Lalbaugcha Raja Ganpati Visarjan Highlights: मुंबईतील प्रसिद्ध मंडळ लालबागचा राजा गणपतीचं अखेर विसर्जन पार पडलं आहे. रविवारी सकाळपासून लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी खोळंबून असल्याचे चित्र दिसलं. यंदा विसर्जनासाठी स्वयंचलित व हायड्रोलिक यंत्रणेसह खास तराफा तयार करण्यात आला होता. मात्र लालबागच्या राजाची मूर्ती या तराफ्यावर चढू शकत नसल्यामुळे कित्येक तासांपासून लालबागचा राजा समुद्रातील चार-पाच फूट उंचीच्या पाण्यातच स्थिरावला आहे. दरम्यान कोळी बांधवांनी लालबागचा राजा मंडळावर गंभीर आरोप केले आहेत.

लालबागचा राजा गणपतीच्या विसर्जनासंबंधी आणि त्याच्याशी निगडित सर्व घडामोडी खालील ब्लॉगमध्ये जाणून घ्या…

Live Updates

Lalbaugcha Raja Visarjan Live Updates | लालबागचा राजा विसर्जन २०२५ लाईव्ह अपडेट्स

21:39 (IST) 7 Sep 2025

Lalbaugcha Raja Visarjan 2025 Live Updates: अखेर प्रतीक्षा संपली! ३३ तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन संपन्न

शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुरू झालेली लालबागचा राजा मंडळाची मिरवणूक रविवारी पहाटेपर्यंत सुरू होती. पहाटे गिरगाव चौपाटीवर ओहोटी सुरू झाल्यामुळे बाप्पाचे विसर्जन खोळंबले होते. अखेर ३३ तासांच्या प्रतिक्षेनंतर गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.

21:05 (IST) 7 Sep 2025

अखेर प्रतीक्षा संपली! थोड्याच वेळात होणार लालबागच्या राजाचं विसर्जन

बऱ्याच वेळ विलंब झाल्यानंतर आता काही वेळातच लालबागच्या राजाचे विसर्जन पार पडणार आहे. यासाठी गिरगाव चौपाटीवर अनेक भाविक, कोळी बांधव आणि पोलीस कर्मचारी उपस्थित आहेत.

20:39 (IST) 7 Sep 2025

‘मग आम्ही कसले सनातनी’, मुख्यमंत्री फडणवीसांच्या लेकीचा अस्वच्छतेवरून संताप; पीओपी मूर्तीबाबत म्हणाली…

दिव्यज फाऊंडेशनच्या वतीने आणि मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने जुहू येथील समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, लेक दिविजा फडणवीस यांनी सहभाग घेतला. स्वच्छता मोहीम राबविल्यानंतर दिविजा फडणवीसने माध्यमांशी संवाद साधताना तरूणांनी स्वच्छतेच्या मोहिमेत उतरायला हवे, असे आवाहन केले. तसेच गणेश भक्तांनी जास्तीत जास्त पर्यावरणपूरक (इको फ्रेंडली) गणेशमूर्ती वापरण्याचा भावनिक संदेशही दिला. सविस्तर बातमी वाचा

20:18 (IST) 7 Sep 2025

Lalbaugcha Raja Visarjan Live Updates: लालबागचा राजा मंडळाने त्या लहान मुलीच्या बापाची माफी मागावी

लालबागचा राजा मंडपात शेवटच्या दिवशी दर्शनासाठी आलेल्या एका कुटुंबाबरोबर अरेरावीचा प्रसंग घडल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून काही जणांनी मंडळावर टीका केली आहे. भैया पाटील नामक युजरने म्हटले की, अरे त्या लहान पोरीच्या बापाची माफी मागून पहा. जिच्या बापाला लालबागच्या राजाचे पदाधिकारी लहानमुली समोर मारतात.. त्या बापलेकीची माफी मागा.

