अटक करण्यात आली असून, उर्वरित दोघेजण फरार आहेत. हे दोघेजण पुणे येथील गुंतवणूकदारांच्या अंगावर गाडी घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात आरोपी आहेत. या दोघांचा शोध घेण्यासाठी सावंतवाडी पोलिसांचे एक पथक गोव्याकडे रवाना झाले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.
गुंतवणूकदार वाढण्याची भीती, पोलीस अलर्ट:
सागर कारिवडेकर यांच्याजवळ गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठी असून, हे सर्वजण कोल्हापूर आणि पुणे येथील आहेत. यातील बहुतांश मंडळी उद्योगाशी संबंधित आहेत आणि त्यांचीच गुंतवणूक मोठी आहे. त्यामुळे आता अनेकजण पैशाचा तगादा लावण्यासाठी सावंतवाडीत येऊ शकतात, अशी भीती पोलिसांना आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वेळीच खबरदारी घेतली आहे.
