अहिल्यानगर : विविध शासकीय समित्यांवर अशासकीय सदस्य म्हणून ३० जूनपर्यंत नियुक्त्या करण्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जाहीर केले होते. मात्र महिनाभरानंतरही या नियुक्त्यांसाठी कार्यकर्त्यांची प्रतीक्षा सुरू आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर त्याचा लाभ स्थानिक पातळीवर महायुतीमधील तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिळेल, अशी अपेक्षा होती. त्यासाठी या नियुक्त्या केव्हा होणार, याकडे त्यांचे लक्ष लागलेले आहे.

राज्य सरकारच्या जिल्हा व तालुका पातळीवर अनेक समित्या आहेत. या समित्यांवर अशासकीय सदस्य म्हणून अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची वर्णी लावली जाते. या नियुक्त्यांचे अधिकार पालकमंत्र्यांकडे आहेत. यापूर्वी सन २०१४ मध्ये भाजप सत्तेवर असताना व त्यानंतर सन २०२२ मध्ये पुन्हा सरकार आले असतानाही या नियुक्त्या झालेल्या नव्हत्या. त्यामुळे सत्तेचा पाझर तळापर्यंतच्या कार्यकर्त्यांत पाझरलाच नाही, अशी भावना निर्माण झाली होती.

भ्रष्टाचार निर्मूलन समिती, अवैध दारू प्रतिबंध समिती, शांतता समिती, व्यसनमुक्त समिती, जिल्हा क्रीडा संकुल समिती, संजय गांधी निराधार अनुदान समिती, पशुगणना समन्वय नियंत्रण समिती, बाल संरक्षण समिती, जलसाक्षरता समिती, जिल्हा दक्षता समिती, तंटामुक्त समिती, जलयुक्त शिवार अभियान आढावा समिती, वेठबिगार निर्मूलन दक्षता समिती, विशाखा समिती, राजीव गांधी गतिमान प्रशासन समिती, रोजगार हमी समिती, किमान वेतन कायदा समिती, विद्युत वितरण नियंत्रण समिती, रुग्ण कल्याण समिती अशा किमान शंभरावर समित्या आहेत. या समित्यांवर अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांची वर्णी लागू शकते. या माध्यमातून पक्षाच्या कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळते, नागरिकांचे प्रश्न सोडवता येतात. त्याचा फायदा पक्षाला होत असतो.

सुमारे दोन महिन्यांपूर्वी पालकमंत्री विखे यांनी पक्षाच्या मेळाव्यामध्ये ३० जूनपर्यंत शासकीय समित्या जाहीर केल्या जातील, असे सांगितले होते, याची आठवण महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते काढत आहेत. सत्ताधारी महायुतीमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिवसेना (शिंदे गट) असे तीन पक्ष सहभागी आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे ४, भाजपचे ४ व शिंदे गटाचे २ असे सत्ताधारी गटाचे १० आमदार आहेत. जिथे सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे तेथे त्या पक्षाला ६० टक्के जागा तर उर्वरित दोन पक्षांना प्रत्येकी २० टक्के जागा असे सूत्र महायुतीमध्ये ठरलेले आहे.

पालकमंत्र्यांनी यासाठी महायुतीतील घटक पक्षांच्या जिल्हाध्यक्षांकडे याद्या मागितल्या होत्या. त्यानुसार काहींच्या याद्या पालकमंत्र्यांकडे पाठवल्या गेल्या आहेत तर काहींच्या अद्याप तयार झालेल्या नाहीत.

वेळ लागणार आहे

शासकीय समित्यांवरील नियुक्त्यांसाठीच्या याद्या अद्याप तयार झालेल्या नाहीत. याद्या तयार करण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे त्या अद्याप पालकमंत्र्यांकडे पाठवल्या गेलेल्या नाहीत. – अनिल मोहिते, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप

यादी पूर्वीच पाठवली

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) शासकीय समित्यांवरील नियुक्त्यांसाठी आमदार संग्राम जगताप यांच्यामार्फत पालकमंत्र्यांकडे याद्या पूर्वीच पाठवल्या गेल्या आहेत. – संपत बारस्कर, शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

आठवडाभरात याद्या तयार होतील

शिवसेनेच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. आम्हाला तशा पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून तसेच पालकमंत्र्यांकडूनही सूचना आल्या आहेत. त्यानुसार याद्या तयार केल्या जात आहेत. आठवडाभरात या याद्या पाठवल्या जातील. – सचिन जाधव, शहरप्रमुख, शिवसेना.