20:10 (IST) 7 Sep 2025

Lalbaugcha Raja Visarjan Live Updates: गुजरातचा तराफा, मंडळाच्या कार्यकर्त्यांची मुजोरी; विसर्जन रखडताच सोशल मीडियावर टीकेचा सूर

भरती आणि ओहोटीचा अंदाज न आल्याने आणि गुजरातहून आणलेला तराफा वापरताना अडचण आल्याने लालबागचा राजाचे विसर्जन अद्याप होऊ शकलेले नाही. यावरून आता सोशल मीडियावर टीका सुरू झाली आहे. अनेकांनी मंडळातील कार्यकर्त्यांच्या मुजोरीवर यानिमित्ताने बोट ठेवले आहे.

जॅक नावाच्या युजरने एक्सवर लिहिले की, तासनतास रांगेत उभं राहणाऱ्या सामान्य नागरिकांना पाण्यात पाहणाऱ्या आणि श्रीमंतांना पायघड्या घालणाऱ्या…. डोक्यात हवा गेलेल्या VVIP कार्यकर्त्यांना बाप्पानेच पाण्यात खिळवून ठेवलंयं!

20:02 (IST) 7 Sep 2025

Lalbaugcha Raja Visarjan Live Updates: लालबागचा राजा गणपतीचं विसर्जन का लांबलं?

लालबाग परळ परिसरात असलेला लालबागचा दरवर्षी गणेश चतुर्थीच्या वेळी जगभरातील भाविकांना आकर्षित करते. येथे भाविक केवळ दर्शनासाठीच नव्हे तर दूरवरूनही आपल्या इच्छा पूर्ण करण्याच्या आशेने येतात. लालबागच्या राजाचे विसर्जन निर्धारित वेळेत न झाल्याने उलटसुलट प्रश्न उपस्थित होत आहेत. यावर आता कोळी बांधव आणि गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर यांनी आपली बाजू मांडून स्पष्टीकरण दिले आहे. सविस्तर् बातमी वाचा

17:42 (IST) 7 Sep 2025

लालबागचा राजा गणपती रात्री १०.३० ला विसर्जनासाठी मार्गस्थ होणार

“लालबागचा राजा गणपतीची मिरवणूक सुमारे २३ तास चालली. सकाळी ८.३० ला आम्ही पोहचलो होतो. अरबी समद्राची भौगोलिक परिस्थिती लवकर आली कारण गेल्या तीन दिवसांपासून तुफान पाऊस पडतो आहे. आमचा विसर्जन सोहळा हा पूर्णपणे भरती आणि ओहोटीवर अवलंबून असतो. त्यामुळे आम्ही प्रयत्न केला विसर्जनाचा. पण लालबागचा राजा हे कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळे तराफ्यावरुन नेऊनच आम्ही विसर्जन करतो. आम्ही त्याच पद्धतीने विसर्जनाचा निर्णय घेतला. विसर्जनाला जो उशीर झाला त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. मुंबई पोलीस आणि मुंबई महापालिका प्रशासनाचे मी आभार मानतो. भरती लवकर आली आणि आम्हाला १५ मिनिटं उशीर झाला. सगळ्या माध्यमांनी भावनिक आणि श्रद्धेच्या क्षणात तुम्ही सगळे उभे राहिलात. मी सगळ्यांचे आभार मानतो. आता भरतीची वेळ रात्री १०.३० ची आहे. त्यावेळी राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होईल. ” असं सुधीर साळवी म्हणाले.

17:28 (IST) 7 Sep 2025

Lalbaugcha Raja Visarjan 2025 Live Updates: रिलायन्सचे संचालक अनंत मुकेश अंबानी लालबागच्या राजाच्या विसर्जनस्थळी

लालबागच्या राजाच्या विसर्जनस्थळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक अनंत मुकेश अंबानी पोहोचले आहेत. त्यांनी विसर्जनाचा आढावा घेतला.

17:02 (IST) 7 Sep 2025

लालबागचा राजा गणपतीची मूर्ती तराफ्यावर ठेवण्यात कार्यकर्त्यांना यश

लालबागचा राजा गणपतीची मूर्ती तराफ्यावर ठेवण्यात कार्यकर्त्यांना यश आलं. आता प्रतीक्षा पुन्हा एकदा भरतीची. कारण तराफा वाळूत असल्याने या ठिकाणी पाण्याची पातळी वाढणं आवश्यक आहे. ती वाढली की मग लालबागचा राजा गणपतीचं विसर्जन होईल.

15:55 (IST) 7 Sep 2025

लालबागचा राजा गणपतीचं आठ तासांपासून विसर्जन नाही

आठ तास उलटूनही लालबागचा राजा गणपतीचं विसर्जन नाहीच. भरतीचं पाणी कमी होण्याची अद्यापही प्रतीक्षा

13:27 (IST) 7 Sep 2025

लालबागचा राजा गणपती विसर्जनात तराफ्याचं विघ्न

लालबाग राजा गणपतीच्या विसर्जनात तराफ्याचं विघ्न आलं आहे. गेल्या काही तासांपासून नव्या तराफ्यावर गणपतीची मूर्ती ठेवता आलेली नाही. त्यामुळे लालबागचा राजा गणपतीच्या विसर्जनात हे विघ्न निर्माण झालं आहे.

12:31 (IST) 7 Sep 2025

Ganesh Visarjan 2025 : विसर्जनाला गालबोट, मंडळातील पाच कार्यकर्ते बुडाले, एकाला वाचविताना झाली दुर्घटना

एका गणेशोत्सव मंडळातील पाच कार्यकर्ते बुडाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोघांचा शोध घेणे शक्य झाले आहे. तर इतर दोघांचा रात्री उशीरापर्यंत शोध सुरु होता. …अधिक वाचा
12:00 (IST) 7 Sep 2025

Pune Ganesh Visarjan 2025: विसर्जन मार्गावर ध्वनिवर्धकांचा ‘आव्वाज’; पुण्यातील विसर्जन मिरवणूक चोवीस तासांनंतरही सुरू

Pune Ganpati Visarjan 2025 Updates : विसर्जन मार्गावरील दणदणाटाने आवाजाची मर्यादा ओलांडली आहे. ध्वनिवर्धक, ढोल ताशांच्या आवाजामुळे विसर्जन मार्ग परिसरातून चालणेदेखील अवघड झाले होते. आवाजाने थरकाप उडत होता. …सविस्तर वाचा
11:44 (IST) 7 Sep 2025

मुंबईत विविध गणेशमूर्तींचं दुसऱ्या दिवशीही विसर्जन

गिरगाव चौपाटी येथे सध्या मुंबईतल्या विविध मोठ्या मूर्तींचं विसर्जन केलं जातं आहे. लालबागचा राजा गणपतीचं विसर्जन हे भरती ओसरल्यानंतर केलं जाईल अशी चिन्हं आहेत.

10:48 (IST) 7 Sep 2025

लालबागचा राजा गणेश मूर्तीचं विसर्जन ओहोटीनंतर?

लालबागचा राजा गणपतीचं विसर्जन ओहोटीपर्यंत होणार नाही अशी चिन्हं आहेत. कारण या वर्षी गुजरातहून आणलेला तराफा या वर्षी पहिल्यांदा वापरण्यात येणार होता. मात्र या तराफ्यावर मूर्ती चढवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे विसर्जन ओहोटी आल्याशिवाय होणार नाही अशी चर्चा होते आहे. सध्या कोळी बांधव लालबागचा राजा मूर्ती ही समुद्रात काही अंतर घेऊन गेले आहेत. आता नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.

10:25 (IST) 7 Sep 2025

पुण्यात विसर्जन मिरवणूक मागील २४ तासांपासून सुरुच

पुण्यात सलग चोवीस तासानंतरही विसर्जन मिरवणुकी सुरूच.. डॉल्बी तालावर टिळक चौकात तरुणांचा नाच. पुण्यातील तिन्ही मुख्य मार्गांवर अजूनही मिरवणूक सुरु. पुणेकराचा उत्साह शिगेला पोहचल्याचं पाहण्यास मिळतं आहे.

10:20 (IST) 7 Sep 2025

चिंचपोकळचा चिंतामणी गणपतीचं विसर्जन

चिंचपोकळीचा चिंतामणी या गणपीतचं विसर्जन, या ठिकाणी गणपती बाप्पा मोरया हा गजर केला जातो आहे. या गणपतीची मिरवणूक दुपारी १ वाजता सुरु झाली होती. आता गिरगाव चौपाटीवर या गणपतीचं विसर्जन केलं जातं आहे.

09:48 (IST) 7 Sep 2025

लालबागचा राजा विसर्जनासाठी स्वयंचलित तराफा

लालबागचा राजाच्या विसर्जनासाठी एक नवा आणि अत्याधुनिक स्वयंचलित तराफा वापरण्यात येणार आहे. मागील वर्षीच्या तराफ्याच्या तुलनेत हा तराफा दुप्पट मोठा असून तो पूर्णपणे स्वयंचलित आहे. याआधी विसर्जनासाठी कोळी बांधवांच्या बोटींच्या मदतीने तराफा समुद्रात ओढून न्यावा लागत होता, पण आता या नव्या तराफ्यामुळे ती गरज भासणार नाही. या तराफ्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो पाण्यात ३६० अंशामध्ये (360 डिग्री) कुठेही वळण घेऊ शकतो, ज्यामुळे विसर्जनाची प्रक्रिया अधिक सोपी आणि सुरक्षित होईल.

09:24 (IST) 7 Sep 2025

थोड्याच वेळात लालबागचा राजा गणपतीचं विसर्जन

लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर समुद्रापर्यंत पोहोचला आहे. आता थोड्याचवेळात लालबागचा राजाच्या आरतीला सुरुवात होईल. लालबागचा राजाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर भक्तांची प्रचंड गर्दी. आता थोड्याचवेळात लालबागचा राजाची आरती केली जाईल. त्यानंतर लालबागचा राजाला स्वयंचलित तराफ्यावर बसवून खोल समुद्रात नेले जाईल.

08:59 (IST) 7 Sep 2025

लालबागचा राजा गणपतीच्या विसर्जनासाठी खास तराफा

यंदा अत्यंत खास असा तराफा लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी तयार करण्यात आला आहे. हा तराफा गेल्या वर्षीच्या तराफ्याच्या तुलनेत आकाराने दुप्पट आहे. खास पद्धतीने लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जातं. मागच्या २० तासांपासून राजाची मिरवणूक सुरु आहे. आता काही वेळातच लालबागचा राजा गणपतीचं विसर्जन केलं जाईल.

07:08 (IST) 7 Sep 2025

लालबागचा राजा गिरगावच्या ऑपेरा हाऊस परिसरात पोहचला

लालबागचा राजा हा गणपती आता गिरगावातल्या ऑपेरा हाऊस भागात पोहचला आहे. या राजाची विसर्जन मिरवणूक शनिवारी सकाळी १० वाजता सुरु झाली होती. दरम्यान मागचे २० तास ही मिरवणूक सुरु आहे आणि भाविकांचा उत्साह थोडाही कमी झालेला नाही.

07:02 (IST) 7 Sep 2025

चिंचपोकळीचा चिंतामणी या गणपतीचं काही वेळात विसर्जन

चिंचपोकळीचा चिंतामणी या गणपतीचं विसर्जन थोड्याच वेळात होणार. भाविकांचा उत्साह कायम आहे. चिंचपोकळीचा बाप्पा या गणपतीची विसर्जन मिरवणूकही शनिवारी सकाळी सुरु झाली होती. गेल्या १९ तासांपासून मिरवणूक सुरु आहे. आता काही वेळात या गणपतीचं विसर्जन होईल.

06:49 (IST) 7 Sep 2025

पवईत अद्यापही गणेश मूर्तींचं विसर्जन बाकी

मुंबई उपनगरात पवई तलावाच्या परिसरात अद्याप अनेक गणेशमूर्तींचे विसर्जन बाकी आहे. या गणेश मूर्ती पवई तलावाच्या परिसरात रांगेत उभ्या आहेत.

06:45 (IST) 7 Sep 2025

लालबागचा राजा थोड्याच वेळात गिरगाव चौपाटीवर होणार दाखल

लालबागचा राजा विसर्जनासाठी थोड्याच वेळात गिरगाव चौपाटीवर दाखल होणार. लालबागचा राजा ६ सप्टेंबरच्या सकाळी १० वाजता विसर्जनासाठी मंडपातून निघाला होता, अजूनही त्याची मिरवणूक सुरु आहे. थोड्या वेळात हा गणपती गिरगाव चौपाटीवर दाखल होईल.

00:36 (IST) 7 Sep 2025

‘इतरांसह मलाही सुबुद्धी मिळो’, गणरायाचे विसर्जन निर्विघ्नपणे पार पडताना मुख्यमंत्री फडणवीसांचे सूचक विधान

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरगाव चौपाटी येथे उपस्थित राहत श्री गणरायाला अखेरचा निरोप दिला. …सविस्तर वाचा
23:53 (IST) 6 Sep 2025

चिंचवडमध्ये ‘लेझर बीम’चे झोत; डीजेचा दणदणाट

पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक गणेश मंडळांनी पोलिसांच्या आवाहनकडे दुर्लक्ष करत विसर्जन मिरवणुकीत प्रकाशझोतांचा (लेझर बीम) आणि डीजेचा भरपूर वापर केला. …सविस्तर बातमी
23:36 (IST) 6 Sep 2025

Pune Ganesh Visarjan 2025: विसर्जन मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणाऱ्या ‘अत्तरवाल्या चाचां’ची गोष्ट…

ब्रिटिशांविरोधात स्वातंत्र्याची लढाई व्यापक करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक केला. आता लढाई ब्रिटिशांशी नाही ; पण सामाजिक ऐक्यासमोर अनेक आव्हाने स्वातंत्र्योत्तर काळात सातत्याने नवनव्या स्वरूपात समोर येत आहेत. …अधिक वाचा
23:35 (IST) 6 Sep 2025

यंदाच्या मिरवणुकीत तुळशीबाग गणपतीचा मयूर रथाला फुलांची आकर्षक सजावट; मानाच्या पाच गणपतीचे सहा वाजण्यापूर्वी विसर्जन

यंदाची गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक महात्मा फुले मंडई येथून मानाचा पहिला कसबा गणपतीला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सकाळी साडे नऊ वाजता पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. …सविस्तर बातमी
23:30 (IST) 6 Sep 2025

Maharashtra Ganesh Visarjan Miravnuk Updates: लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वारासमोर भरधाव ट्रकची धडक, पदपथावर झोपलेल्या मुलीचा मृत्यू

लालबागचा राजा मंडळाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर झोपलेल्या दोन लहान मुलींना भरधाव वेगात धावणाऱ्या ट्रकने धडक दिली. या अपघातात २ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला, तर ११ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. शनिवारी पहाटे गजबजलेल्या ठिकाणी हा अपघात घडला. सीसीटीव्हीच्या आधारे काळाचौकी पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहेत. सविस्तर वृत्त वाचा

20:34 (IST) 6 Sep 2025

Ganesh Visarjan 2025 LIVE Update: कल्याणमध्ये लाडक्या बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप

कल्याण डोंबिवलीमध्ये आज गणेश विसर्जनानिमित्त गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. दुपारपासूनच आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी गणेश भक्तांचे लगबग सुरू झाली. विसर्जन स्थळांपर्यंत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढत बाप्पांच्या विसर्जन सुरू झाले. विसर्जनानिमित्त कल्याण मधील दुर्गाडी गणेश घाटासह इतर सर्व गणेश घाटांवर कडे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Mumbai Ganesh Visarjan 2025: लालबागच्या राजाच्या विसर्जनास विलंब, अत्याधुनिक तराफ्यावर गणेशमूर्ती चढविताना अडचण ( छायाचित्र सौजन्य : आकाश पाटील )